बाळाच्या दिसण्यावरून कमेंट केली तर याद राखा..; अभिनेत्रीकडून थेट कारवाई
आपल्या सात महिन्यांच्या बाळाच्या दिसण्यावरून कमेंट्स करणाऱ्यांविरोधात अभिनेत्रीने थेट कारवाई केली आहे. देवोलीना भट्टाचार्जीने तिच्या मुलाचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले होते. त्यावर काही नेटकऱ्यांनी वर्णद्वेषी टिप्पणी केली होती.

‘साथ निभाना साथियाँ’ या मालिकेत गोपी बहूची भूमिका साकारून अभिनेत्री देवोलीना भट्टाचार्जी घराघरात पोहोचली. डिसेंबर 2022 मध्ये तिने जिम ट्रेनर शाहनवाज शेखशी आंतरधर्मीय लग्न केलं. या दोघांना एक मुलगा असून त्याचं नाव त्यांनी ‘जॉय’ असं ठेवलंय. देवोलीना आणि शाहनवाज यांनी नुकताच त्यांच्या मुलाचा सात महिन्यांचा वाढदिवस साजरा केला. या सेलिब्रेशनचे काही फोटो तिने सोशल मीडियावर पोस्ट केले होते. या फोटोंमध्ये पहिल्यांदाच देवोलीनाच्या बाळाचा चेहरा दिसला होता. त्यावरून नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली. यामध्ये काहींनी बाळाच्या वर्णावरून टिप्पण्या केल्या. त्याला देवोलीनानेही बेधडकपणे उत्तर दिलं होतं. आता ट्रोलर्सविरोधात तिने थेट कारवाईच केली आहे.
देवोलीनाने लिहिलं, ‘ज्या लोकांनी माझ्या सात महिन्यांच्या मुलाच्या रंगावरून आणि माझ्या आंतरधर्मीय लग्नावरून ट्रोल केलं, त्यांना तशीच वागणूक मिळाली पाहिजे.’ यासोबतच तिने सायबर पोलिसांकडे कमेंट्सचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे. टीमकडून त्वरित कारवाई झाल्याबद्दल तिने आनंदही व्यक्त केला आहे. सायबर क्राइमने नेटकऱ्यांना, ट्रोलर्सना इशारा दिला असून अभिनेत्रीची माफी मागण्यास सांगितलं आहे. देवोलीनाच्या या कारवाईनंतर काही युजर्सनी त्यांची पोस्ट डिलिट केली आहे. अशा लोकांच्या कमेंट्सचे स्क्रीनशॉट्स काढण्यासाठी देवोलीनाने चाहत्यांकडे मदत मागितली आहे.
View this post on Instagram
‘आता काय म्हणू.. 8900 हून अधिक कमेंट्स. त्यापैकी जरी 2000 कमेंट्स नकारात्मक असल्या तरी 7 हजार सकारात्मक आहेत. इतकं प्रेम दिल्याबद्दल सर्वांचे आभार. माझ्या मुलाचं संरक्षण केल्याबद्दल धन्यवाद. मी इतर सर्व मातांना विनंती करते की त्यांनीसुद्धा अशा प्रकारच्या ट्रोलिंगविरोधात आवाज उठवला पाहिजे आणि योग्य ती कारवाई केली पाहिजे’, अशा शब्दांत तिने चाहत्यांचे आभार मानले आहेत.

देवोलीनाच्या सात महिन्यांच्या मुलाच्या रंगावरून काही नेटकऱ्यांनी हिणवणारे कमेंट्स केले होते. ‘किती काळा दिसतो हा’, ‘छोटा आतंकवादी’ असे कमेंट्स नेटकऱ्यांनी केले होते. त्यावरून देवोलीनाने सडेतोड उत्तरसुद्धा दिलं होतं. ट्रोलर्सचे प्रोफाइल शेअर करून तिने त्यांचा पर्दाफाश केला होता. ‘बाप पर गया है बेटा’ असं म्हणणाऱ्याला देवोलीनाने उत्तर दिलं, ‘का? तू तुझ्या शेजाऱ्यावर गेला आहेस का?’ यापुढे तिने त्याची पोलखोलसुद्धा केली आहे. ‘हा माणूस दिल्लीचा एक इंजीनिअर आहे. तो कोणत्या प्रकारचा इंजीनिअर आहे, हे फक्त त्यालाच माहिती आहे. इंजीनिअर होण्यासाठी इतके पैसे खर्च करूनही त्याचं आयुष्य आणि विचारसरणी सुधारली नाही. कारण जर त्याच्यासारखा इंजीनिअर असेल तर भविष्य कोणत्या दिशेने जातंय, हे तुम्ही समजू शकता.’
