कियारा अडवाणीने दिली ‘गुड न्यूज’; लवकरच बनणार आई
अभिनेत्री कियारा अडवाणीने चाहत्यांना गुड न्यूज दिली आहे. कियारा आणि सिद्धार्थ मल्होत्रा लवकरच आई-बाबा होणार आहेत. लग्नाच्या दोन वर्षांनंतर कियारा गरोदर असून सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत तिने चाहत्यांना गोड बातमी सांगितली आहे.

अभिनेत्री कियारा अडवाणी लवकरच आई होणार असून सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत तिने चाहत्यांना गोड बातमी दिली. इन्स्टाग्राम अकाऊंटवर कियाराने बाळाच्या पायातील मोज्यांचा फोटो पोस्ट केला आहे. कियारा आणि सिद्धार्थच्या हातात हे मोजे आहेत. या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने लिहिलंय, ‘आमच्या आयुष्यातील सर्वांत मोठी भेट लवकरच येत आहे.’ कियाराने हा फोटो पोस्ट करताच चाहत्यांकडून त्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. गेल्या महिन्यात कियारा आजारी असल्याची चर्चा होती. इतकंच नव्हे तर तिला रुग्णालयात दाखल केल्याचंही म्हटलं जात होतं. यामुळे ती तिच्या ‘गेम चेंजर’ या चित्रपटाच्या ट्रेलर लाँच कार्यक्रमालाही उपस्थित राहिली नव्हती.
कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांनी 7 फेब्रुवारी 2023 रोजी लग्नगाठ बांधली होती. राजस्थानमध्ये अत्यंत धूमधडाक्यात हा लग्नसोहळा पार पडला होता. ‘शेरशाह’ या चित्रपटाच्या सेटवर दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले होते. नुकताच त्यांनी लग्नाचा दुसरा वाढदिवस साजरा केला होता. लग्नाच्या दोन वर्षांनंतर कियाराने गोड बातमी दिली आहे.
View this post on Instagram
‘लस्ट स्टोरीज’ या चित्रपटाच्या रॅप अप पार्टीत कियारा आणि सिद्धार्थची पहिल्यांदा भेट झाली होती. या भेटीचं रुपांतर आधी मैत्रीत आणि त्यानंतर हळूहळू प्रेमात झालं. 2019 मध्ये या दोघांच्या डेटिंगच्या चर्चांना उधाण आलं होतं. त्यानंतर 2021 मध्ये कियारा आणि सिद्धार्थ एकमेकांच्या कुटुंबीयांशी भेटले. कियाराने सिद्धार्थ आणि त्याच्या आईवडिलांना घरी डिनरसाठी बोलावलं होतं. याच भेटीनंतर दोन्ही कुटुंबीयांनी कियारा-सिद्धार्थच्या लग्नावर शिक्कामोर्तब केला.
कियाराने 2014 मध्ये ‘फगली’ या चित्रपटातून अभिनयक्षेत्रात पदार्पण केलं. मात्र 2016 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘एम. एस. धोनी: द अनटोल्ड स्टोरी’ या चित्रपटातून ती प्रकाशझोतात आली. त्यानंतर 2018 मध्ये ‘लस्ट स्टोरीज’ या अँथॉलॉजी चित्रपटात तिने साकारलेल्या बोल्ड भूमिकेची तुफान चर्चा झाली. शाहिद कपूरसोबतच्या ‘कबीर सिंग’ या चित्रपटामुळे तिच्या लोकप्रियतेत प्रचंड वाढ झाली. कियाराने पती सिद्धार्थ मल्होत्रासोबत ‘शेरशाह’ या चित्रपटात काम केलंय.
