CJP Mumbai Protest : मला 100% खात्री, तेव्हा हेच शिवाजी पार्कचे रहिवासी…सीजेपी आंदोलनाबद्दल जावेद अख्तर स्पष्टच बोलले
Javed Akhtar On CJP Protest : जावेद अख्तर यांनी शिवाजी पार्क येथील सीजेपी आंदोलनावर पोस्ट शेअर केली असून नेटकऱ्यांनी जावेद अख्तर यांच्यावर संताप व्यक्त केला आहे.

अभिजीत दीपके यांनी गुरुवारी निवडणूक प्रक्रिया आणि मतदार याद्यांशी संबंधित मुद्द्यांवरून मुंबईतील आपलं आंदोलन अधिक तीव्र करणार असल्याची घोषणा केली. त्यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी केली आणि जोपर्यंत ते राजीनामा देत नाहीत तोपर्यंत आपलं आंदोलन सुरूच राहील, असं अभिजीत यांनी सांगितलं.मुंबईच्या शिवाजी पार्कमध्ये सीजेपी आंदोलनावरून वाद निर्माण होत असल्याचं दिसत आहे. स्थानिक रहिवासी गोंगाट, वाहतूक आणि परिसरातील शांततेत व्यत्यय येण्याची चिंता व्यक्त करत या आंदोलनाला विरोध करत असतानाच, ज्येष्ठ लेखक जावेद अख्तर यांच्या एका पोस्टमुळेही वादाला तोंड फुटलं आहे.
जावेद अख्तर यांची पोस्ट
जावेद अख्तर यांनी ट्विटरवर पोस्ट करत लिहिलं की, शिवाजी पार्कमधील काही रहिवासी गोंगाटाबाबत तक्रार करत आहेत आणि प्रशासनानं सीजेपीचं आंदोलन रद्द करावं अशी मागणी करत आहेत, याचा त्यांना आनंद आहे. त्यांनी असंही लिहिलं की, महाराष्ट्रातील कोणत्याही राजकीय पक्षानं शिवाजी पार्कमध्ये आयोजित केलेल्या कोणत्याही रॅलीला हेच लोक असाच आणि तितकाच तीव्र विरोध करतील अशी आशा आहे.
जावेद यांच्या पोस्टवर प्रतिक्रिया देताना, एका युजरने त्यांच्या आधीच्या पोस्टचा संदर्भ दिला. त्या यूजरने उपहासाने म्हटलं की, जर जावेद यांनी यापूर्वी शूर वैमानिकाला महावीर चक्र देण्याची मागणी करणारी पोस्ट टाकली नसती, तर या पोस्टनंतर होणाऱ्या टीकेची त्यांना भीती वाटली असती. यावर जावेद अख्तर यांनी लिहिलं की, ‘प्रिय शाहिद खालिद, तुम्हाला नक्कीच खूप काही शिकण्यासारखं आहे. माझ्या शुभेच्छा.’ त्यानंतर दुसऱ्या एका युझरनं जावेद अख्तर यांच्या पोस्टवर त्यांना ‘मूर्ख’ म्हणत एक आक्षेपार्ह कमेंट केली. यावर जावेद म्हणाले की, ‘तुमच्या कमेंटवरून तुम्हाला कोणते संस्कार दिलेत हे दिसून येतंय.’
I am so happy that some residences of Shivaji park are getting sensitive about the noise pollution and asking the authorities to cancel the protest of CJP today at Shivaji park . I am hundred percent sure that they will raise the same objection with the same intensity if not…
— Javed Akhtar (@Javedakhtarjadu) October 2, 2026
शबाना आझमी यांची पोस्ट
तसेच जावेद अख्तर यांच्या पत्नी शबाना आझमी यांनीही पोस्ट शेअर करत सीजेपी आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. त्या म्हणतायत की, ‘तुमचं मत हा तुमचा हक्क आहे. तुमचं मत हाच तुमचा आवाज आहे. तुमचं मत देशाचं भविष्य घडवतं. पण जेव्हा तुमचं मत मतदार यादीतून गायब होतं, तेव्हा काय होतं? आज हा कोणत्याही पक्षाचा प्रश्न नाही, हा तुमच्या मताचा प्रश्न आहे. हा माझ्या मताचा प्रश्न आहे. हा आपल्या सर्वांच्या मतांचा प्रश्न आहे. आंदोलनांसाठी अनेकदा परवानगी मागितली, पण परवानगी मिळाली नाही. पण प्रश्न विचारणं हा आपला हक्क आहे. म्हणून घराबाहेर पडा, प्रश्न विचारा, आवाज उठवा, तुमच्या मतासाठी, तुमच्या लोकशाहीसाठी. २ ऑक्टोबर, गांधी जयंती. शिवाजी पार्क, दुपारी ४ वाजता. मी तुम्हाला तिथे भेटेन.’
View this post on Instagram
शिवाजी पार्कमध्ये नेमका वाद कशामुळे निर्माण होत आहे?
सीजेपीनं २ ऑक्टोबर रोजी मुंबईतील शिवाजी पार्कमधून आपलं ‘जेल भरो आंदोलन’ सुरू करण्याची घोषणा केली आहे. अभिजीत दीपके यांच्या मते, मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी आणि निवडणूक प्रक्रियेशी संबंधित मुद्दे हे आंदोलनाचे मुख्य मुद्दे आहेत. सीजेपीनं सर वर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.
सीजेपीने दुपारी ४ वाजता शिवाजी पार्कच्या गेट क्रमांक ६ वर आंदोलन करण्याची योजना आखली होती. पण, मुंबई पोलिसांनी आंदोलनासाठी परवानगी नाकारली असून आयोजकांना दुसऱ्या ठिकाणी आंदोलनासाठी अर्ज करण्याचा सल्ला दिला आहे. पोलिसांनी शिवाजी पार्कजवळील निवासी परिसर, गोंगाट, वाहतूक आणि आपत्कालीन वाहनांची ये-जा यांसारख्या समस्यांचाही उल्लेख केला.
स्थानिक रहिवाशांनी आक्षेप का घेतला?
शिवाजी पार्कजवळ राहणाऱ्या रहिवाशांनीही या आंदोलनाला विरोध केला आहे. स्थानिकांच्या मते, या मोठ्या गर्दीमुळे परिसरातील शांतता, वाहतूक आणि दैनंदिन जीवनात व्यत्यय येतो. रहिवाशांनी आंदोलन थांबवण्यासाठी कारवाईची मागणी करत प्रशासनाला एक निवेदन सादर केलं आहे. स्थानिक रहिवाशांनी शिवाजी पार्कचा वापर क्रीडा-व्यतिरिक्त इतर उपक्रमांसाठी करण्याच्या नियमांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे, आणि अशा उपक्रमांना वर्षातून केवळ मर्यादित दिवसांसाठीच परवानगी दिली जाते. त्यांनी २०१३ च्या मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाचा आणि २०१६ च्या महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाचा संदर्भ दिला आहे. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या तणावामुळे शिवाजी पार्क आणि दादर परिसरात सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
