धर्मेंद्र यांची प्रकृती गंभीर अन् दिल्ली ब्लास्ट; बॉलिवूडनेही लावला ब्रेक, घेतला मोठा निर्णय
ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृतीच्या बातम्या आणि दिल्लीतील बॉम्बस्फोटाची दुर्दैवी घटना यामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. सर्व सामान्यांपासून ते अगदी सेलिब्रेटीपर्यंत सर्वांनीच याबद्दल चिंता व्यक्त केली आहे. याचा परिणाम आता बॉलिवूडवरही झालेला दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर बॉलिवूडने एका मोठा निर्णय घेतला आहे.

ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती कशी आहे हे जाणून घेण्यासाठी सामान्यांपासून ते बॉलिवूडपर्यंत सर्वांनाच जाणून घेण्याची उत्सुकता आहे. कारण सर्वजण त्यांची तब्येत सुधारण्यासाठी प्रार्थना करत आहेत. दरम्यान या दोन दिवसात दोन मोठ्या घटनांची माहिती समोर आल्यानं सर्वत्रच गोंधळ उडाला आहे. 10 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी दिल्लीच्या लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटात आठ जणांचा मृत्यू झाला आणि अनेक जण जखमी झाले. आणि त्याचवेळी ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती गंभीर असल्याच्या बातम्या येऊ लागल्या. या दोन्ही घटनांनी सर्वांनाच धक्का दिला आहे.
दोन्ही घटनांमुळे बॉलिवूडमध्येही गोंधळ
पण या दोन्ही घटनांचा परिणाम सर्वसामान्यांवर तर झालाच आहे पण बॉलिवूडमध्येही गोंधळ उडाला आहे.काही दिवसांसाठी का असेना पण ब्रेक लागला आहे. या दोन्ही घटनांची गंभीरता लक्षात घेता बॉलिवूडकडून महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर बॉलिवूडकडून मोठे तीन इव्हेंट रद्द करण्यात आले आहेत. रणवीर सिंगचा चित्रपट “धुरंधर”, धनुष आणि कृती सॅननचा चित्रपट “तेरे इश्क में” आणि हुमा कुरेशीची सीरिज “दिल्ली क्राइम्स 3” चे स्क्रीनिंग हे बॉलिवूडचे महत्त्वाचे कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.
‘धुरंधर’ कार्यक्रम रद्द
रणवीर सिंगच्या ” धुरंधर ” चित्रपटाबद्दल बोलायचे झाले तर, 12 नोव्हेंबर रोजी होणारा ट्रेलर लाँच आता पुढे ढकलण्यात आला आहे. 10 नोव्हेंबर रोजी झालेल्या दिल्ली स्फोटातील मृत व्यक्तींचा आणि कुटुंबियांसाठी दु:ख व्यक्त करत, त्यांच्यासाठीचा आदर व्यक्त करण्यासाठी तसेच आणि धर्मेंद्र यांच्या प्रकृतीच्या चिंतेमुळे, उद्या म्हणजे 12 नोव्हेंबर 2025 रोजी होणाऱ्या “धुरंधर” चित्रपटाचा ट्रेलर लाँच पुढे ढकलण्यात आल्याची घोषणा निर्मात्यांनी केली आहे. ट्रेलर लाँचची नवीन तारीख अद्याप जाहीर केलेली नाही.
“तेरे इश्क में” चित्रपटाचा लाँचिंग सोहळा रद्द
आनंद एल. राय यांच्या दिग्दर्शित “तेरे इश्क में” या चित्रपटाच्या अल्बम लाँचिंगचा कार्यक्रमही आज, 11 नोव्हेंबर रोजी दिल्लीत होणार होता. तथापि, सर्व तयारी पूर्ण झाली असूनही, निर्मात्यांनी हा कार्यक्रमही रद्द केला आहे. निर्मात्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की धर्मेंद्र यांच्या प्रकृतीमुळे तसेच दिल्लीतील दु:खद घटनेमुळे हा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. ए.आर. रहमान, कृती सेनन, धनुष आणि चित्रपटाचे दिग्दर्शक आणि निर्माता “तेरे इश्क में” या अल्बम लाँचला उपस्थित राहणार होते.

Huma Qureshi Post
अभिनेत्री हुमाच्या सीरिजची स्क्रीनिंग कार्यक्रम रद्द
दरम्यान, अभिनेत्री हुमा कुरेशीनेही तिच्या सोशल मीडियावर ‘दिल्ली क्राइम’च्या तिसऱ्या सीझनचे स्क्रीनिंग रद्द केल्याची घोषणा केली. तिच्या अधिकृत अकाउंटवर तिने एक स्टोरी शेअर करताना तिने लिहिले की, “दिल्लीतील दुर्घटनेमुळे आणि धर्मेंद्रजींच्या प्रकृतीच्या पार्श्वभूमीवर, आम्ही आजचे दिल्लीतील स्क्रीनिंग रद्द केले आहे. थोडा संयम बाळगावा लागेल. ‘दिल्ली क्राइम 3’ 13 नोव्हेंबर रोजी प्रसारित होईल आणि आम्हाला आशा आहे की तुम्ही ते पहाल आणि आम्हाला तुमचे प्रेम द्याल.”अशी पोस्ट शेअर केली आहे.
