गेल्या 30 वर्षांत असा सरप्राइज कधीच मिळाला नव्हता..; युजवेंद्र चहल भावूक, आरजे महवशचा प्लॅन?
क्रिकेटर युजवेंद्र चहलने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर नुकताच एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये त्याने भावना व्यक्त केल्या आहेत. गेल्या तीन दशकांत मला कधीच असा सरप्राइज मिळाला नव्हता, असं त्याने लिहिलंय.

भारतीय क्रिकेटपटू युजवेंद्र चहलने नुकताच त्याचा 35 वा वाढदिवस साजरा केला. या वाढदिवशी युजवेंद्रला लंडनमध्ये मोठा सरप्राइज मिळाला. त्याचा व्हिडीओ त्याने नुकताच सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये पहायला मिळतंय की, काही डान्सर्स युजवेंद्रसाठी परफॉर्म करत आहेत. भररस्त्यात आणि लोकांच्या घोळक्यात अचानक एक मुलगी युजवेंद्रचा हात पकडून त्याला बाजूला नेते. त्यानंतर इतर डान्सर्स त्याच्यासमोर येऊन नाचू लागतात. हे सर्व पाहून युजवेंद्र चकीत आणि त्याचवेळी भावूक होतो. 23 जुलै रोजी युजवेंद्रचा वाढदिवस होता. या सरप्राइजचा व्हिडीओ पोस्ट करत त्याने भावना व्यक्त केल्या आहेत. गेल्या 30 वर्षांत पहिल्यांदाच वाढदिवसाला अशा प्रकारे सरप्राइज मिळाल्याचं त्याने सांगितलं.
“आम्ही मुलांचं कधी कधी संपूर्ण आयुष्य निघून जातं वाढदिवस साजरा न करता. गेल्या तीन दशकातील हा माझा पहिला आणि कदाचित सर्वांत वेडा बर्थडे सरप्राइज आहे. हे सर्व घडत असताना जग फिरत होतं. मी स्तब्ध झालोय आणि या सरप्राइजसाठी कृतज्ञ आहे. मी भारावून गेलोय. आपल्या चेहऱ्यावर हसू आणणारे असे मित्र प्रत्येकाच्या आयुष्यात असू दे. दरम्यान, हे सगळं खरंच घडलंय ही गोष्ट मी अजूनही पचवण्याचा प्रयत्न करत आहे”, अशा शब्दांत युजवेंद्रने भावना व्यक्त केल्या आहेत.
View this post on Instagram
युजवेंद्र चहलला त्याची कथित गर्लफ्रेंड आरजे महवशनेच हा बर्थडे सरप्राइज दिला असावा, अशी चर्चा नेटकऱ्यांमध्ये सुरू आहे. गेल्या काही महिन्यांपासून या दोघांच्या डेटिंगच्या चर्चा आहेत. अनेकदा चहल आणि महवश यांना एकत्रही पाहिलं गेलंय. परंतु दोघांनी त्यावर थेट प्रतिक्रिया दिली नाही. दरम्यान ऑगस्ट 2023 पासून चहलने भारताचं प्रतिनिधित्व केलेलं नसलं तरी तो अजूनही देशांतर्गत क्रिकेट आणि आयपीएलमध्ये सक्रिय आहे. नुकताच तो आरजे महवशसोबत लंडनमध्ये दिसला होता. त्यामुळे त्याच्या सरप्राइजची चर्चा आणखी वाढली आहे.
युजवेंद्र चहल आणि कोरिओग्राफर-इन्फ्लुएन्सर धनश्री वर्मा हे या वर्षी विभक्त झाले. 2020 मध्ये या दोघांनी लग्न केलं होतं. कोर्टातील सुनावणीदरम्यान धनश्री आणि युजवेंद्रने स्पष्ट केलं होतं की ते गेल्या 18 महिन्यांपासून वेगळे राहत होते.
