Kunickaa Sadanand : वडिलांसोबतच्या अफेअरवरून मुलाने थेट अभिनेत्रीला सुनावलं; ‘माझ्या आईने..’
Kunickaa Sadanand : 'बिग बॉस 19'मधील अभिनेत्री कुनिका सदानंद आणि गायक कुमार सानू यांचं अफेअर तुफान चर्चेत होतं. यावरून आता कुमार सानूच्या मुलाने कुनिकाला टोला लगावला आहे. इन्स्टाग्रामवर त्याने एक व्हिडीओ पोस्ट केला आहे.

Kunickaa Sadanand : ‘बिग बॉस 19’मध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झालेली अभिनेत्री कुनिका सदानंद सध्या चांगलीच चर्चेत आहे. सलमान खानच्या या शोमध्ये तिच्या खासगी आयुष्याविषयी बरेच खुलासे झाले आहेत. नव्वदच्या दशकात कुनिका ही प्रसिद्ध गायक कुमार सानूसोबत रिलेशनशिपमध्ये होती. विशेष म्हणजे कुमार सानू त्यावेळी विवाहित होते. कुनिका आणि कुमार सानू लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये अगदी नवरा-बायकोसारखेच राहायचे. याबद्दलचा खुलासा खुद्द कुनिकाने एका मुलाखतीत केला होता. तर कुनिकाचा मुलगा अयान याने त्यांच्या नात्याला ‘टॉक्सिक’ (विषारी) असं म्हटलंय. आपल्या वडिलांची बदनामी होत असल्याचं पाहून आता कुमार सानूच्या मुलाने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये तो कुनिका आणि तिचा मुलगा अयानवर निशाणा साधताना दिसतोय.
काय म्हणाला जान कुमार सानू?
“माझ्या आईने लहानपणापासूनच मला खूप चांगल्या गोष्टी शिकवल्या आहेत. यापैकी आयुष्यभराची एक शिकवण अशीही आहे की खरं बोला. खरं बोलल्याने कदाचित त्यावेळी तुम्हाला ओरडा बसेल किंवा तुम्हाला नाकारलं जाईल, पण तो मुद्दा तिथेच संपून जाईल. सत्य म्हटल्याने तुमचं मन हलकं होईल, त्यावर कोणताही भार राहणार नाही. परंतु एक खोटं बोलण्यासाठी तुम्हाला 2 गोष्टी खोट्या बोलाव्या लागतात. त्या दोनाचे दहा कधी होतात कळत नाही. दहा खोट्या गोष्टी लपवण्यासाठी तुम्हाला 100 वेळा खोटं बोलावं लागतं. यामुळे तुम्ही सर्रास खोटं बोलणारे बनता. मग तुम्हाला लक्षात ठेवावं लागतं की कोणाला कोणती गोष्ट खोटी सांगितली होती? यामुळेच खरं बोललं पाहिजे”, असं तो म्हणाला.
View this post on Instagram
“तुम्ही कितीही डबेवाले, टिफिनवाले, चहावाले यांच्याकडून स्वत:चा प्रचार (PR) करून घेतला तरी सत्य समोर येईलच. माझ्या आईने असं आयुष्य जगलं नाही, ज्यामुळे मला माझी प्रतिमा ठीक करावी लागेल. वडिलांचं सांगू शकत नाही, पण हो.. आईने असं काहीच केलं नाही. हे मम्मीचं सत्य आहे”, अशा शब्दांत जानने कुनिका आणि तिच्या मुलाला अप्रत्यक्षपणे सुनावलं आहे.
या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये त्याने ‘डॅमेज कंट्रोल करण्यासाठी पीआर प्रचार. अत्यंत जुनी कथा. संपूर्ण व्हिडीओ पहा मित्रांनो’, असं लिहिलंय त्याचसोबत हॅशटॅगमध्ये बिग बॉसच्याही उल्लेख केला आहे. याआधी जानने थेट कुनिकावर निशाणा साधला होता.
