कतरिना-विकीच्या मुलाचा पहिला फोटो समोर? व्हायरल पोस्टमागचं सत्य काय?
अभिनेत्री कतरिना कैफने 7 नोव्हेंबर 2025 रोजी मुलाला जन्म दिला. आता मुलाच्या जन्माच्या 13 दिवसांनंतर सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होत आहे. हा फोटो कतरिना आणि विकी कौशलच्या बाळाचा असल्याचं म्हटलं जात आहे. यामागचं नेमकं सत्य काय, ते जाणून घेऊयात..

अभिनेता विकी कौशल आणि कतरिना कैफ ही बॉलिवूडमधल्या लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे. हे दोघं सध्या त्यांच्या आयुष्यातील सर्वांत सुंदर क्षणांना जगत आहेत. 7 नोव्हेंबर 2025 रोजी कतरिना मुलाला जन्म दिला असून कौशल कुटुंबीयांमध्ये आनंदाचं आणि जल्लोषाचं वातावरण आहे. कतरिना आणि विकीच्या मुलाला पाहण्यासाठी चाहते उत्सुक असतानाच सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होत आहे. बाळाच्या जन्मानंतर 13 दिवसांनी या दोघांनी हा फोटो शेअर केल्याचं म्हटलं जात आहे. कतरिना आणि विकीचा त्यांच्या मुलासोबतचा पहिला फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याची जोरदार चर्चा आहे.
या व्हायरल फोटोमध्ये विकी कौशल बाळाला त्याच्या कुशीत घेतल्याचं पहायला मिळतंय आणि कतरिना त्याच्या बाजूला बसली आहे. तर दुसऱ्या फोटोमध्ये कतरिनाच्या कुशीत ते बाळ पहायला मिळतंय. या फोटोमध्ये तिच्यासोबत तिची सासू म्हणजेच विकीची आईसुद्धा आहे. आणखी एका फोटोमध्ये विकी कौशलची आई बाळासोबत दिसतेय आणि त्यांच्यासोबत कतरिना, विकी उभे आहेत. या फोटोंवर चाहते लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. परंतु या व्हायरल फोटोंमागचं सत्य काही वेगळंच आहे. विकी आणि कतरिनाच्या बाळाचे हे सर्व फोटो AI जनरेटेड म्हणजेच बनावट आहेत. हल्ली एआयच्या मदतीने बरेच फेक फोटो बनवले जातात. कतरिना आणि विकीचे बाळासोबतचे हे सर्व व्हायरल फोटोसुद्धा एआय जनरेटेड आणि फेक आहेत. कारण विकी किंवा कतरिनाने अद्याप त्यांच्या बाळाचा कोणताच फोटो सोशल मीडियावर पोस्ट केलेला नाही.
View this post on Instagram
23 सप्टेंबर 2025 रोजी कतरिनाने प्रेग्नंसी जाहीर केली होती. या फोटोमध्ये तिचा बेबी बंप सहज पहायला मिळत होता. त्यानंतर तिने सोशल मीडियावर फारसे फोटो पोस्ट केले नाहीत. बाळाच्या जन्मानंतर दोघांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहित चाहत्यांना गुड न्यूज दिली. ‘आमच्या आनंदाचं गाठोडं आलं आहे. खूप प्रेम आणि कृतज्ञतेच्या भावनेनं आम्ही आमच्या मुलाचं स्वागत करत आहोत. 7 नोव्हेंबर 2025.. कतरिना आणि विकी’, अशी पोस्ट त्यांनी लिहिली होती.
View this post on Instagram
कतरिना कैफ आणि विकी कौशल यांनी 2021 मध्ये राजस्थानमध्ये लग्नगाठ बांधली. राजस्थानमध्ये पार पडलेल्या या लग्नसोहळ्याला इंडस्ट्रीतील मोजकेच पाहुणे उपस्थित होते. लग्नापूर्वी या दोघांनी आपल्या नात्याबद्दल कमालीच गुप्तता पाळली होती.
