दिग्दर्शक विक्रम भट्ट यांची आई वर्षा भट्ट यांचे निधन, सिनेसृष्टीवर शोककळा
प्रसिद्ध दिग्दर्शक विक्रम भट्ट यांच्या आई वर्षा भट्ट यांचे निधन झाले आहे. वर्सोवा येथील स्मशानभूमित त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

Varsha Bhatt Died : बॉलिवुडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक विक्रम भट्ट यांची आई वर्षा भट्ट यांचे वयाच्या 75 व्या वर्षी शनिवारी (6 सप्टेंबर) दुख:द निधन झाले. मिळालेल्या माहितीनुसार गेल्या बऱ्याच दिवसांपासून त्या आजारी होत्या. वर्षा भट्ट यांच्या जाण्याने भट्ट कुटुंबीयांवर दुखा:चा डोंगर कोसळला आहे. शनिवारी दुपारी 2 वाजता वर्सोवो येथील स्मशानभूमित वर्षा भट्ट यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी भट्ट कुटुंबीय, नातेवाईक तसेच आप्तेष्ट उपस्थित होते.
वर्षा भट्ट होत्या आजारी
मिळालेल्या माहितीनुसार वर्षा भट्ट गेल्या बऱ्याच दिवसांपासून आजारी होत्या. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार चालू होते. त्या काही दिवसांपासून व्हेंटिलेटरवर होत्या. त्या बऱ्या व्हाव्यात यासाठी डॉक्टरांनी बरेच प्रयत्न केले. मात्र उपचाराला साथ न दिल्याने त्यांची प्राणज्योत मालवली. शनिवारी वर्सोवा येथील स्मशानभूमित त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. हे वृत्त समजताच बॉलिवुड जगतातून हळहळ व्यक्त करण्यात येत असून विक्रम भट्ट यांच्याप्रती संवेदना व्यक्त केल्या जात आहेत.
वर्षा भट्ट यांचा होता मोठा आधार
विक्रम भट्ट यांचे त्यांच्या आईवर जीवापाड प्रेम होते. आज विक्रम भट्ट बॉलिवुडमध्ये नावाजलेले दिग्दर्शक आहेत. पण या यशामागे त्यांची आई वर्षा भट्ट यांचे फार मोठे योगदान आहे. विक्रम भट्ट यांना त्यांचे स्वप्न साकार करण्यासाठी वर्षा भट्ट यांनी मोठा आधार दिला होता. वर्षा भट्ट या सिनेमॅटोग्राफर प्रवीण भट्ट यांची पत्नी होत्या. प्रवीण भट्ट यांनी उमराव जान, मासूम, अग्निपथ, अर्थ, आशिकी, राज यासारख्या चित्रपटांचे चित्रिकरण केलेले आहे.
विक्रम भट्ट यांच्या करिअरची सुरुवात कशी झाली?
गेल्या 33 वर्षांपासून विक्रम भट्ट हे बॉलिवुडमध्ये दिग्दर्शक म्हणून काम करत आहेत. त्यांनी 1992 साली जानम हा पहिला सिनेमा दिग्दर्शित केला. 2015 साली त्यांनी खामोशिया या चित्रपटात पहिल्यांदा अभिनय केला. विक्रम भट्ट यांनी आतापर्यंत अनेक भयपटांचे दिग्दर्शन केलेले आहे. मदहोश, गुनहगार, गुलाम यासारखे त्यांचे चित्रपट सुपरहिट ठरले. विक्रम भट्ट यांनी राज, 1920, शापित, लव्ह गेम्स, फुटपाथ यासारख्या प्रसिद्ध चित्रपटांचे दिग्दर्शन केलेले आहे. येत्या 21 नोव्हेंबर रोजी त्यांचा हॉन्टेड : घोस्ट ऑफ द पास्ट हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
