दीपिकाची स्टेज 2 लिव्हर कॅन्सरशी लढाई सोपी नाही; शस्त्रक्रिया ढकलली पुढे
अभिनेत्री दीपिका कक्कर सध्या स्टेज 2 लिव्हर कॅन्सरशी झुंज देतेय. या कॅन्सरची लक्षणे काय असतात आणि दीपिकाची प्रकृती आता कशी आहे, याबद्दल जाणून घेऊयात. दीपिकावर पुढील काही दिवसांत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.

प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री आणि ‘बिग बॉस 12’ची विजेती दीपिका कक्करला स्टेज 2 लिव्हर (यकृत) कॅन्सरचं निदान झालं आहे. सोशल मीडियाद्वारे तिने याबद्दची माहिती दिली. बऱ्याच दिवसांपासून दीपिकाला पोटाच्या खाली उजव्या बाजूला प्रचंड वेदना जाणवत होत्या. गॉल ब्लॅडरमधील स्टोनमुळे या वेदना होत असतील असं तिला वाटलं होतं. सुरुवातीला सिटी स्कॅन केल्यानंतर लिव्हरमध्ये टेनिस बॉलच्या आकाराचा ट्युमर असल्याचं स्पष्ट झालं होतं. नंतर हाच ट्युमर कॅन्सरचा असल्याचं डॉक्टरांनी सांगितल्यावर दीपिकाच्या पायाखालची जमीनच सरकली. लिव्हर कॅन्सर कशामुळे होतं, त्याची लक्षणे काय असतात याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात..
लिव्हर कॅन्सर म्हणजे काय?
यकृताचा कर्करोग हा एक गंभीर आजार आहे, ज्यामध्ये यकृताच्या पेशी वेगाने आणि नियंत्रणाशिवाय वाढू लागतात. यामुळे यकृतामध्ये गाठ किंवा ट्युमर तयार होऊ लागतो. दुसऱ्या टप्प्यात हा ट्युमर मोठा होऊ शकतो आणि यकृताच्या आत असलेल्या रक्तवाहिन्यांमध्ये पसरू शकतो. या टप्प्यावर कॅन्सर सहसा शरीराच्या इतर भागात पसरत नाही. परंतु हे स्टेज 1 पेक्षा निश्चितच गंभीर आहे. तरीही स्टेज 3 आणि 4 इतकं हे धोकादायक मानलं जात नाही.
दीपिकावर लगेच शस्त्रक्रिया का झाली नाही?
दीपिकाला सध्या ताप आणि कपचा त्रास जाणवत आहे. त्यामुळे तिची शस्त्रक्रिया काही काळासाठी पुढे ढकलण्यात आली आहे. परंतु डॉक्टरांनी तिच्यावर उपचार प्रक्रिया सुरू केली आहे. तिने चाहत्यांना तिच्या आरोग्यासाठी प्रार्थना करण्याचं आवाहन केलं आहे. मी यातून पूर्ण बरी होईन, असा आत्मविश्वास तिने व्यक्त केला आहे.
स्टेज 2 चा लिव्हर कॅन्सर किती धोकादायक?
स्टेज 2 हा मध्यम पातळीचा कॅन्सर मानला जातो. या टप्प्यात शस्त्रक्रिया, केमोथेरपी किंवा रेडिएशन थेरपी असे अनेक उपचाराचे पर्याय उपलब्ध आहेत. जर हा आजार लवकर निदान झाला आणि त्यावर योग्य उपचार दिले तर त्यावर मात करणं शक्य आहे.
लिव्हर कॅन्सरची लक्षणं कशी ओळखावी?
सुरुवातीला लिव्हरच्या कॅन्सरचं निदान करणं कठीण असू शकतं. कारण त्याची लक्षणे सहसा किरकोळ किंवा सर्वसामान्य असतात. परंतु जर ही लक्षणे कायम राहिली तर डॉक्टरांचा सल्ला घेणं महत्त्वाचं आहे.
- पोटाच्या वरच्या उजव्या भागात वेदना किंवा दाब
- अचानक वजन कमी होणं
- भूक न लागणे
- सतत थकवा जाणवणं
- डोळे किंवा त्वचा पिवळी पडणे
- गडद रंगाचं मूत्रविसर्जन
- पोटात सूज येणं किंवा द्रव साठणं
टीप- इथं दिलेली माहिती सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे. कोणत्याही सूचना अंमलात आणण्यापूर्वी तुम्ही संबंधित तज्ज्ञांचा किंवा डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.
