गोवा चित्रपट महोत्सवात सोलापूरकरांनी मारली बाजी, ‘काजरो’ फेम विठ्ठल काळे यांचा गौरव
गोवा राज्य सरकारचा दहावा राज्य चित्रपट पुरस्कार सोहळा अलिकडेच पार पडला. यात सोलापूर जिल्ह्यातील अभिनेता विठ्ठल काळे याला 'काजरो' या कोकणी चित्रपटातील अभिनयासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता ज्युरी पुरस्कार मिळाला आहे.

गोवा राज्य सरकारचा दहावा राज्य चित्रपट पुरस्कार सोहळा 14 ते 17 ऑगस्ट 2025 या काळात पणजी येथे पार पडला. या मानाच्या पुरस्कार सोहळ्यात सोलापूर जिल्ह्यातील अभिनेता विठ्ठल काळे याला ‘काजरो’ या कोकणी चित्रपटातील अभिनयासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता ज्युरी पुरस्कार मिळाला आहे. यामुळे बार्शी तालुक्याचे नाव गोवा राज्य चित्रपट महोत्सवात झळकले आहे.
अभिनेते विठ्ठल काळे हे पानगाव तालुका बाशी येथील रहिवाशी आहेत. त्यांनी याआधी बऱ्याच चित्रपटांमध्ये काम केलेलं आहे. त्यांनी आपल्या अभिनयाने अनेकांना थक्क केले आहे. गेल्या वर्षी त्यांची प्रमुख भूमिका असलेल्या ‘बापल्योक’ चित्रपट प्रदर्शित झाला होता. बाप आणि मुलाच्या नात्यातील कथा यात दाखवण्यात आली होती. या चित्रपटातील भूमिका आणि लिखाणासाठी विठ्ठल यांना महाराष्ट्र शासनाचे तीन वैयक्तिक पुरस्कार मिळाले होते. तसेच या चित्रपटातील ‘घडीभर तू थांब जरा’ या गाण्याने संपूर्ण राज्यात लोकप्रियता मिळवली होती. सोशल मीडियावरही हे गाणे व्हायरल झाले होते.
विठ्ठल काळे यांना पुरस्कार मिळालेल्या काजरो या चित्रपटाची कथा थोडीशी वेगळी आहे. समाज कितीही पुढारला तरी अस्पृश्यता समूळ कधी नष्ट होईल याची शाश्वती देता येत नाही. तंत्रज्ञान कितीही प्रगत झाले तरी अस्पृश्यता नष्ट होत नाही, यावर काजरो मधून भाष्य करण्यात आले आहे. या चित्रपटाची विशेष बाब म्हणजे याचे संपूर्ण चित्रीकरण ‘अनकट’ आहे.
View this post on Instagram
गोवा सरकारकडून पुरस्कार मिळाल्यानंतर अभिनेते विठ्ठल काळे म्हणाले की, ‘महाराष्ट्र आणि गोवा या दोन्ही राज्यांकडून माझ्या अभिनयाची दखल घेत मता पुरस्कार मिळाले हे माझं भाग्यच आहे. या पुरस्कारामुळे माझा आनंद द्विगुणित झाला आहे. यामुळे मला कामाची आणखी ऊर्जा मिळाली असून, यापुढेही उत्तम आणि दर्जेदार अभिनयाच्या संधीला मार्ग मिळाला आहे.’
दरम्यान, विठ्ठल काळे यांनी आतापर्यंत ‘बापल्योक’, ‘पुनःश्च हरिओम’, ‘लाईक अॅण्ड सबस्क्राईब’, ‘घर बंदूक बिर्याणी’, ‘राक्षस’, ‘हॉटेल मुंबई’ अशा चित्रपटात आणि ‘मानवत मर्डर्स’ या वेबसीरिजमध्ये अभिनय केला आहे. त्यांना मिळालेल्या सन्मानामुळे सर्वच स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे.
