जय भानुशाली – माही विजच्या घटस्फोटाने चाहत्यांना मोठा धक्का; कोणासोबत राहणार लेक तारा?
जय भानुशाली आणि माही विज हे लग्नाच्या 14 वर्षांनंतर अधिकृतरित्या विभक्त झाले आहेत. या दोघांना तीन मुलं असून त्यापैकी दोन जणांना त्यांनी दत्तक घेतलंय. घटस्फोटानंतर ही तिन्ही मुलं कोणासोबत राहतील, असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.

टेलिव्हिजनवरील सर्वांत लोकप्रिय जोडी जय भानुशाली आणि माही विज यांनी घटस्फोट घेतल्याचं जाहीर करत चाहत्यांना मोठा धक्का दिला आहे. गेल्या काही महिन्यांपासून या दोघांच्या घटस्फोटाच्या जोरदार चर्चा होत्या. त्यानंतर रविवारी (4 जानेवारी, 2026) जय आणि माहीने एकत्र स्टेटमेंट देत विभक्त झाल्याचं जाहीर केलं आहे. या दोघांनी 2011 मध्ये लग्न केलं होतं. त्यानंतर 2017 मध्ये त्यांनी दोन मुलांना दत्तक घेतलं होतं. राजवीर आणि खुशी अशी त्यांची नावं आहेत. मुलांना दत्तक घेतल्याच्या दोन वर्षांनंतर माहीने 2019 मध्ये मुलगी ताराला जन्म दिला. तारा ही सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रिय आहे. सर्वांत लोकप्रिय स्टारकिड्समध्ये ताराचा समावेश होतो. तिचे व्हिडीओ आणि रील्स तुफान व्हायरल होतात. आता आईवडिलांच्या घटस्फोटानंतर तारा कोणासोबत राहणार, असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.
या प्रश्नाचं उत्तर जय आणि माही यांनी त्यांच्या पोस्टमध्येच दिलं आहे. ‘आयुष्याच्या या प्रवासात आज आम्ही विभक्त होण्याचा निर्णय घेत आहोत. तरीही आम्ही एकमेकांना साथ देत राहू. शांती, प्रगती, दयाळूपणा आणि माणुसकी ही नेहमीच आमची आयुष्यात मार्गदर्शक मूल्ये राहिली आहेत. आमची मुलं- तारा, खुशी आणि राजवीर यांच्यासाठी आम्ही सर्वोत्तम पालक, सर्वोत्तम मित्र बनून राहू. त्यांच्यासाठी जे योग्य आहे ते करण्यासाठी आणि जे काही भविष्यात करावं लागेल ते करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत’, असं त्यांनी या पोस्टमध्ये लिहिलंय. म्हणजेच राजवीर, खुशी आणि तारा या तिघांचं संगोपन जय आणि माही मिळून करणार आहेत.
View this post on Instagram
याआधी अनेक सेलिब्रिटी जोडप्यांनी घटस्फोटानंतर को-पॅरेंटिगचा पर्याय निवडला आहे. यामध्ये हृतिक रोशन-सुझान खान, अरबाज खान- मलायका अरोरा यांसारख्या सेलिब्रिटींचाही समावेश होतो. त्यामुळे आई-वडील म्हणून मुलांना जेव्हा कधी त्यांच्या पालकांची गरज भासेल, तेव्हा ते त्यांची जबाबदारी पूर्ण करण्यासाठी तत्पर असतील. किंबहुना घटस्फोटानंतरही एकमेकांमधील मैत्रीचं नातं कायम ठेवणार असल्याचं जय आणि माहीने स्पष्ट केलंय.
‘जरी आम्ही वेगवेगळा मार्ग निवडला असला तरी या कथेत कोणीच खलनायक नाही आणि या निर्णयाशी कोणतीही नकारात्मकता जोडलेली नाही. त्यामुळे कोणताही निष्कर्ष काढण्यापूर्वी कृपया हे जाणून घ्या की आम्ही ड्रामापेक्षा शांतता आणि इतर सर्व गोष्टींपेक्षा सामंजस्याला महत्त्व देतो,’ असं त्यांनी म्हटलंय.
