तुमच्या पाहुण्यांना शिकवा..; गणपतीच्या मूर्तीसोबत विचित्र फोटो काढल्याने अंबानींवर भडकले नेटकरी

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या शाही लग्नसोहळ्याला देश-विदेशातील मान्यवर उपस्थित होते. त्यात अमेरिकी टीव्ही स्टार किम कार्दशियनचाही समावेश होता. तिने सोशल मीडियावर काही फोटो पोस्ट केले असून त्यातील एका फोटोवरून नेटकरी भडकले आहेत.

तुमच्या पाहुण्यांना शिकवा..; गणपतीच्या मूर्तीसोबत विचित्र फोटो काढल्याने अंबानींवर भडकले नेटकरी
अंबानी कुटुंबीय
Image Credit source: Instagram
| Updated on: Jul 16, 2024 | 5:03 PM

सध्या फेसबुक किंवा इन्स्टाग्रामवरील अकाऊंट उघडलं की थेट अंबानींच्या लग्नात पोहोचल्यासारखं वाटतं, अशा अनेक प्रतिक्रिया नेटकरी देत आहेत. 12 जुलै रोजी अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा लग्नसोहळा अत्यंत धूमधडाक्यात पार पडला. या सोहळ्याला देश-विदेशातील अनेक मान्यवर उपस्थित होते. यात अमेरिकी रिॲलिटी टीव्ही स्टार किम कार्दशियन आणि तिची बहीण क्लोई कार्दशियन यांचाही समावेश होता. सोमवारी किमने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर या सेलिब्रेशनचे काही फोटो पोस्ट केले होते. यामध्ये तिने मनीष मल्होत्राने डिझाइन केलेला पांढऱ्या आणि चंदेरी रंगाचा लेहंगा परिधान केल्याचं पहायला मिळालं. आता ‘रेडिट’च्या एका पोस्टमध्ये असा दावा करण्यात आला आहे की किमने एका फोटोमध्ये गणपतीच्या मूर्तीसोबत अजब पोझ दिली होती. या फोटोवरून तिला प्रचंड ट्रोल करण्यात आलं.

ट्रोलिंगनंतर अखेर तिने तो फोटो सोशल मीडियावर काढून टाकला आहे. किमने पोस्ट केलेल्या फोटोमध्ये ती गणपतीच्या मूर्तीवर चेहरा ठेवून पोझ दिल्याचं पहायला मिळालं. किमने तिच्या अकाऊंटवर तो फोटो काढला असला तरी नेटकऱ्यांनी त्याआधीच त्याचे स्क्रीनशॉट व्हायरल केले आहेत. त्यावर विविध प्रतिक्रिया येत आहेत. ‘भारतीय संस्कृतीचा अपमान सहन करणार नाही’, असं एकाने लिहिलं. तर ‘अंबानींनी त्यांच्या पाहुण्यांना आधी भारतीय संस्कृती शिकवायला हवी’, असा सल्ला दुसऱ्या युजरने दिला. ‘किमला लग्नात उपस्थित राहण्यासाठी खूप पैसा मिळाला असेल. त्यामुळे तिला कशाचीच पर्वा नाही’, अशाही संतप्त प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत.

किम आणि क्लोई या दोघी बहिणी 11 जुलै रोजी मुंबईत पोहोचल्या होत्या. यावेळी मुंबईतल्या एका पंचतारांकित हॉटेलमध्ये त्यांचं भारतीय पद्धतीनुसार स्वागत करण्यात आलं होतं. त्यानंतर दोघी बहिणींनी मुंबईत ऑटोरिक्षानेही प्रवास केला. त्यांनी मुंबईत ‘द कार्दशियन’ या आपल्या शोसाठी शूटिंग केलं होतं.

सोशल मीडियावर किम कार्दशियनच्या फोटो आणि व्हिडीओंना चाहत्यांकडून मोठ्या प्रमाणावर पसंती मिळते. किमला फॉलो करणाऱ्या फॅन्सची संख्या कोट्यवधींच्या घरात आहे. किमने पोस्ट शेअर करताच त्यावर चाहत्यांकडून कमेंट्स आणि लाईक्सचा अक्षरशः पाऊस पडतो.