श्वास घेतानाही त्रास..; कॅन्सरच्या लढाईनंतर हिना खानसमोर नवी समस्या
ब्रेस्ट कॅन्सरवर यशस्वीरित्या मात केल्यानंतर प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री हिना खान मुंबईत आरोग्याच्या एका नव्या समस्येला सामोरं जातंय. याविषयी तिने सोशल मीडियावर पोस्ट लिहिली आहे. मोकळा श्वासही घेता येत नसल्याची तक्रार तिने केली आहे.

मुंबईतील प्रदूषण आणि हवेची गुणवत्ता हा गेल्या अनेक दिवसांपासून नागरिकांच्या चिंतेचा विषय ठरला आहे. मुंबईतील काही ठिकाणी हवेचा गुणवत्ता निर्देशांक 256 च्या घरात म्हणजेच अतिधोकादायक श्रेणीत पोहोचला आहे. ठिकठिकाणी सुरू असलेल्या बांधकामाच्या प्रकल्पांमुळे आणि पर्यावरणाचे सर्व नियम धाब्यावर बसवल्याने मुंबईत हवा अत्यंत प्रदूषित झाली आहे. मुंबईत सर्वत्र धुरकट वातावरणाची निर्मिती झाली असून धूर आणि धुक्याचं प्रमाण वाढलं आहे. ही हवा श्वसनासाठी योग्य नसून अनेकांना श्वसनाचे विकार होत आहेत. अशातच प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री हिना खानने याबद्दल सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. मुंबईतील प्रदूषणाचा तिच्या आरोग्यावर वाईट परिणाम होत असल्याचं तिने म्हटलंय.
हिनाने हवेचा गुणवत्ता निर्देशांक पोस्ट करत त्यावर लिहिलंय, ‘मुंबईत खालावत जाणाऱ्या हवेच्या गुणवत्तेमुळे मला श्वास घेण्यास त्रास होत आहे. प्रदूषणामुळे मला सतत खोकला आणि कफ होतोय. या सर्वांचा माझ्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतोय. ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज दिल्यानंतर हे माझ्यासाठी आणखी आव्हानात्मक बनतंय. प्रदूषित हवेमुळे मला बाहेरच्या शारीरिक हालचाली कमी कराव्या लागत आहेत. त्याच्या माझ्या लाइफस्टाइलवर परिणाम होत आहे.’
View this post on Instagram
हिनाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर मुंबईच्या एअर क्वालिटी इंडेक्सचा (AQI) स्क्रीनशॉट शेअर केला आहे. या स्क्रीनशॉटमध्ये शहराचा AQI 209 वर दाखवण्यात आला आहे. म्हणजेच हवेची गुणवत्ता अत्यंत खराब आहे. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये हिनाने लिहिलंय, ‘काय चाललंय? मला श्वास घेता येत नाहीये. मी बाहेर जाणं कमी केलंय. मला सतत खोकला येतोय. सकाळपासून खूप वाईट वातावरण आहे.’

हिना खानला ब्रेस्ट कॅन्सरचं निदान झालं होतं. अभिनेत्री सोहा अली खानच्या ‘ऑल अबऊट हर’ या पॉडकास्टमध्ये तिने कर्करोगाच्या लढाईबद्दल मोकळेपणे सांगितलं होतं. “कॅन्सरवरील उपचाराला सामोरं जाणं माझ्यासाठी खूप कठीण होतं. यात चांगले आणि वाईट असे दोन्ही दिवस होते. मला तीन आठवड्यांनी केमोथेरपी घ्यावी लागत होती आणि केमोथेरपीचा पहिला आठवडा खूप वेदनादायक होता. त्यानंतरचे दोन आठवडे मी सर्वसामान्य जीवन जगण्याचा आणि माझ्या कुटुंबीयांसोबत वेळ घालवण्याचा प्रयत्न केला. प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचा दृष्टीकोन खूप महत्त्वाचा असतो. गंभीर आजाराचं निदान होताच लोकांना वाटतं की आपलं आयुष्य आता संपलं आहे. मीसुद्धा असाच विचार करायचे. पण अनुभवांमधून मी शिकत गेले. आयुष्यात जसे वाईट दिवस असतात, तसेच चांगलेही असतात. यात संतुलन राखणं हेच जीवनाचं सौंदर्य आहे.”
