‘कांतारा’ फेम अभिनेत्यासोबत गिरीजा ओकचा इंटिमेट सीन चर्चेत; तो सतत एकच प्रश्न विचारत होता, “तू..”
मराठमोळी अभिनेत्री गिरीजा ओक नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिच्या वेब सीरिजमधल्या इंटिमेट सीन्सबद्दल मोकळेपणे व्यक्त झाली. 'कांतारा- चाप्टर 1' फेम अभिनेत्यासोबत तिने हे इंटिमेट सीन्स दिले आहेत. यावेळी अभिनेता सतत तिला एकच प्रश्न विचारत होता, असं तिने सांगितलं.

मराठमोळी अभिनेत्री गिरीजा ओक गोडबोले लवकरच ‘थेरपी शेरपी’ या वेब सीरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सीरिजमध्ये तिच्यासोबत ‘कांतारा : चाप्टर 1’मधील अभिनेता गुलशन देवैय्या मुख्य भूमिकेत आहे. ही वेब सीरिज विशेष चर्चेत येण्यामागचं कारण म्हणजे त्यातील दोघांचे इंटिमेट सीन्स. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत गिरीजा या इंटिमेट सीन्सच्या शूटिंगविषयी मोकळेपणे व्यक्त झाली. यावेळी तिने गुलशनच्या प्रोफेशनलिज्म आणि संवेदनशील स्वभावाचं तोंडभरून कौतुक केलं आहे. त्याच्यासोबत इंटिमेट सीन्स शूट करताना अजिबात संकोचलेपणा वाटला नसल्याचं तिने स्पष्ट केलं.
‘द लल्लनटॉप’ला दिलेल्या मुलाखतीत गिरीजा म्हणाली, “तुम्ही कितीही पूर्वतयारी केली तरी असे फार कमी लोक असतात, ज्यांच्यासोबत तुम्हाला थोडंही अस्वस्थ वाटत नाही. गुलशन अशाच लोकांपैकी एक आहे. त्याने त्याच्या व्हॅनिटी व्हॅनमधून तीन-चार उशा आणल्या. एक लहान, एक मोठी, एक मऊ आणि एक थोडी कडक. मला सर्वांत जास्त आरामदायक वाटणारी उशी निवडण्यास त्याने सांगितलं. शूटिंगदरम्यान त्याने मला किमान 16 ते 17 वेळा विचारलं असेल की, तू ठीक आहेस का? शूटिंगदरम्यान जेव्हा मला एका उशीचा त्रास होऊ लागला, तेव्हा ती अॅडजस्ट करण्यातही त्याने मदत केली.”
View this post on Instagram
“तुला अधिक त्रास होत असेल तर आपण ही उशी काढून टाकुयात, मला काहीच समस्या नाही.. असं तो म्हणाला. त्याचं हे वागणं आणि त्याने दिलेला आदर पाहून मी खूप प्रभावित झाले. त्याच्या जागी जर दुसरा कोणता अभिनेता असता तर कदाचित कठीण वाटलं असतं. पण गुलशनने प्रत्येक गोष्टीची काळजी घेतली होती. आता मी त्याबद्दल मोकळेपणे बोलू शकते. कारण त्याच्यासोबत मला खूप सुरक्षित वाटत होतं”, असं गिरीजाने पुढे सांगितलं.
‘थेरपी शेरपी’ या आगामी वेब सीरिजमध्ये गुलशन देवैया आणि गिरीजा ओक गोडबोले यांच्या मुख्य भूमिका आहेत. ही सीरिज मानवी नातेसंबंध आणि गुंतागुंतीच्या भावना यांना अधोरेखित करते. या सीरिजच्या प्रदर्शनाची तारीख अद्याप समोर आली नाही.
