रश्मिकाच्या मदतीला धावले अन् स्वत:च ट्रोल झाले जावेद अख्तर; नेटकरी म्हणाले, तुम्हालाही शिव्या..
ज्येष्ठ गीतकार आणि लेखक जावेद अख्तर यांनी रश्मिका मंदानाची बाजू घेण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांच्याकडून झालेल्या एका चुकीनंतर नेटकऱ्यांना त्यांनाच ट्रोल करण्यास सुरुवात केली. नेमकं काय घडलं, ते जाणून घ्या..

Javed Akhtar : बॉलिवूडमधील प्रसिद्ध गीतकार आणि पटकथालेखक जावेद अख्तर नेहमीच आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जातात. एखाद्या विषयावर आपलं स्पष्ट आणि बेधडक मत मांडताना ते कोणालाही घाबरत नाही. आता जावेद अख्तर अभिनेत्री रश्मिका मंदानाच्या समर्थनार्थ पुढे आले आहेत. रश्मिकाच्या हिंदी उच्चारांवरून आणि बोलण्याच्या पद्धतीवरून सोशल मीडियावर टीका करणाऱ्यांना त्यांनी चांगलंच सुनावलं आहे. मात्र, रश्मिकाची बाजू घेताना त्यांनी तिला ‘तमिळ अभिनेत्री’ म्हटल्याने नवा वाद निर्माण झाला. त्यानंतर नेटकऱ्यांनी जावेद अख्तर यांनाच ट्रोल करण्यास सुरुवात केली.
रश्मिकाच्या उच्चारांवरून सुरू होता वाद
रश्मिका मंदाना ही दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीसह हिंदी चित्रपटांमध्येही लोकप्रिय असलेली अभिनेत्री आहे. मात्र, तिच्या हिंदी बोलण्याच्या पद्धतीवरून अनेकदा सोशल मीडियावर चर्चा होते. अलीकडेच ती पती आणि अभिनेता विजय देवरकोंडा याच्यासोबत ‘कॉफी विथ करण’च्या नवव्या सिझनमध्ये सहभागी झाली होती. या कार्यक्रमात तिने आपल्या करिअरदरम्यान झालेल्या ट्रोलिंगबद्दल भाष्य केलं. अभिनय, भाषा आणि उच्चार अशा वेगवेगळ्या कारणांवरून आपल्याला टीकेचा सामना करावा लागल्याचं रश्मिकाने सांगितलं. मात्र, या टीकेमुळे आपण स्वतःसाठी मर्यादा आखून घेतल्या नाहीत. आपल्याला केवळ एका चित्रपटसृष्टीत किंवा एका भाषेत काम करायचं नव्हतं, तर विविध भाषांमध्ये अभिनय करायचा होता, असं तिने स्पष्ट केलं.
रश्मिकाच्या उच्चारांवरून होणाऱ्या टीकेला उत्तर देताना जावेद अख्तर यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट केली. रश्मिकाच्या उच्चारांवर आक्षेप घेणाऱ्यांना त्यांनी तमिळ भाषेतील काही ओळी बोलून दाखवण्याचं आव्हान दिलं. दुसऱ्या भाषेतील शब्द योग्य पद्धतीने उच्चारणं किती कठीण असू शकतं, याचा विचार टीका करणाऱ्यांनी करायला हवा, असा त्यांचा युक्तिवाद होता. भाषेच्या बाबतीत स्वतःला इतरांपेक्षा श्रेष्ठ समजण्याची वृत्ती चुकीची असल्याचंही त्यांनी म्हटलं. ज्यांना तमिळ अभिनेत्री रश्मिका मंदानाच्या उच्चारांबद्दल काही अडचण आहे, त्यांना जगातील सर्वांत जुनी बोलली जाणारी भाषा असलेल्या तमिळच्या काही ओळी बोलायला द्याव्यात आणि मग पाहुयात ते तमिळचा उच्चार किती चांगला करतात. ही बनावट आणि निराधार भाषिक श्रेष्ठता स्वीकारार्ह नाही, अशी पोस्ट त्यांनी केली.
जावेद अख्तर यांनी ट्रोलर्सना सुनावलं
Those who have any problem with the pronounciation of Tamil actor Rashmika should be given a few lines of Tamil which is the oldest spoken language in the world and let’s see how well they pronounce Tamil . This fake and baseless linguistic superiority is not acceptable.
— Javed Akhtar (@Javedakhtarjadu) October 25, 2026
त्यांच्या या भूमिकेला अनेकांनी पाठिंबा दिला. मात्र, याच पोस्टमध्ये त्यांनी रश्मिकाचा उल्लेख ‘तमिळ अभिनेत्री’ असा केल्याने चर्चेनं वेगळं वळण घेतलं. रश्मिका मंदाना ही कर्नाटकातील कोडगू (कूर्ग) परिसरातील कोडवा समाजातून येते. तिने कन्नड, तेलुगू आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम केलं आहे. त्यामुळे तिला तमिळ अभिनेत्री संबोधल्याबद्दल अनेक नेटकऱ्यांनी जावेद अख्तर यांची चूक निदर्शनास आणून दिली.
काहींनी दक्षिण भारतातील सर्व कलाकारांना एकाच भाषेशी जोडणं चुकीचं असल्याचं सांगितलं. तर काहींनी रश्मिकाची बाजू घेतल्याबद्दल जावेद अख्तर यांचे आभार मानतानाच तिच्या प्रादेशिक ओळखीबाबत अधिक अचूक माहिती देण्याची अपेक्षा व्यक्त केली. ‘ती कर्नाटकातील कुर्गची आहे, तमिळनाडूची नाही’, असं एकाने लिहिलं. तर ‘ती कन्नड अभिनेत्री आहे, जी प्रामुख्याने तेलुगू चित्रपटांमध्ये काम करते. आता तुम्हालाही शिव्या लागतील सर’, अशी टीका दुसऱ्या युजरने केली.
