करण जोहरने शाहरुख, काजोल, आलियासह सर्वांनाच केलं अनफॉलो; बॉलिवूडमध्ये मोठा वाद?
प्रसिद्ध निर्माता - दिग्दर्शक करण जोहरने बॉलिवूडमधल्या मोठमोठ्या सेलिब्रिटींना इन्स्टाग्रामवरून अनफॉलो केलं आहे. यामध्ये शाहरुख खान, काजोल, आलिया भट्ट, मनीष मल्होत्रा यांचाही समावेश आहे.

प्रसिद्ध दिग्दर्शक करण जोहर त्याच्या चित्रपटांमुळे तसंच सोशल मीडियावरील विविध पोस्टमुळे नेहमीच चर्चेत असतो. आता करण पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. यावेळी चर्चेमागील कारण हे त्याचा एखादा चित्रपट किंवा शो नसून त्याने इंस्टाग्राम अकाउंटवर केलेला एक मोठा बदल आहे, करण जोहरने अचानक बॉलिवूडमधल्या मोठमोठ्या कलाकारांना अनफॉलो केलं आहे. यामध्ये शाहरुख खान, काजोल, आलिया भट, करीना कपूर खान आणि त्याचा अत्यंत जवळचा मित्र, फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा यांचाही समावेश आहे. गुरुवारी नेटकऱ्यांच्या लक्षात आलं की करणच्या इंस्टाग्राम फॉलोअर्सची यादी अचानक लक्षणीयरित्या कमी झाली आहे. करण आता फक्त 78 अकाऊंट्सना फॉलो करत आहे.
करणने अचानक इतक्या लोकांना अनफॉलो का केलं, असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला असून याचा इंडस्ट्रीतील लोकांशी काही वाद झाला का, अशीही चर्चा रंगली आहे. अशातच करणने स्वतः पुढे येऊन परिस्थिती स्पष्ट केली आहे. इंस्टाग्राम स्टोरीमध्ये त्याने एक पोस्ट लिहिली असून त्यामध्ये ‘डिजिटल डिटॉक्स’चा उल्लेख केला आहे. त्याने अकाऊंट्सना अनफॉलो कोणत्याही वादामुळे किंवा संघर्षामुळे नाही तर ‘डिजिटल डिटॉक्स’चा एक भाग म्हणून केल्याचं स्पष्ट केलं.
करण जोहरची पोस्ट-
करणने त्याच्या स्टोरीमध्ये लिहिलं, ‘हा एक डिजिटल डिटॉक्स आहे. इन्स्टाग्रामवरील माझा वेळ आणि ऊर्जा कमी घालवण्यासाठी मी सर्वांना अनफॉलो करत आहे. कृपया याची राष्ट्रीय स्तरावरील बातमी करू नका. हे क्लिकबेट दुसरीकडे घेऊन जा, खरंच हास्यास्पद आहे.’ करणने अनफॉलो केलेल्या काही प्रमुख सेलिब्रिटींमध्ये शाहरुख खान, आलिया भट्ट, करीना कपूर खान, मनीष मल्होत्रा, वरुण धवन, सिद्धार्थ मल्होत्रा, मलायका अरोरा, अनन्या पांडे, कार्तिक आर्यन आणि काजोल यांचा समावेश आहे. त्याच्या फॉलोअर्समध्ये आता धर्मा प्रॉडक्शन्सचे सीईओ अपूर्व मेहता, व्यावसायिक भागीदार आदर पूनावाला आणि अभिनेत्री प्रियांका चोप्रा यांचा समावेश आहे.
करण जोहरचा नुकताच प्रदर्शित झालेला ‘चांद मेरा दिल’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर दणक्यात आपटला आहे. यामध्ये अनन्या पांडे आणि लक्ष्य लालवाणी यांच्या मुख्य भूमिका आहेत. या चित्रपटाने भारतात आतापर्यंत फक्त 20 कोटी रुपये कमावले आहेत.