फक्त 24 तासात तयार झालेलं गणपतीचं हे गाणं, ठरलं प्रचंड लोकप्रिय, आजही…
गणेश चतुर्थीच्या दिवशीचं सुपरहिट गाणं, जे फक्त 24 तासांमध्ये करण्यात आलेलं तयार. तरी देखील प्रदर्शित होताच ठरलं लोकप्रिय. तुम्ही ऐकलं का?

गायिका नीती मोहनच्या आवाजातील वेगळीच गोडी प्रेक्षकांना नेहमीच भावते. रोमँटिक गाण्यांपासून भक्तिगीतांपर्यंत विविध प्रकारच्या संगीताला आपल्या सुरांनी सजवणाऱ्या नीतीने गणेश चतुर्थीच्या निमित्ताने खास गाणं चाहत्यांच्या भेटीला आणलं आहे. ‘बाप्पा घर आए’ असं या नव्या गाण्याचं नाव असून, बाप्पाच्या आगमनाचा आनंद, कुटुंबासोबत पूजा करण्याचा उत्साह आणि गणेशोत्सवाची रंगत या गाण्यात अनुभवायला मिळते.
विशेष म्हणजे, ‘बाप्पा घर आए’ हे गाणं अवघ्या 24 तासांत तयार झालं आहे. गाणं लिहिण्यापासून त्याची रेकॉर्डिंग आणि म्युझिक व्हिडीओचं शूटिंग करण्यापर्यंतची संपूर्ण प्रक्रिया केवळ एका दिवसात पूर्ण झाली. इतक्या कमी वेळात गाणं तयार झाल्याचं स्वतः नीती मोहनलाही आश्चर्य वाटत असून ती याला बाप्पाचा आशीर्वाद मानते.
‘बाप्पा घर आए’
गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर तयार करण्यात आलेल्या या गाण्यात बाप्पाच्या घरी आगमनाचा उत्साह सुंदर पद्धतीने मांडण्यात आला आहे. ढोल, नगारे आणि बासरीच्या सुरांनी गाण्याला उत्सवी आणि भव्य रंगत दिली आहे. बाप्पाच्या स्वागतासोबतच कुटुंबीय, मित्र आणि नातेवाईक एकत्र येऊन सण साजरा करतानाचा आनंदही या गाण्यातून व्यक्त होतो.
याबद्दल बोलताना नीतीने सांगितलं की, गणेश चतुर्थी हा अनेक कुटुंबांसाठी अत्यंत खास सण आहे. बाप्पाच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहिली जाते. पूजा, आरती, मित्र-नातेवाईकांच्या भेटीगाठी, मिठाई आणि कुटुंबासोबत घालवलेले आनंदाचे क्षण या सगळ्यांचीच या सणामध्ये खास जागा असते. ‘बाप्पा घर आए’मधून हाच आनंद आणि आपलेपणाचा अनुभव श्रोत्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला असल्याचं नीतीने सांगितलं.
24 तासात पूर्ण झालेलं गाणं
गाण्याच्या निर्मितीबाबत नीती म्हणाली की, आधी गाणं लिहिलं गेलं, त्यानंतर रेकॉर्डिंग करण्यात आलं आणि लगेचच म्युझिक व्हिडीओचं शूटिंगही पूर्ण झालं. हे सर्व अवघ्या 24 तासांत घडलं. तिच्या मते, आयुष्यात काही गोष्टींचं जास्त नियोजन करण्याची गरज नसते; त्या योग्य वेळी आपोआप घडत जातात. या गाण्याच्या बाबतीतही असंच काहीसं घडलं.
‘बाप्पा घर आए’ला शान लोचन सिंह यांनी संगीत दिलं असून कनिष्क सहर यांनी गाण्याचे बोल लिहिले आहेत. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तयार करण्यात आलेलं हे गाणं सध्या विविध म्युझिक स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे.
