कुली – वॉर 2 यांच्यात जबरदस्त टक्कर; कोणी मारली बाजी?
बॉक्स ऑफिसवर दोन मोठ्या कलाकरांच्या बहुचर्चित चित्रपटांची टक्कर पहायला मिळतेय. 'कुली' आणि 'वॉर 2' हे दोन्ही चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित झाले. एकीकडे रजनीकांत आहेत, तर दुसरीकडे हृतिक आणि ज्युनियर एनटीआर आहे.

बॉक्स ऑफिसवर सध्या दोन मोठ्या चित्रपटांची टक्कर पहायला मिळतेय. त्यापैकी एक रजनीकांत यांचा ‘कुली’ आहे, तर दुसरा हृतिक रोशनचा ‘वॉर 2’. हे दोन्ही चित्रपट 14 ऑगस्ट रोजी लाँग वीकेंड सुरू होत असताना झाले. सुट्ट्यांचा फायदा या दोन्ही चित्रपटांना झाला असला तरी ‘कुली’ने ‘वॉर 2’ला बरंच मागे टाकलं आहे. हृतिक आणि ज्युनियर एनटीआर यांच्या ‘वॉर 2’ची सुरुवात काही खास झाली नव्हती. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी 51.5 कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता. परंतु दुसऱ्या दिवसापासून त्याच्या कमाईत चांगलीच वाढ झाल्याचं पहायला मिळालं. तर दुसरीकडे ‘कुली’ने पहिल्याच दिवशी 65 कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता.
‘वॉर 2’ची आतापर्यंतची कमाई
हृतिक आणि ज्युनियर एनटीआर यांच्या ‘वॉर 2’ची सुरुवात जरी धीम्या गतीने झाली असली तरी कमाईने आता जोर पकडला आहे. सॅकनिल्कने दिलेल्या वृत्तानुसार या चित्रपटाने प्रदर्शनाच्या तिसऱ्या दिवशी म्हणजेच शनिवारी 33.25 कोटी रुपयांची कमाई केली आहे. तर चौथ्या दिवसाच्या सुरुवातीच्या आकड्यांनुसार, जवळपास 12 कोटी रुपयांचा व्यवसाय झाला आहे. हा आकडा आणखी वाढू शकतो. यासह ‘वॉर 2’च्या कमाईचा आकडा आतापर्यंत 155.33 कोटी रुपयांपर्यंत पोहोचला आहे.
‘कुली’ची आतापर्यंतची कमाई
रजनीकांत यांचा ‘कुली’ हा चित्रपट ‘वॉर 2’ला जबरदस्त टक्कर देतोय. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी जवळपास 65 कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता. ज्यापैकी 44 कोटी रुपयांची कमाई ही फक्त तमिळ व्हर्जनमधून झाली होती. सॅकनिल्कने दिलेल्या वृत्तानुसार, ‘कुली’ने तिसऱ्या दिवशी म्हणजेच शनिवारी 39.5 कोटी रुपयांचा व्यवसाय केला. रविवारीही या चित्रपटाला खूप चांगला प्रतिसाद मिळाला. सुरुवातीच्या आकड्यांनुसार, रविवारी या चित्रपटाने 13 कोटी रुपये कमावले आहेत. यानुसार, ‘कुली’ची आतापर्यंतची कमाई 172.47 कोटी रुपयांवर पोहोचली आहे.
साऊथ सुपरस्टार यांच्या स्टारडमची जादू फक्त देशभरातच नाही तर परदेशातही पहायला मिळतेय. सॅकनिल्कच्या वृत्तानुसार, तीन दिवसांत या चित्रपटाने देशभरात आणि परदेशातून 300 कोटी रुपयांचा टप्पा पार केला आहे. यासह हा चित्रपट जगभरातून 300 कोटींच्या क्लबमध्ये सर्वांत जलद गतीने एण्ट्री करणारा तमिळ चित्रपट ठरला आहे. वर दुसरीकडे ‘वॉर 2’ने जगभरातून 215 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे.
