3 महिन्यांच्या मुलीने हातावरच गमावले प्राण..; गोविंदाच्या पत्नीचा मोठा खुलासा
अभिनेता गोविंदाची पत्नी सुनिता अहुजाने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिच्या आयुष्यातील सर्वांत कठीण काळाचा खुलासा केला. सुनिताने जेव्हा दुसऱ्या मुलीला जन्म दिला, तेव्हा तिला अनेक समस्यांचा सामना करावा लागला होता.

अभिनेता गोविंदाची पत्नी सुनिता अहुजाने काही महिन्यांपूर्वीच युट्यूबवर स्वत:चा चॅनल सुरु केला. त्यावर ती विविध व्लॉग्स पोस्ट करताना दिसते. या व्लॉग्समधून आणि विविध मुलाखतींमधून सुनिता नेहमी तिच्या खासगी आयुष्याबद्दल मोकळेपणे व्यक्त होत असते. नुकतंच उषा काकडे यांच्याशी बोलताना सुनिताने तिच्या आयुष्यातील अत्यंत कठीण काळाचा खुलासा केला. ती आठवण आणि त्या वेदना आयुष्यभरासाठी मनात राहणार असल्याचं तिने म्हटलंय. सुनिता आणि गोविंदा यांना एक मुलगी आणि एक मुलगा आहे. याशिवाय तिने आणखी मुलीला जन्म दिला होता. परंतु तिचा जन्म प्रीमॅच्युअर झाला होता.
सुनिता म्हणाली, “जेव्हा माझ्या दुसऱ्या मुलीचा जन्म झाला, तेव्हा ती प्रीमॅच्युअर होती. ती फक्त तीन महिनेच जगू शकली. तिच्या फुफ्फुसांची पूर्ण वाढ झाली नव्हती. एके रात्री तिला श्वास घेताना खूप त्रास जाणवत होता. अखेर तिने माझ्या हातांवरच प्राण सोडले होते. माझ्या आयुष्यातील ते सर्वांत मोठं दु:ख होतं. जर ती आज जिवंत असती तर आज माझ्या दोन मुली आणि एक मुलगा असता. आठ महिन्यांतच तिचा जन्म झाल्याने समस्या निर्माण झाली होती. गरोदरपणात मी गोविंदासोबत बराच प्रवास केला होता.”
“इतका त्रास होईल हे मला माहीत नव्हतं. माझी पहिली डिलिव्हरी तर आरामात झाली होती. त्यामुळे दुसरीसुद्धा तशीच होईल असं मला वाटलं होतं. वजन उचलायचं नसतं हे मला माहीत नव्हतं. नंतर मी मुलाला जन्म दिला, तेव्हा माझं वजन 100 किलोंपर्यंत पोहोचलं होतं. डिलिव्हरीच्या वेळी मी मरेन असं मला वाटलं होतं. मला त्या अवस्थेत पाहून चीचीसुद्धा (गोविंदा) रडू लागला होता. मी डॉक्टरांना सांगितलं होतं की, माझा जीव गेला तरी चालेल पण माझ्या मुलाचे प्राण वाचवा”, अशा शब्दांत सुनिता व्यक्त झाली.
सुनिता आणि गोविंदा यांची कौटुंबिक पार्श्वभूमी खूप वेगवेगळी आहे. विविध मुलाखतींमध्ये तिने सांगितलंय की सुनिता त्यावेळी वांद्र्याला राहायची आणि तो विरारला राहायचा. सुनिताच्या वडिलांना गोविंदासोबतचं तिचं नातं मान्य नव्हतं. त्यामुळे ते मुलीच्या लग्नाला उपस्थित नव्हते. लग्नानंतरही गोविंदा दिवसातून पाच शिफ्टमध्ये काम करायचा. मुलीच्या जन्माच्या वेळीही तो पत्नीसोबत नव्हता.
