65 वर्षांवरील कलाकारांना पुन्हा शूटिंगची परवानगी, ठाकरे सरकारचा आदेश हायकोर्टाने बदलला

'मिशन बिगीन अगेन' उपक्रमांतर्गत 65 वर्षांवरील टीव्ही-चित्रपट कलाकार आणि क्रू मेंबर यांना सेट किंवा स्टुडिओमध्ये जाण्यास प्रतिबंध घालण्यात आला होता

65 वर्षांवरील कलाकारांना पुन्हा शूटिंगची परवानगी, ठाकरे सरकारचा आदेश हायकोर्टाने बदलला

मुंबई : मनोरंजन क्षेत्रात काम करणार्‍या 65 वर्षांवरील सर्व व्यक्तींना मुंबई उच्च न्यायालयाने मालिका-चित्रपटाच्या सेटवर काम करण्याची परवानगी दिली आहे. हायकोर्टाने ठाकरे सरकारचा आदेश बाजूला ठेवत निर्णय दिला. (Bombay High Court allows all persons above 65 years of age working in the entertainment industry)

कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर असलेल्या लॉकडाऊनच्या काळात 65 वर्षांवरील चित्रपट, टीव्ही कलाकार आणि क्रू मेंबर्सना स्टुडिओ किंवा आऊटडोअर सेटवर काम करण्यास राज्य सरकारने मनाई केली होती. मात्र सरकारने जारी केलेले दोन ठराव मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी रद्द केले.

चित्रपट व टीव्ही कलाकार प्रमोद पांडे (70) आणि इंडियन मोशन पिक्चर्स प्रोड्यूसर असोसिएशनच्या वतीने वकील अशोक सरोगी यांच्यामार्फत दाखल केलेल्या दोन याचिकांवर खंडपीठाने निर्णय दिला.

“65 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या कोणत्याही व्यक्तीसाठी लागू असलेल्या इतर सर्व नियमावली चित्रपट आणि टीव्ही क्षेत्रात काम करणाऱ्या पासष्टीवरील कलाकार आणि तंत्रज्ञांनाही लागू असतील” असेही  न्यायमूर्ती एस. जे. काठावाला आणि आर. आय. चगला यांच्या खंडपीठाने सांगितले.

‘मिशन बिगीन अगेन’ या राज्य सरकारच्या उपक्रमांतर्गत 65 वर्षांवरील टीव्ही-चित्रपट कलाकार आणि क्रू मेंबर यांना सेट किंवा स्टुडिओमध्ये जाण्यास प्रतिबंध घालण्यात आला होता. या ठरावांना दोन्ही याचिकाकर्त्यांनी आव्हान दिले होते.

ठाकरे सरकारच्या निर्णयामुळे मराठी-हिंदीतील अनेक कलाकारांना टीव्ही किंवा चित्रपट यामध्ये काम करता येत नव्हते. अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये आई-वडील, सासू-सासरे, आजी-आजोबा अशा व्यक्तिरेखा साकारणारे ज्येष्ठ कलाकार असल्याने कथानकात बदल करावा लागला होता. तर काही मालिकांमध्ये अशा कलाकारांचे सीन त्यांच्या घरुन शूट केले जात होते.

जॅकी श्रॉफ, सुरेखा सिक्री यांच्यासारख्या अनेक कलाकारांनी त्याविरोधात नाराजी व्यक्त केली होती. आपण सुदृढ आणि सक्षम असतानाही केवळ वयाच्या निकषामुळे काम करु शकत नाही, हे चुकीचे असल्याच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या होत्या.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *