“मी खूप भावूक..”; धनश्रीकडून चहलसोबतच्या घटस्फोटाचं दु:ख व्यक्त?
क्रिकेटर युजवेंद्र चहल आणि त्याची पत्नी धनश्री वर्मा यांच्या घटस्फोटाची प्रक्रिया सुरू आहे. यादरम्यान धनश्रीचा एक व्हिडीओ पापाराझींनी सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. मी आता खूप भावूक झाले आहे, असं ती या व्हिडीओत म्हणताना दिसतेय.

डान्सर, कोरिओग्राफर आणि इन्फ्लुएन्सर धनश्री वर्मा सध्या तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. क्रिकेटर पती युजवेंद्र चहलसोबत तिच्या घटस्फोटाच्या चर्चा आहेत. गेल्या काही काळापासून हे दोघं वेगवेगळे राहत असल्याचंही म्हटलं जात आहे. घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान धनश्रीला नुकतंच एका चित्रपटाच्या प्रीमिअरला पाहिलं गेलं. अभिनेता अभिषेक बच्चनच्या ‘बी हॅपी’ या चित्रपटाच्या प्रीमिअरला ती पोहोचली होती. यावेळी तिने पापाराझींसोबत गप्पासुद्धा मारल्या. या गप्पांदरम्यान धनश्रीने सांगितलं की ती अत्यंत भावूक झाली आहे.
धनश्रीने अभिषेक बच्चनच्या चित्रपटावर प्रतिक्रिया दिली. “मी फार भावूक झाले आहे आता. हा चित्रपट खूपच चांगला आहे”, असं ती म्हणाली. ‘बी हॅपी’ या चित्रपटाची कथा बापलेकाच्या नात्यावर आधारित आहे. या चित्रपटाची कथा खूपच भावूक असल्याचं धनश्रीने म्हटलंय. धनश्रीच्या प्रतिक्रियेचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच त्यावर नेटकऱ्यांनी विविध कमेंट्स करण्यास सुरुवात केली. धनश्रीच्या प्रतिक्रियेचा संदर्भ काहींनी युजवेंद्रच्या घटस्फोटाशी लावला.




View this post on Instagram
‘जेव्हा चहलपासून विभक्त झाली, तेव्हा भावूक झाली नव्हती का’, असा सवाल एका नेटकऱ्याने केला. तर ‘चहलकडून 60 कोटी रुपयांची पोटगी घेऊन आता भावूक झाली आहे’, असा टोला दुसऱ्या युजरने लगावला आहे. युजवेंद्र चहलसोबत धनश्रीच्या घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान अशी अफवा होती की तिने 60 कोटी रुपये पोटगीची मागणी केली. मात्र या अफवा खोट्या असल्याचं धनश्रीच्या कुटुंबीयांकडून स्पष्ट करण्यात आलं होतं. “पोटगीबाबत पसरवल्या जाणाऱ्या तथ्यहीन वृत्तांबद्दल आम्हाला खूप राग आहे. आम्ही हे स्पष्ट करू इच्छितो की धनश्रीकडून अशी कोणतीही रक्कम मागितली गेली नाही. या चर्चांमध्ये काहीच सत्य नाही”, असं त्यांनी म्हटलं होतं.
धनश्री आणि युजवेंद्र यांनी 2020 मध्ये लग्न केलं होतं. घटस्फोटाची प्रक्रिया अद्याप सुरू असल्याची माहिती धनश्रीच्या वकिलांनी दिली. त्याचप्रमाणे घटस्फोटाबाबत कोणतंही वृत्त जाहीर करण्यासाठी तथ्य तपासून पाहण्याची विनंती तिच्या वकिलांनी केली. ‘एबीपी न्यूज’ने दिलेल्या वृत्तानुसार कोर्टातील सुनावणीदरम्यान धनश्री आणि युजवेंद्रने स्पष्ट केलंय की ते गेल्या 18 महिन्यांपासून वेगळे राहत आहेत.