मीच तिच्याकडे पोटगी मागायला पाहिजे..; ‘क्योंकी सास भी..’ फेम अभिनेत्रीच्या पतीचा संताप, नेमकं काय घडलं?
अभिनेत्री अपरा मेहता आणि त्यांचे पती दर्शन जरीवाला हे गेल्या अनेक वर्षांपासून वेगळे राहत आहेत. तरी त्यांनी घटस्फोट घेतला नाही. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी यामागचं खरं कारण सांगितलं.

‘क्योंकी सास भी कभी बहु थी’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेल्या दिग्गज अभिनेत्री अपरा मेहता यांचं वैवाहिक आयुष्य सध्या चर्चेत आलं आहे. काही दिवसांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी पती आणि अभिनेते दर्शन जरीवाला यांच्यावर काही आरोप केले होते. “तू माझ्या आयुष्यातील सर्वांत कुरूप महिला आहेस, असं म्हणून ते घर सोडून गेले”, असं त्या म्हणाल्या होत्या. त्यावर आता दर्शन यांनी प्रतिक्रिया दिली. अपरा आणि दर्शन हे गेल्या 23 वर्षांपासून वेगळे राहत आहेत. मात्र अद्याप त्यांनी घटस्फोट घेतला नाही.
घटस्फोट का घेतला नाही?
23 वर्षांपासून वेगळे राहत असूनही कायदेशीररित्या घटस्फोट का घेतला नाही, असा प्रश्न दर्शन यांना विचारण्यात आला. त्यावर त्यांनी स्पष्ट केलं की, घटस्फोटाची प्रक्रिया सुरू केली होती, परंतु ती पुढे गेली नाही. “मी घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता, पण न्यायाधीशांनी तो अर्ज फेटाळला. तिने संमती दिली नाही. ती घटस्फोटासाठी तयार झाली होती, पण शेवटच्या क्षणी न्यायाधीशांसमोर तिने तिचा विचार बदलला. ती बहुधा एका चांगल्या, अन्याय झालेल्या पीडितेची भूमिका करत असावी”, असा टोला त्यांनी लगावला.
“मीच पोटगी मागायला हवी होती..”
पत्नीपासून वेगळं होताना सांताक्रूझ पश्चिम इथलं आपलं घर सोडल्याची आणि त्या घरात पत्नी, मुलीला राहू दिल्याचा खुलासाही दर्शन यांनी यावेळी केला. “मी त्या घरातून सहजच बाहेर पडलो. जे काही देणं मला परवडत होतं, ते मी मागे सोडलं होतं. माझ्याकडे तिला देण्यासारखं एवढंच होतं. जर पोटगीचा विषय असेल तर मीच ती मागायला हवी होती, कारण मी त्या परिस्थितीत होतो. पण तसं काहीच घडलं नाही. कारण घर सोडल्यानंतर लगेच भाड्याने राहण्याची सोय करण्यासाठी माझ्याकडे दुसरं घर किंवा पुरेसे पैसेही नव्हते. त्यामुळे काही काळ मी मित्रांसोबत त्यांच्या घरात राहिलो आणि नंतर एक साधं घर भाड्याने घेतलं”, असं ते म्हणाले.
मुलीसोबतचं नातं
काही वर्षांच्या संघर्षानंतर दर्शन यांच्या करिअरला गती मिळाली. नंतर त्यांनी ऐश्वर्या रायसोबत एका लोकप्रिय जाहिरातीत काम केलं. पुढे फिरोज अब्बास खान यांच्या 2007 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘गांधी माय फादर’ या चित्रपटात त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारली. या मुलाखतीत दर्शन यांनी मुलीसोबतच्या नात्याबद्दलही सांगितलं. आम्ही दोघं नियमित संपर्कात असतो आणि आमचं नातं खूप जवळचं आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं.
“एक वडील म्हणून मी खूप चांगला आहे. मी तिच्या संपर्कात असतो. तिच्या आयुष्यातील सर्व घडामोडींची मला पूर्ण कल्पना आहे. तिच्याकडे माझं डेबिट कार्डसुद्धा आहे”, असं ते म्हणाले. यावेळी त्यांनी अपरा मेहता यांचा हा दावाही फेटाळून लावला की, त्यांनी मुलीला एकट्याने वाढवलं. “लोक कधीकधी स्वत:च्या भावनिक अनुभवांच्या आधारे भूतकाळाचा अर्थ लावतात. कधीकधी आपण आपल्या आयुष्यातील पोकळी भरून काढण्याचा प्रयत्न करतो. जिथे काहीच नसतं, तिथे आपण जाणीवपूर्वक किंवा अजाणतेपणे विचित्रपणा आणतो”, असा खोचक टोला त्यांनी लगावला.
