वडिलांच्या एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरमुळे अभिनेत्रीला लग्नाची भीती; पहिल्यांदाच केला खुलासा
बिग बॉसच्या घरात कुनिका सदानंद आणि फरहाना भट्ट एकमेकांशी गप्पा मारताना दिसल्या. यावेळी फरहाना तिच्या खासगी आयुष्याबद्दल मोकळेपणे व्यक्त होते. फरहाना पहिल्यांदाच तिच्या वडिलांच्या एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरचा खुलासा करते.

‘बिग बॉस 19’च्या घरात अभिनेत्री कुनिका सदानंद आणि फरहाना भट्ट यांच्यात अनेकदा भांडणं झाली. परंतु नुकत्याच पार पडलेल्या एपिसोडमध्ये आता दोघी एकमेकांच्या खासगी आयुष्याबद्दल मोकळेपणे व्यक्त होताना दिसल्या. कुनिकाशी बोलताना फरहानाने तिच्या आईवडिलांच्या घटस्फोटाविषयी सांगितलं. फरहानाच्या इंडस्ट्रीत काम करण्याच्या विरोधात तिचे कुटुंबीय होते. “माझे आजोबा अत्यंत प्रतिष्ठित होते. आमच्या घरातली मुलगी टीव्हीवर जाणार नाही, असं त्यांचं मत होतं. यावरून त्यांनी खूप वाद घातला होता. फक्त आईने माझी साथ दिली होती”, असं ती म्हणाली.
कुनिकाने फरहानाला तिच्या वडिलांबद्दल विचारलं. त्यावर ती पुढे म्हणाली, “माझे आईवडील विभक्त झाले आहेत. माझ्या वडिलांनी दुसरं लग्न केलंय. त्यांचं कोणासोबत तरी एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर होतं. त्यामुळे आईने घटस्फोट घेतला. जेव्हा ते दोघं विभक्त झाले, तेव्हा माझी आई फक्त 25-26 वर्षांची होती. त्यानंतर तिने दुसरं लग्न केलं नाही. मी कधीकधी मस्करीत म्हणते मी माझा बाप फार शौकीन होता.”
View this post on Instagram
“मी माझ्या वडिलांना कधीच पाहिलं नव्हतं. फक्त फोटोंमध्ये त्यांचा चेहरा पाहिला होता. मी कधी त्यांना भेटलेसुद्धा नाही. त्यांनी माझ्याशी भेटण्याचा प्रयत्न केला होता. परंतु माझ्या आईने कधीच त्यांची भेट घेऊ दिली नाही. कारण त्यावेळी बरेच केसेस सुरू होते. माझ्या आईच्या अनुभवावरून मला लग्न ही गोष्टच फार भीतीदायक वाटते. ही अत्यंत घाबरवणारी गोष्ट आहे”, अशा शब्दांत ती व्यक्त झाली.
‘बिग बॉस 19’च्या आगामी एपिसोडमध्ये प्रेक्षकांना आणखी ड्रामा पहायला मिळणार आहे. कारण यावेळी ओपन नॉमिनेशन्स पार पडणार आहेत. या नॉमिनेशन टास्कदरम्यान घरातील स्पर्धकांमध्ये कडाक्याची भांडणं होणार आहेत. या टास्कसाठी गार्डन एरियाचं रुपांतर समुद्रासारख्या सेटमध्ये करण्यात आलंय आणि प्रत्येक स्पर्धकाची एक बोट असते. नियमांनुसार जर एखाद्या स्पर्धकाच्या बोटीवर तीन मिसाइल्सचं आक्रमण झालं, तर ते आपोआप नॉमिनेट होतील. यामुळे स्पर्धकांवर मोठा दबाव येतो. दुसऱ्यांना कशा पद्धतीने नॉमिनेट करता येईल, यासाठी चुरस रंगते.
