प्रभास, थलपती विजयला पछाडत 20 वर्षीय अभिनेत्री ठरली नंबर 1 लोकप्रिय स्टार; IMDb कडून यादी जाहीर
थलपती विजय, प्रभास, यामी गौतम, तारा सुतारिया यांसारख्या सेलिब्रिटींना मागे टाकत या 20 वर्षीय अभिनेत्रीने लोकप्रियतेच्या यादीत पहिलं स्थान पटकावलं आहे. तर 'धुरंधर'चा दिग्दर्शक आदित्य धर या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे.

भारतीय चित्रपटसृष्टीत बऱ्याचदा मोठ्या सुपरस्टार्सचं वर्चस्व असतं, पण यावेळी एका 20 वर्षीय अभिनेत्रीने असं काही साध्य केलंय, ज्यामुळे सर्वांनाच तिचा अभिमान वाटतोय. नुकतंच बॉलिवूडमध्ये पदार्पण केलेल्या या अभिनेत्रीने आयएमडीबीच्या (IMDb) लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटींच्या यादीत पहिलं स्थान पटकावलं आहे. आश्चर्याची बाब म्हणजे लोकप्रियतेच्या या शर्यतीत तिने दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील थलपती विजय आणि ग्लोबल स्टार प्रभाससारख्या मोठ्या कलाकारांनाही मागे टाकलं आहे. ही अभिनेत्री दुसरी-तिसरी कोणी नसून ‘धुरंधर’ स्टार सारा अर्जुन आहे. ‘धुरंधर’ या चित्रपटाच्या प्रचंड यशानंतर ती आता आयएमडीबीच्या लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटींच्या यादीत अव्वल स्थानावर आहे. एकीकडे या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर सर्व विक्रम मोडले आहेत, तर दुसरीकडे या चित्रपटामुळे साराची लोकप्रियताही गगनाला भिडली आहे. यामध्ये यलिनाच्या भूमिकेतून तिने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.
बुधवारी आयडीबीने ‘लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटीं’ची साप्ताहिक यादी जाहीर केली. प्रेक्षकांची पसंती आणि चाहत्यांच्या चर्चेवर आधारित ही यादी बनवण्यात येते. याच यादीत गेल्या आठवड्यात सारा अर्जुन दुसऱ्या स्थानी होती. तर या आठवड्यात तिने पहिल्या क्रमांकावर झेप घेतली आहे. साराने थलपती विजय, प्रभास, अगस्त्य नंदा यांसारख्या अभिनेत्यांना मागे टाकलं आहे. या यादीत सारानंतर दुसऱ्या क्रमांकावर ‘धुरंधर’चा दिग्दर्शक आदित्य धर आहे. यामुळे अभिनेत्री आणि दिग्दर्शक दोघंही लोकप्रियतेच्या शिखरावर असल्याचं स्पष्ट होतंय.
View this post on Instagram
या यादीत थलपती विजय आठव्या क्रमांकावर आहे. तर अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा 12 व्या स्थानी आहे. भाग्यश्री बोरसे 15 व्या क्रमांकावर, सिबी चक्रवर्ती 16 व्या स्थानी, यामी गौतम 17 व्या क्रमांकावर आणि प्रभास 19 व्या स्थानी आहे. या यादीत श्रीराम राघवन, तारा सुतारिया, दिनजीत अय्याथन, निविन, सिमर भाटिया यांसारख्या कलाकारांचाही समावेश आहे.
सारा अर्जुन ही अभिनेता राज अर्जुनची मुलगी आहे. मुख्य अभिनेत्री म्हणून ‘धुरंधर’ हा तिचा पहिलाच चित्रपट आहे. याआधी साराने बालकलाकार म्हणून अनेक चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या होत्या. ती काही जाहिरातींमध्येही झळकली होती. दीड वर्षांची असताना साराने एका जाहिरातीत काम केलं होतं. त्यानंतर ती जवळपास 100 जाहिरातींचा भाग बनली. 2001 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘देइवा थिरुमगल’ या तमिळ चित्रपटातून साराने बालकलाकार म्हणून चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवलं होतं. यामध्ये तिने सुपरस्टार विक्रमच्या मुलीची भूमिका साकारली होती. या चित्रपटासाठी तिने सर्वोत्कृष्ट बालकलाकारचा पुरस्कार पटकावला होता. मणिरत्नम दिग्दर्शित ‘पोन्नियिन सेल्वन’ या चित्रपटामध्येही ती दिसली होती. यामध्ये तिने नंदिनीच्या (ऐश्वर्या राय) बालपणाची भूमिका साकारली होती.
