मुलांचा घटस्फोट झाला पण..; सुझानच्या आईसाठी हृतिकच्या आईची भावूक पोस्ट
काही दिवसांपूर्वीच सुझान खानच्या आईचं निधन झालं होतं. आता हृतिक रोशनची आई पिंकी रोशन यांनी त्यांच्यासाठी भावूक पोस्ट लिहिली आहे. झरीन खान आणि पिंकी रोशन यांच्यात अत्यंत मैत्रीपूर्ण नातं होतं. मुलांच्या घटस्फोटानंतरही ते कायम राहिलं होतं.

सुझान खान आणि झायेद खान यांची आई झरीन खान यांचं 7 नोव्हेंबर रोजी निधन झालं. त्या 81 वर्षांच्या होत्या. झरीन यांच्या निधनाच्या काही दिवसांनंतर आता सुझानचा पूर्व पती आणि अभिनेता हृतिक रोशनची आई पिंकी रोशन यांनी सोशल मीडियावर भावूक पोस्ट लिहिली आहे. हृतिक आणि सुझानचा घटस्फोट झाल्यानंतरही मैत्री कायम ठेवल्याचं आणि दोन्ही कुटुंबात कोणतीही कटुता निर्माण न झाल्याचं त्यांनी यामध्ये सांगितलं. मुलं विभक्त झाल्यानंतरही पिंकी आणि झरीन यांनी अत्यंत समजूतदारपणे दोन्ही कुटुंबातील गोष्टी हाताळल्या होत्या. त्याचीच आठवण पिंकी यांनी या पोस्टमध्ये काढली.
झरीन यांच्या आठवणीत पिंकी यांनी इन्स्टाग्रामवर लिहिलं, ‘एक अत्यंत दुर्मिळ मैत्री. एक अत्यंत मौल्यवान नातं. दोन आई.. ज्यांचं मन एकमेकांसाठी कायम आनंदी होतं. आपल्या मुलांनी हे नातं जेव्हा वधूची आई आणि वरची आई अशात रुपांतर केलं, तेव्हा त्या आनंदाला पारावार उरला नव्हता. पण नशिबात काहीतरी वेगळंच लिहिलं होतं. आपली मुलं विभक्त झाली आणि त्यांच्या आयुष्यातील कठीण काळाचा सामना ते दोघं करत असताना आपण आई म्हणून एकमेकींशी सहानुभूतीने आणि करुणेनं वागलो. द्वेष आणि कटुता या मैत्रीत येऊ दिली नाही.’
View this post on Instagram
‘डोळ्यांत पाणी आणून एकमेकींना समजावताना, मिठी मारताना आपल्यातील मैत्री आणखी मजबूत झाली आणि आपलं नातं आणखी मजबूत झालं. झरीन.. मला तुझी खूप आठवण येईल’, अशा शब्दांत हृतिकच्या आईने भावना व्यक्त केल्या. हृतिक रोशन आणि सुझान खान यांनी 2000 मध्ये लग्न केलं. लग्नाच्या 14 वर्षांनंतर त्यांनी घटस्फोट घेतला. या दोघांना हृदान आणि रेहान ही दोन मुलं आहेत. घटस्फोटानंतर दोघं मिळून मुलांचं संगोपन करत आहेत.
झरीन खान यांचं 7 नोव्हेंब रोजी जुहू इथल्या निवासस्थानी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झालं. त्यांनी ‘तेरे घर के सामने’ (1963), ‘एक फूल दो माली’ (1969) यांसारख्या चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या होत्या. 1966 मध्ये त्यांनी संजय खान यांच्याशी लग्न केलं आणि त्यानंतर चित्रपटांपासून फारकत घेतली. लग्नानंतर झरीन यांनी इंटेरिअर डिझाइनिंगमध्ये करिअर करण्याचं ठरवलं होतं.
