बाई- बुब्स, ब्रावर बोलणाऱ्या हेमांगी कवीच्या नव्या पोस्टने खळबळ; म्हणाली माझ्या वयाला, दिसण्याला…
मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये स्पष्ट वक्तव्यासाठी ओळखली जाणारी अभिनेत्री म्हणजे हेमांगी कवी. नुकताच तिने केलेल्या पोस्टने मराठी फिल्म इंडस्ट्रीमधील निर्मात्यांचे सत्य उघड केले आहे. ती काय म्हणाली चला जाणून घेऊया...

मराठी मनोरंजन विश्वात आपल्या दमदार अभिनयाने आणि रोखठोक स्वभावासाठी ओळखली जाणारी अभिनेत्री म्हणजे हेमांगी कवी. ती सध्या तिच्या फेसबुक पोस्टमुळे चर्चेत आली आहे. मराठी मालिका विश्वात काम करणाऱ्या कलाकारांना सध्या त्यांच्या मानधनासाठी संघर्ष करावा लागत आहे. त्यावर हेमांगीने पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये तिने स्वतःच्या पैशांसाठी रडायची ताकद उरली नाही असे ती बोलताना दिसत आहे.
काय आहे हेमांगीची पोस्ट?
हेमांगीने तिच्या फेसबुक अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्या पोस्टमध्ये, कुठलीही मालिका निवडण्यामागे आपली भूमिका काय आहे, कशी आहे, किती महत्त्वाची आहे हे तर असतंच. म्हणजे सुरवासुरवातीला तर “आपल्याला काम मिळतंय यार” यातंच आनंद असायचा. पण २०-२२ वर्ष काम केल्यानंतर आता मात्र मालिकेचा निर्माता कोण आहे हे आधी पाहायला लागलेय मी. सुरुवातीपासून ते आत्तापर्यंत अनेक मालिका केल्या, त्या गाजल्या, त्यातली आपली भूमिका ही ठीकठाक गाजली पण स्वतःच्या मेहनतीच्या पैसा रडून रडून मिळवावा लागला. ofcourse काही अपवाद सोडता…. त्यांची नावं मला आवर्जून सांगायला आवडतील असे ती म्हणाली.
पोस्टमध्ये हेमांगीने काही प्रोडक्शन हाऊस आणि निर्मात्यांची नावे घेतली आणि म्हणाली, कम्माल निर्माते. आपण बोलायच्या आणि मागायच्या आत चेक हातात मिळायचा. आता तर ऑनलाइन पेमेंटची सोय झाल्यापासून दिलेल्या किंवा ठरलेल्या तारखेला थेट पैसे बँकेत जमा करतात ही मंडळी. सुख, समाधान! मग तुमचं त्या मालिकेतलं काम संपू दे नाहीतर मालिकाच बंद होऊ दे, तुम्हाला तुमचे पैसे मिळणार म्हणजे मिळणार आणि सर्वात महत्त्वाचं वेळेत मिळणार.
बाकींच्यांनी म्हणजे यांच्या व्यतिरिक्त ज्यांच्याकडे मी कामं केली त्यातल्या काहींनी २ वर्षांनी पैसे दिले, काहींनी पैसे दिले पण TDS दिला नाही आणि काहीनी तर दिलेच नाहीत. जसं काही प्रोडक्शन हाऊस काही कलाकारांवर फुल्या मारतात नं आता तसंच मी काही प्रोडक्शन हाऊस आणि निर्मात्यांवर माझी माझ्यापुर्ती फुली मारलेली आहे. काहींकडे मी कधी काम ही केलं नाहीये पण त्यांच्याबद्दलची एकूण ‘महतीच’ इतकी ऐकलीए की काम करावंसंच वाटत नाही. त्यांची नावं मी घेऊ इच्छित नाही. कारण नाव घेऊन ही ना त्यांना काही फरक पडणारे ना ते सुधारणारेत मग कशाला ना उगाच? मधे मधे मी हिंदी भाषिक मालिकांमध्ये कामं करत राहते. शेवटी मला ही पोट आहे. तिकडे हा अनुभव मला कधीच नाही आला! तुलना करत नाहीए, कदाचित गणितं वेगळी असतील तिकडची कुणास ठाऊक पण व्यवहार चोख असल्याचं अनुभवलं.
मध्यंतरी मराठी मालिकेत एका भूमिकेसाठी मला विचारलं. मध्यवरती भूमिका, लीड , माझ्या वयाला आणि दिसण्याला शोभेल अशी व्यक्तिरेखा… पण प्रोड्यूसरचं नाव कळल्यावर म्हटलं नको रे बाबा. काहीतरी कारण सांगून टाळलं. आता स्वतःच्याच पैशांचा पाठपुरावा करायला ना पुर्वीसारखी शक्ती उरलीए अंगात ना मनात patience! तर सांगायचा पहीला महत्वाचा मुद्दा हा की काही खरंच चांगले, व्यवहाराला चोख असे निर्माते ही आहेत त्यांचं कौतुक व्हायला हवं आणि दुसरं सरळ, साध्या, विश्वासार्ह निर्मात्यासोबत काम करायला मिळायला हवं. शेवटी सुखाची झोप मिळवणं हीच काय ती इच्छा!
