हे फोटो अत्यंत त्रासदायक, धक्कादायक; शिल्पा शेट्टीच्या डीपफेकवर कोर्टाचे आदेश

या प्रकरणी न्यायालयाच्या तातडीच्या हस्तक्षेपाची गरज असल्याचा युक्तिवाद शिल्पा शेट्टीच्या वतीने करण्यात आला. तसंच या बनावट अश्लील छायाचित्रांमुळे शिल्पाच्या प्रतिष्ठेला गंभीर नुकसान होत असल्याचंही न्यायालयाला सांगण्यात आलं.

हे फोटो अत्यंत त्रासदायक, धक्कादायक; शिल्पा शेट्टीच्या डीपफेकवर कोर्टाचे आदेश
Shilpa Shetty
Image Credit source: Instagram
| Updated on: Dec 28, 2025 | 10:31 AM

एआय-जनरेटेड, मॉर्फ केलेले फोटो आणि व्हिडीओ ऑनलाइन वापरून आपल्या व्यक्तिमत्त्वाच्या अधिकारांचा गैरवापर केल्याच्या विरोधात अभिनेत्री शिल्पा शेट्टीने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर शुक्रवारी न्यायालयाने निर्णय दिला. हे डीपफेक फोटो अत्यंत त्रासदायक आणि धक्कादायक असल्याचं न्यायालयाने यावेळी म्हटलं. तसंच सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून ते तात्काळ हटवण्याचे आणि काढून टाकण्याचे आदेश दिले. त्यामुळे या प्रकरणात शिल्पाला मोठा दिलासा मिळाला आहे. शिल्पाने तिच्या व्यक्तिमत्त्वाच्या अधिकारांचं संरक्षण करण्यासाठी आणि तिचे फोटो, व्हिडीओ मॉर्फ करणाऱ्या, एआय जनरेटेड फेक कंटेंट बनवणाऱ्या वेबसाइट्सविरोधात आदेश देण्याची मागणी करण्यासाठी न्यायालयात धाव घेतली होती.

या खटल्याची सुनावणी न्यायमूर्ती अद्वैत सेठना यांनी केली. विविध साइट्सवर अपलोड केलेले फोटो अत्यंत त्रासदायक आणि धक्कादायक असल्याचं न्यायमूर्तींनी आदेशात म्हटलंय. कोणत्याही व्यक्तिमत्त्वाचं, एखाद्या व्यक्तीचं किंवा महिलेचं अशा पद्धतीने चित्रण केलं जाऊ नये, ज्यामुळे तिच्या गोपनीयतेच्या मूलभूत अधिकारावर परिणाम होईल आणि तेही तिच्या माहिती किंवा संमतीशिवाय.. असं ते पुढे म्हणाले.

शिल्पा शेट्टीचे हे डीपफेक फोटो, व्हिडीओ अयोग्य आणि अस्वीकार्य असून यामुळे तिची प्रतिमा, प्रतिष्ठेला धोका पोहोचतो, असंही न्यायालयाने स्पष्ट केलं. उच्च न्यायालयाने सर्व प्रतिवादींना त्यांच्या संबंधित प्लॅटफॉर्मवरून URL हटवण्याचे निर्देश दिले. शिल्पाने असाही आरोप केला होता की, तिच्या परवानगीशिवाय फोटो मॉर्फ करण्यासाठी आणि इतर कंटेंट बनवण्यासाठी एआय टूल्सचा वापर करून तिचा आवाज क्लोन करण्यात आला. आक्षेपार्ह कंटेंट असलेल्या सर्व वेबसाइट्सविरुद्ध तिने मनाई आदेश मागितला आहे. तसंच परवानगीशिवाय तिचं नाव, आवाज किंवा फोटो वापरण्यापासून रोखलं पाहिजे, अशीही मागणी तिने केली.

शिल्पा 2023 मध्ये ‘सुखी’ या चित्रपटात झळकली होती. यामध्ये तिने मुख्य भूमिका साकारली होती. परंतु हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारसा गाजला नाही. 2026 मध्ये ती कन्नड चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात शिल्पासोबत ध्रुव सर्जा, संजय दत्त, रेशमा नानैया, जिशू सेनगुप्ता आणि नोरा फतेही यांच्याही भूमिका आहेत.