36 वर्षे जुनी लोकप्रिय मालिका, प्रेक्षकांकडून दर आठवड्याला लाखो चिठ्ठ्या, 415 एपिसोड्सच्या या मालिकेला 8.8 IMDb रेटिंग
नव्वदच्या दशकात या मालिकेवर प्रेक्षकांकडून भरभरून प्रेमाचा वर्षाव झाला. 415 एपिसोड्सच्या या मालिकेनं जी कामगिरी केली, ती इतर कोणालाच शक्य झाली नाही. आजसुद्धा या मालिकेला आयएमडीबीवर 8.8 रेटिंग आहे.

टेलिव्हिजनवर 80 आणि 90 च्या दशकात काही अशा मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आल्या होत्या, ज्यांची आठवण आजसुद्धा काढली जाते. दमदार पटकथेमुळे या मालिका तुफान गाजल्या होत्या. कंटेंटच्या बाबतीत या मालिका इतक्या मजबूत होत्या की आजसुद्धा त्यांची लोकप्रियता टिकून आहे. हा तो काळ आहे, जेव्हा दूरदर्शनचा डंका सर्वत्र होता. घरोघरी लोक सर्व कामं आवरून टीव्हीसमोर मालिका बघण्यासाठी एकत्र बसायचे. या मालिकांमध्ये कोणतेही बोल्ड सीन, ग्लॅमर नसायचा, तर फक्त सर्वसामान्य लोकांशी जोडणारी कथा असायची. 90 च्या दशकातील अशाच एका मालिकेनं प्रेक्षकांच्या मनावर विशेष छाप सोडली होती. या मालिकेने 415 एपिसोड्स पूर्ण केले होते. या मालिकेचं नाव आहे ‘सुरभी’.
लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद
रेणुका शहाणे यांची मुख्य भूमिका असलेली ‘सुरभी’ ही दूरदर्शनवरील सर्वांत चर्चेतली, लोकप्रिय आणि यशस्वी मालिकांपैकी एक होती. दूरदर्शनवर दीर्घकाळ चाललेल्या मालिकांपैकी ही एक होती. या मालिकेची नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्समध्येही करण्यात आली होती. नव्वदच्या दशकात प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या या मालिकेसाठी दर आठवड्याला लाखो प्रेक्षक चिठ्ठ्या लिहून पाठवायचे. अनेकदा या चिठ्ठ्यांची संख्या दहा लाखांवरही पोहोचायची. यामुळेच या मालिकेची नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये करण्यात आली.
8.8 आयएमडीबी रेटिंग
भारतीय संस्कृतीला समर्पित या मालिकेचं सूत्रसंचालन रेणुका शहाणे आणि सिद्धार्थ काक यांसारखे लोकप्रिय कलाकार करत होते. विशेष म्हणजे सिद्धार्थ काक या मालिकेचे सहनिर्मातेसुद्धा होते. 1990 ते 2001 पर्यंत ही मालिका सुरू होती, परंतु त्यात 1991 मध्ये एक वर्षाचा ब्रेक घेण्यात आला होता. या वर्षी ही मालिका प्रसारित करण्यात आली नव्हती. त्यानंतर पुढील दहा वर्षे या मालिकेनं छोटा पडदा गाजवला होता. आयएमडीबीवर या मालिकेला 10 पैकी 8.8 रेटिंग मिळाली आहे. याचाच अर्थ प्रेक्षकांमध्ये ही मालिका लोकप्रिय आहे.
रेणुका शहाणे यांना मिळाली लोकप्रियता
अभिनेत्री रेणुका शहाणे यांना ‘सुरभी’ या मालिकेमुळेच खरी ओळख मिळाली. परंतु तुम्हाला माहीत आहे का, की या मालिकेसाठी ऑडिशन देणं ही रेणुका शहाणे त्यांची एक चूक मानत होत्या. परंतु नंतर हीच मालिका त्यांच्या करिअरमधील टर्निंग पॉईंट ठरली. ही फक्त एक मालिका नव्हती तर भारताची विविधता, संस्कृती आणि इतिहास प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणारा सांस्कृतिक माहितीपट होता.
