Dhurandhar First Review: क्षणोक्षणी थरार अन् थक्क करणारे ट्विस्ट; ‘धुरंधर’चा पहिला रिव्ह्यू समोर
'धुरंधर' या चित्रपटाचा पहिला रिव्ह्यू समोर आला आहे. आदित्य धर दिग्दर्शित या चित्रपटात रणवीर सिंह, संजय दत्त, अक्षय खन्ना, आर. माधवन यांच्या भूमिका आहेत. वास्तविक कथेवर हा चित्रपट आधारित असल्याचं कळतंय.

रणवीर सिंहसह तगडी स्टारकास्ट असलेला ‘धुरंधर’ हा बहुचर्चित चित्रपट 5 डिसेंबर रोजी थिएटर्समध्ये प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाच्या टीझर आणि ट्रेलरला प्रेक्षकांकडून जबरदस्त प्रतिसाद मिळाला आहे. ‘धुरंधर’ची अॅडव्हान्स बुकिंगसुद्धा चांगली होत आहे. अशातच या चित्रपटाचा पहिला रिव्ह्यू समोर आला आहे. ‘उरी : द सर्जिकल स्ट्राइक’ फेम दिग्दर्शक आदित्य धरने या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. आदित्यने पुन्हा एकदा पाकिस्तान आणि दहशतवाद यांवर आधारित कथा प्रेक्षकांच्या भेटीला आणली आहे आणि त्यात मल्टीस्टारचा तडकासुद्धा आहे. ‘धुरंधर’ हा एक स्पाय ड्रामा आहे, ज्यामध्ये रणवीर सिंह एक एजंट बनून पाकिस्तानात जातो. तिथे त्याला अर्जुन रामपाल, संजय दत्त आणि अक्षय खन्ना हे तीन खलनायक भेटतात. जबरदस्त अॅक्शन असलेल्या या चित्रपटाच्या कथानकात बरेच रंजक आणि थक्क करणारे ट्विस्ट आहेत.
प्रसिद्ध चित्रपट समिक्षक उमैर संधूने ‘धुरंधर’चा पहिला रिव्ह्यू सांगितला आहे. हा चित्रपट पाहिल्यानंतर त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहिली आहे. ‘हा चित्रपट तुम्हाला शॉक आणि सरप्राइजसुद्धा देणार आहे. हा चित्रपट आऊट ऑफ सिलॅबस (चौकटीबाहेरचा) आहे. अत्यंत पॉवरफुल आणि पॉवर पॅक्ड चित्रपट आहे. तीन तासांत जबरदस्त डायलॉगबाजी, अॅक्शन स्टंट्स आणि खिळवून ठेवणारी पटकथा पहायला मिळते. रणवीर सिंहने जबरदस्त कमबॅक केला आहे. तर संजय दत्त, अक्षय खन्ना यांनी जबरदस्त स्टंट केले आहेत. क्लायमॅक्स आणि चित्रपटाच्या शेवटचा अर्धा तास तुम्हाला थक्क करतो. हेच या चित्रपटाचं वैशिष्ट्य आहे. बॉलिवूडचे सोनेरी दिवस परत आले’, असं त्यांनी या पोस्टमध्ये लिहिलंय.

सॅकनिल्कने दिलेल्या वृत्तानुसार, ‘धुरंधर’ या चित्रपटाचे 58 हजारांहून अधिक तिकिट्स विकले गेले आहेत. यातून 4.27 कोटी रुपयांची कमाई झाली आहे. हा चित्रपट पहिल्याच दिवशी 15 कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई करू शकतो, असा अंदाज आहे.
हा चित्रपट वास्तविक कथेवर आधारित असल्याचं म्हटलं जात आहे. यामध्ये अर्जुन रामपाल हा मेजर इक्बाल नावाच्या एका आयएसआय एजंटच्या भूमिकेत आहे. त्याच्या भूमिकेची ओळखच ट्रेलरमध्ये अत्यंत हिंसक पद्धतीने करून देण्यात आली आहे. तर आर. माधवनने अजय सन्यालची भूमिका साकारली आहे. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्यापासून त्याची भूमिका प्रेरित आहे. अक्षय खन्ना यामध्ये रहमान डकाईच्या आणि संजय दत्त हा एसपी चौधरी अस्लमच्या भूमिकेत आहे.
