Kangna Ranaut : आता काही खरं नाही… 78 वर्षाची आज्जी थेट कंगनाला भिडली, शिक्षा दिल्याशिवाय नाही बसणार गप्प, काय आहे प्रकरण?
Kangana Ranaut defamation case : मोहिंदर कौर या पंजाबमधील भटिंडाच्या रहिवासी असून त्या 13 एकर जमीनीच्या मालक आहेत. कंगना रानौत यांच्या एका पोस्टमुळे त्या बऱ्याच नाराज झाल्या आहे. मानहानीच्या खटल्याबद्दल त्याचं काय म्हणणं आहे ?

बॉलिवूड अभिनेत्री आणि भारतीय जनता पक्षाच्या खासदार कंगना रानौत या नुकत्याच मानहानीच्या खटल्यात भटिंडा न्यायालयात हजर झाल्या होत्या. माफी मागितल्यानंतर आणि “गैरसमजाबद्दल खेद” व्यक्त केल्यानंतर त्यांना जामीन मंजूर करण्यात आला. 78 वर्षीय शेतकरी मोहिंदर कौर यांच्यासाठी हा क्षण तर भावनिक विजय असल्याचे म्हटले जात आहे. मोहिंदर कौर या पंजाबमधील भटिंडाच्या रहिवासी असून त्यांच्याकडे 13 एकर जमीन आहे. पण असं असलं तरी त्यांचं घर अत्यंत साधारण आहे. छताला लाकडाने टेकून दिलाय आणि आजही त्या रोज सकाळी स्वयंपाक करून 80 वर्षांचे त्यांचे वृद्ध पती आणि बेडरिडन असलेल्या मुलाची सेवा करतात.
ही इज्जतीची लढाई…
एका वृत्तपत्राशी बोलताना कौर म्हणाल्या, ‘लोकांना वाटतं 13 एकर जमीन म्हणजे खूप आहे, पण ती जमीन असणं म्हणजे फार काही नाही, शेतकऱ्याची कमाई खूप कमी असते. आम्ही आधी कापूस पेरला होता, पण पीक खराब झालं. आता आम्ही भात पिकवतो. मी आयुष्यभर खूप कष्ट केले, 3 मुली आणि मुलाचं लग्न लावून दिलं. आता ही आमच्या सन्मानाची लढाई आहे, आम्ही मागे हटणार नाही’ असा निर्धार त्यांनी व्यक्त केला . त्यांच्या सुनेचं 18 महिन्यांपूर्वी निधन झालं तर मुलगा 3 महिन्यांपासून बेड रिडन आहे. ‘ आयुष्य काही सोपं नाहीये, पण मी मागे हटणार नाही. माझ्या घराता, संसाराचा भार आता माझ्या खांद्यावर आहे’असंही त्यांनी नमूद केलं.
शेतकरी आंदोलनाशी निगडीत प्रकरण काय ?
खरंतर ही घटना 2020-2021 साली झालेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलना दरम्यानची आहे. त्यावेळी कंगना रानौत यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती, ज्यामध्ये एका वृद्ध महिलेचा फोटो होता, त्यामध्ये असा दावा करण्यात आला होता की, शेतकऱ्यांच्या आंदोलनात सामील होण्यासाठी लोकं पैसे घेत आहेत. “(ही) तीच आजी आहे जी टाईम मासिकात प्रसिद्ध झाली होती (शाहीन बागची बिल्किस दादी)” असे कंगना यांनी त्या महिलेचे वर्णन केले होते. एवढंच नव्हे तर ” अशा महिला 100 रुपयांत निषेधासाठी उपलब्ध आहेत.” अशी टिप्पणी केली होती.
पण कंगना यांची ही टिप्पणी सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल झाली होती. त्यानंतर वातावरण पेटलं आणि मोहिंदर सिंग यांनी मानहानीचा खटला दाखल केला. हे ( बोलणं, टिप्पणी) आपल्या आत्मसन्मानावर हल्ला असल्याचे म्हणत त्यांनी मानहानीचा खटला दाखल केला होता.
भाजपशी संबंधित वकील लढत आहेत आजींचा खटला
मोहिंदर कौर यांचा हा खटला रघुवीर सिंह बेहनीवाल हे वकील लढत आहेत, ते बऱ्याच काळापासून भाजपशी निगडीत आहे. “कंगना या राजकारणात येण्यापूर्वीपासून मी पक्षाशी संबंधित आहे. मी मोहिंदर कौरची बाजू योग्यरित्या मांडेन का, असा प्रश्न काही लोकांनी विचारला. पण मी पंजाबच्या मातांचा अनादर सहन करणार नाही.” असे बेहनीवाल यांनी स्पष्ट केलं. आम्ही कोणाचीही माफी स्वीकारणार नाही, हा खटला पूर्णपणे लढला जाईल. कोर्टात येणं हे शेतकऱ्याच्या कुटुंबासाठी सोपं नसतं, पण मी जेव्हा त्यांना यायला सांगतो, तेव्हा ते उपस्थित असतात, असंही त्यांनी नमूद केलं.
सोमवारी, भटिंडा न्यायालयाने कंगना रानौत यांना जामीन मंजूर केला आणि आता या प्रकरणाची पुढील सुनावणी 24 नोव्हेंबर रोजी होणार आहे.
