Sunjay Kapoor Death : करिश्मा कपूरचा संजयसोबत शेवटचा फोटो व्हायरल, 2 वर्षांपूर्वी…
प्रसिद्ध उद्योगपती आणि करिश्मा कपूर यांचे पूर्व पती संजय कपूरचे 53व्या वर्षी लंडनमध्ये अकस्मात निधन झाले. करीना कपूर, सैफ अली खान आणि इतर नातेवाईक त्यांना धीर देण्यासाठी पोहोचले. संजयच्या निधनानंतर त्याचे आणि करिश्मा यांचे जुने फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. संजयवर दिल्लीत अंत्यसंस्कार होणार आहेत.

बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूर हिचा पूर्वाश्रमीचा पती आणि प्रसिद्ध उद्योगपती संजय कपूर यांचे यूकेमध्ये अकस्मात निधन झाले. वयाच्या 53 व्या वर्षी त्याने अखेरच श्वास घेतला. लंडनमध्ये पोलो खेळत असतानाच संजय याच्या घशात मधमाशी शिरली आणि त्याला डसी, त्यामुळे त्याला हार्ट अटॅक आला आणि तो खाली कोसळला. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं खरं, पण तोपर्यंत उशीर झाला होता. उपचारांदरम्याच संजयने अखेर श्वास घेतला. त्याच्या निधनामुळे कपूर कुटुंबियांना तर मोठा धक्का बसलाच पम बॉलिवूडमध्ये तसेच उद्योग जगतातही हळहळ व्यक्त होत आहे.
दरम्यान करिश्माच्या पूर्व पतीचे निधन झाल्याचे वृत्त समोर येताच तिची बहीण करीना, मेहुणा सैफ अली खान तसेच जिवलग मैत्रिणी मलायका अरोरा, अमृता अरोरा या दोघीही संपूर्ण कुटुंबियांसह करिश्माला धीर देण्यासाठी घरी पोहोचल्या. याचदरम्यान सध्या सोशल मीडियावर संजय कपूर तसेच करिश्मा कपूर यांचे अनेक जुने, थ्रोबॅक फोटो व्हायरल होत आहेत. त्यातच संजय आणि करिश्मा या दोघांचाही एक शेवटचा फोटोही समोर आला आहे.
लेकीच्या वाढदिवसाला शेवटचे एकत्र दिसले करिश्मा -संजय
हा फोटो 2023 सालचा आहे. लेक समायरा कपूर हिच्या 18व्या वाढदिवसाच्या निमित्ताने अभिनेत्री करिश्मा कपूर आणि संजय कपूर हे दोघे शेवटचे एकत्र दिसले होते. त्यावेळी संजयची तिसरी पत्नी प्रिया सचदेव आणि मुलंही तिथे उपस्थित होती. करिश्मा, समायरा, कियान आणि संजय या चौघांचाही हा फोटो सध्या सोशल मीडियावर पुन्हा व्हायरल झाला आहे. त्यावर अनेक कमेंट्सही येत आहेत.


करिश्मा-संजयचं लग्न
2003 साली करिश्मा कपूर आणि संजय कपूर यांचा मोठ्या थाटामाटात विवाह झाला, या सोहळ्याला हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गजांनी, कलाकारांनी हजेरी लावत दोघांनाही शुभेच्छा दिल्या होत्या. मात्र लग्नाच्या काही वर्षांनी ,2014 साली करिश्माने घटस्फोटासाठी अर्ज केला, अखेर 2016 साली करिश्मा आणि संजय कायदेशीररित्या वेगळे झाले. तेव्हामुलांचा ताबा करिश्माकडे देण्यात आला.
मात्र वेगळं होऊनही मुलांसाठी ते सोबत होते, दोघांनी मिळूम मुलांचं पालनपोषण केलं. त्यानंतर संजयने प्रिया सचजदेवशी तिसरं लग्न केलं. त्या दोघांना एक मुलगाही आहे. असं असलं तर संजय हा त्याच्या आधीच्या लग्नापासून असलेल्या दोन्ही मुलांबद्दल, समायरा आणि कियानबद्दल खूप जागरून होता, त्यांच्यासाठी त्याने बरीच गुंतवणूकही केली होती.
संजयवर दिल्लीत होणार अंत्यसंस्कार
यूकेमध्ये निधन झालेल्या संजय कपूरवर दिल्लीत अंत्यसंस्कार होणार आहेत. त्याचे सासरे आणि संजयची सध्याची पत्नी प्रिया सचदेव यांचे वडील अशोक सचदेव यांनी यासंदर्भात माहिती दिली. सध्या पोस्टमॉर्टम सुरू आहे. सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होताच, संजय याचे पार्थिव भारतात आणले जाईल आणि दिल्लीत त्याच्यावर अंत्यसंस्कार केले जातील, असं त्यांनी सांगितलं.
