ती काही बोलली, मीसुद्धा सुनावलं..; मल्लिका शेरावतसोबतच्या वादावर इमरान हाश्मीने सोडलं मौन

मोठ्या पडद्यावर हिट जोडी बनल्यानंतर इमरान हाश्मीने मल्लिका शेरावतबद्दल मोठं वक्तव्य केलं होतं. करण जोहरच्या 'कॉफी विथ करण' या शोमध्ये इमरानने मल्लिकाला 'वाईट किसर' म्हटलं होतं. तब्बल 20 वर्षांनंतर ही लोकप्रिय जोडी एका रिसेप्शनदरम्यान एकत्र दिसली होती.

ती काही बोलली, मीसुद्धा सुनावलं..; मल्लिका शेरावतसोबतच्या वादावर इमरान हाश्मीने सोडलं मौन
Mallika Sherawat and Emraan Hashmi
Image Credit source: Instagram
| Updated on: Jul 07, 2024 | 3:28 PM

अभिनेता इमरान हाश्मी आणि मल्लिका शेरावत यांनी तब्बल 20 वर्षांनंतर आपापसांतील भांडण मिटवलं. 2004 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘मर्डर’ या चित्रपटात दोघांनी एकत्र काम केलं होतं. या चित्रपटातील त्यांच्या केमिस्ट्रीने प्रेक्षकांचं लक्ष वेधलं होतं. त्यातील इंटिमेट सीन्सची जोरदार चर्चा झाली होती. मात्र या चित्रपटानंतर त्यांच्यात काही वाद झाले आणि पुन्हा त्यांनी एकत्र काम केलंच नाही. यावर्षी एप्रिल महिन्यात इमरान आणि मल्लिका यांची एका लग्नाच्या रिसेप्शनमध्ये समोरासमोर भेट झाली. यावेळी पापाराझींसमोर दोघांनी एकत्र फोटोसाठी पोझ दिले. त्याचप्रमाणे गळाभेट घेऊन त्यांनी वाद मिटल्याचंही स्पष्ट केलं. मल्लिकासोबतच्या या वादावर अखेर इमरानने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत स्पष्टीकरण दिलं आहे.

“आमची भेट खूपच चांगली होती आणि मी तिला बऱ्याच वर्षांनंतर भेटलो होतो. ‘मर्डर’ हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर आमच्या जेमतेम काही भेटीगाठी झाल्या होत्या. त्यानंतर अशी भेट आमची कधीच झाली नव्हती. त्यावेळी आम्ही तरुण आणि मूर्ख होतो. आयुष्यात असा एक टप्पा येतो जेव्हा तुमची निर्णय घेण्याची क्षमता खूप मर्यादित असते आणि तुम्ही आवेषाने वागता. त्यावेळी ती काही गोष्टी बोलली, मी काही गोष्टी बोललो. जे अर्थातच चांगलं नव्हतं. त्या सर्व गोष्टी घडून गेल्या आहेत आणि आम्हीसुद्धा त्या मागे सोडून आयुष्यात पुढे निघून आलो. आता मल्लिका माझ्याशी अत्यंत आपुलकीने भेटली आणि मीसुद्धा तिला तितक्याच आपुलकीने भेटलो”, असं इमरान म्हणाला.

याच मुलाखतीच्या ‘रॅपिड फायर राऊंड’दरम्यान जेव्हा इमरानला अशा एका सहकलाकाराचं नाव विचारण्यात आलं, ज्याच्या किंवा जिच्यासोबत त्याला पुन्हा काम करायला आवडेल, तेव्हा त्याने क्षणाचाही विलंब न करता मल्लिकाचं नाव घेतलं. 2021 मध्ये मंदिरा बेदीच्या ‘द लव्ह लाफ लाइव्ह शो’मध्ये मल्लिकाने खुलासा केला होता की तिच्या अनेक सहकलाकारांचे तिच्याशी वाद होते. “यात सर्वांत हास्यास्पद वाद इमरान हाश्मीसोबत होता. मर्डर या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान आमच्यात गैरसमज निर्माण झाले होते. ते खरंच बालिश होतं. त्यानंतर आमचा एकमेकांशी संपर्क तुटला आणि ते खरंच वाईट होतं. कारण तो खूप चांगला सहकलाकार होता”, असं ती म्हणाली होती.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us