CID मालिकेचे निर्माते बी. पी. सिंह यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन; 77 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
बी. पी. सिंह यांनी भारतीय टेलिव्हिजनला अनेक लोकप्रिय कार्यक्रम दिले. विशेषतः ‘सीआयडी’च्या माध्यमातून त्यांनी क्राइम मालिकांना प्रेक्षकांमध्ये मोठी लोकप्रियता मिळवून दिली.

CIP Producer B P Singh: छोट्या पडद्यावरील लोकप्रिय आणि गाजलेली मालिका ‘सीआयडी’चे निर्माते आणि दिग्दर्शक बी. पी. सिंह यांचं निधन झालं आहे. वयाच्या 77व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 27 ऑक्टोबर 2026 रोजी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाच्या बातमीने टेलिव्हिजन मनोरंजनविश्वात शोककळा पसरली आहे. चित्रपट निर्माते अशोक पंडित यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत बी. पी. सिंह यांना श्रद्धांजली वाहिली. ‘सीआयडी’सारख्या लोकप्रिय मालिकेच्या माध्यमातून घराघरांत पोहोचलेल्या या दिग्गज व्यक्तिमत्त्वाच्या निधनामुळे चाहत्यांनाही मोठा धक्का बसला आहे.
हृदयविकाराच्या झटक्याने निधन
बी. पी. सिंह यांचं पूर्ण नाव बृजेंद्र पाल सिंह असं होतं. त्यांनी हिंदी टेलिव्हिजन विश्वात निर्माता आणि दिग्दर्शक म्हणून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली होती. 27 ऑक्टोबर रोजी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचं निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. ते 77 वर्षांचे होते. त्यांच्या निधनाचं वृत्त समोर येताच मनोरंजनविश्वातील अनेकांनी हळहळ व्यक्त केली. चित्रपट निर्माते अशोक पंडित यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून त्यांच्या निधनाची माहिती दिली. बी. पी. सिंह यांच्या जाण्याने टेलिव्हिजन क्षेत्रातील एका महत्त्वाच्या व्यक्तिमत्त्वाला गमावल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
View this post on Instagram
‘सीआयडी’ मालिकेमुळे मिळाली घराघरांत ओळख
बी. पी. सिंह यांचं नाव घेतलं की सर्वप्रथम आठवते ती ‘सीआयडी’ ही लोकप्रिय मालिका. 1998 मध्ये सुरू झालेल्या या मालिकेनं भारतीय टेलिव्हिजनवर स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं. एसीपी प्रद्युम्न, दया आणि अभिजीत यांसारख्या पात्रांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. मालिकेतील गुन्ह्यांची उकल, तपासाची पद्धत आणि प्रत्येक भागातील रहस्य यामुळे ही मालिका अनेक वर्षे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. या मालिकेच्या निर्मिती आणि दिग्दर्शनाची महत्त्वाची जबाबदारी बी. पी. सिंह यांनी सांभाळली होती. विशेष म्हणजे, त्यांनी ‘सीआयडी’मध्ये डीसीपी शमशेर सिंह चित्रोले ही भूमिका देखील साकारली होती. त्यामुळे पडद्यामागे निर्माता आणि पडद्यावर अभिनेता अशा दोन्ही भूमिकांमधून ते प्रेक्षकांच्या लक्षात राहिले.
‘आहट’सारख्या मालिकांचीही निर्मिती
बी. पी. सिंह यांनी केवळ क्राइम मालिकांपुरतं आपलं काम मर्यादित ठेवलं नाही. त्यांनी ‘आहट’ या लोकप्रिय भयपट मालिकेची निर्मिती आणि दिग्दर्शनही केलं. 1995 मध्ये सुरू झालेल्या या मालिकेने प्रेक्षकांना भय आणि रहस्याचा वेगळा अनुभव दिला. याशिवाय ‘हम ने ली है शपथ’ आणि ‘गुटुर गु’ यांसारख्या कार्यक्रमांशीही ते जोडले गेले होते. त्यांच्या कारकिर्दीचा प्रवास दूरदर्शनवरील कॅमेरामन म्हणून सुरू झाला होता. पुढे त्यांनी निर्माता आणि दिग्दर्शक म्हणून मोठं यश मिळवलं. फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (FTII) चे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली होती.
