
टीव्ही विश्वातील प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्री हिना खान सध्या आयुष्यातील वाईट दिवसांचा सामना करत आहे. काही दिवसांपूर्वी अभिनेत्री ब्रेस्ट कॅन्सर झाल्याची घोषणा केली होती. सध्या अभिनेत्रीवर उपचार सुरु आहे. हिना खानवर सध्या किमोथेरपी सुरु आहे. अभिनेत्री उपचाराबद्दल आणि प्रकृतीबद्दल प्रत्येक अपडेट चाहत्यांसोबत शेअर करत असते. आता देखील हिनाने खास पोस्ट शेअर करत आणखी एका आजाराबद्दल मोठी माहिती दिली. किमोथेरेपीमुळे होणाऱ्या साईडइफेक्ट्समुळे अभिनेत्रीची प्रकृती खालावली आहे.
इन्स्टाग्राम स्टोरीवर एक फोटो पोस्ट करत हिना खान हिने कॅन्सरनंतर झालेल्या आजाराचा खुलासा केला आहे. किमोथेरपीच्या साईट इफेक्ट्समुळे अभिनेत्रीला म्यूकोसायटिस आजाराने ग्रासलं आहे. अभिनेत्री पोस्ट शेअर करत म्हणाली, ‘एकीकडे किमोथेरपी तर दुसरीकडे म्यूकोसायटिस आहे… म्यूकोसायटिसवर उपचार म्हणून डॉक्टरांनी काही सल्ले दिले आहे. पण तुमच्यापैकी कोणी या आजाराचा सामना केला असेल तर, मला परिणामकारक औषधं सांगा. प्रचंड वेदनादायी प्रवास आहे… काहीच खाऊ देखील शकत नाही…’
हिना खान हिच्या पोस्टवर चाहते कमेंट करत प्रतिक्रिया देत आहेत. एक नेटकरी म्हणाला, ‘कृपया कोणाला माहिती असेल तर सुचवा…’, दुसरा नेटकरी म्हणाला, ‘लवकर ठिक हो… आम्ही तुझ्यासाठी प्रार्थना करत आहोत…’, अन्य एक नेटकरी म्हणाला, ‘योग्य उपचार घे… चुकीच्या सल्ल्याने प्रकृती आणखी खालावेल…’ असं देखील चाहते अभिनेत्रीला म्हणत आहेत.
हिना खान हिच्या मालिकांबद्दल सांगायचं झालं तर, ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ मालिकेमुळे हिनाच्या आयुष्यात मोठे बदल झाले. चाहत्यांनी देखील हिनाला भरभरुन प्रेम दिलं. त्यानंतर ‘कसौटी जिन्दगी की 2 ‘ मालिकेमुळे हिनाच्या लोकप्रियतेत मोठी वाढ झाली. ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ आणि ‘कसौटी जिन्दगी की 2’ मालिकेशिवाय हिनाने अनेक मालिकांमध्ये पाहुण्या कलाकाराची भूमिका देखील बजावली. ‘चांद छुपा बादल में’ आणि ‘सपना बाबुल का’ मालिकेत देखील हिना दिसली.
आता हिना कायम सोशल मीडियावर सक्रिय असते. सोशल मीडियावर हिनाच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.