चल.. निघ इथून, इस्माइल दरबारने भन्साळींना सुनावलं; ‘घमेंडी’ म्हणत सांगितलं वादामागचं खरं कारण
संगीतकार इस्माइल दरबार आणि दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्यातील मतभेद आता टोकाला पोहोचले आहेत. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत इस्माइल यांनी त्यांच्यातील वादामागचं खरं कारण सांगितलं. त्याचप्रमाणे भविष्यात त्यांच्यासोबत काम करणार नसल्याचेही संकेत दिले.

प्रसिद्ध संगीतकार इस्माइल दरबार यांनी दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्यासोबत ‘हम दिल दे चुके सनम’, ‘देवदास’ यांसारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटांसाठी काम केलं. आपल्या चित्रपटांमधील संगीतासाठी भन्साळी हे इस्माइल दरबार यांच्यावर खूप विश्वास ठेवायचे. परंतु ‘हिरामंडी’ या वेब सीरिजदरम्यान दोघांमध्ये वाद झाल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत इस्माइल यांनी त्या वादाचा खुलासा केला. इस्लाइल दरबार हे त्यांच्या मुक्त कामाच्या पद्धतीसाठी ओळखले जातात. जर दिग्दर्शकांनी सांगितलेली एखादी गोष्ट त्यांना पटत नसेल, तर ते स्पष्ट नकार देतात.
‘विक्की लालवानी’ला दिलेल्या मुलाखतीत इस्माइल म्हणाले, “मी नेहमीच याबाबत स्पष्ट होतो की मला काय आवडतं आणि मला गोष्टी कशा पद्धतीने ऐकायच्या असतात? जर संजयने सुचवलेली एखादी गोष्ट मला आवडत नसेल, तर मी त्याला ते थेट सांगायचो.” इस्माइल यांनी बऱ्याच वर्षांनंतर ‘हिरामंडी’च्या निमित्ताने पुन्हा एकदा भन्साळींसोबत काम करण्यास सुरुवात केली होती. एका वृत्तात त्यांच्या योगदानाचं ‘हिरामंडीचा पाठिचा कणा’ अशा शब्दांत कौतुक केलं होतं. परंतु त्यानंतर हळूहळू गोष्टी बदलल्या आणि त्यांच्यात फूट पडली. इस्माइल यांनी स्वत:हून तशी वृत्तं छापायला लावल्याचा गैरसमज भन्साळींना झाला होता.
याविषयी ते पुढे म्हणाले, “मी त्याला थेट म्हणालो की, जर मला वृत्त छापायचं असेल तर मी तुला घाबरणार नाही. मी स्पष्ट सांगेन की, होय मीच तसं लिहायला सांगितलं होतं. त्याने मला ऑफिसमध्ये बोलावलं आणि विचारलं, इस्माइल.. तू असं कसं म्हणू शकतोस? मग तो म्हणाला, ठीक आहे.. जाऊ दे. मला खूप उशीरा ही बाब समजली की ‘जाऊ दे’चा खरा अर्थ असा होता की पुढे जाऊन ते मला अशा परिस्थितीत ढकलतील, जिथे मी स्वत:हून हिरामंडीच्या प्रोजेक्टमधून माघार घेईन. असं काही घडण्याआधीच मी तिथून निघून गेलो.”
“ही गोष्ट त्यांनाही माहीत होती की, पाठीचा कणा मीच होतो. ‘हम दिल दे चुके सनम’च्या वेळी मी पाठीचा कणा होता, ‘देवदास’च्या वेळीही मीच पाठीचा कणा होतो. हे मी म्हणत नाहीये, त्यांच्याच पीआरने म्हटलं होतं. पहिल्या पानावर हे छापलं होतं. त्यामुळे मी त्याचा अहंकार पाहिला होता. त्याच्यात ती भीती होती की मी इतकी मेहनत घेतोय आणि सर्व श्रेय हा घेऊन जातोय. मी नंतर हिरांमडी पाहिली, पण मला ती आवडली नाही. मी जर त्या सीरिजला संगीत दिलं असतं, तर मी ते अमर केलं असतं. मी ज्या पद्धतीची तयारी केली होती, तिथपर्यंत संजय कधी पोहोचूच शकला नसता”, असं त्यांनी सांगितलं.
इस्माइल दरबार हे भन्साळींच्या ‘गुजारिश’ या चित्रपटासाठीही काम करणार होते. परंतु ‘देवदास’नंतर बऱ्याच गोष्टी बिघडल्या होत्या. इतकंच नव्हे तर भन्साळींनी पीआर टीम्सला इस्माइलची मुलाखत न घेण्याचे निर्देश दिल्याचा खुलासा त्यांनी केला. आजही त्या दोघांमध्ये बरेच मतभेत आहेत. “आज जरी संजय माझ्याकडे येऊन म्हणाला की, माझ्या चित्रपटाला संगीत दे, मी तुला 100 कोटी रुपये देईन. तर मी त्याला सरळ म्हणेन की, चल.. इथून निघून जा”, अशा शब्दांत इस्माइल यांनी नाराजी बोलून दाखवली.
