KING : ‘किंग’मध्ये करीना कपूरची सरप्राइज एंट्री; 15 वर्षांनी शाहरुखसोबत जमणार जोडी, ‘बेबो’चा दिसणार खास अंदाज!
KING : शाहरुख खानचा 'किंग' हा चित्रपट येत्या डिसेंबरकमध्ये रिलीज होणार आहे, त्याचं ऑलमोस्ट शूटिंग पूर्ण झालं आहे. याच दरम्यान चित्रपटात करीन कपूररच्या एंट्रीच्या बातम्या समोर येत आहेत. काय असणार तिचा रोल ?

KING : 2023मध्ये ‘पठाण’, ‘जवान’ आणि ‘डंकी’ द्वारे बॉक्सऑफीवर त्सुनामी आणल्यानंतर शाहरुख खान पुन्हा सज्ज आहे. चाहते त्याच्या आगामी चित्रपटाची आतुरतेने वाट बघतायत. त्याच्या बहुप्रतिक्षित,बहुचर्चित ‘किंग’ हा चित्रपट डिसेंबरमध्ये मोठ्या पडद्यावर येणार आहे. सिद्धार्थ आनंदने दिग्दर्शित केलेल्या पिक्चरमध्येअनेक मोठे कलाकार झळकणार असून शाहरुखची लाडकी लेक, सुहाना देखील या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पदार्पण करणार आहे. तिच्याशिवाय अभिषेक बच्चन, राणी मुखर्जी हेी चित्रपटात दिसणार आहेत. त्यातच आता या चित्रपटात बॉलिवूडची ‘बेबो’ अर्थात करीना कपूर खानची सरप्राइज एंट्री झाली आहे.
शाहरुख खान आणि करीना कपूर खान यांची जोडी मोठ्या पडद्यावर पाहून बराच काळ लोटला आहे. 2011 साली प्रदर्शित झालेल्या ‘रा.वन’ (Ra.One) या सुपरहिट साय-फाय चित्रपटात दोघे शेवटचे एकत्र दिसले होते. या चित्रपटातील करीना कपूरच्या ‘छम्मक छल्लो’ या गाण्याने त्यावेळी चांगलीच लोकप्रियता मिळवली होती. ‘रा.वन’पूर्वी शाहरुख आणि करीना यांनी ‘अशोका’ आणि ‘कभी खुशी कभी गम’ यांसारख्या गाजलेल्या चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं होतं. त्यामुळे आता तब्बल 15 वर्षांनंतर ही जोडी पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार असल्याच्या चर्चेने चाहत्यांची उत्सुकता वाढली आहे.
‘किंग’मध्ये कोणत्या भूमिकेत दिसणार करीना?
अलीकडेच पिंकविलाच्या एका रिपोर्टनुसार, करीना कपूर खान शाहरुख खानच्या आगामी ‘किंग’ चित्रपटात स्पेशल अपिअरन्स करताना दिसू शकते. रिपोर्टनुसार, करीना चित्रपटातील ‘डॅडी कूल’ या खास गाण्यात शाहरुखसोबत स्क्रीन शेअर करणार आहे. हे गाणे ‘किंग’मधील महत्त्वाच्या आकर्षणांपैकी एक ठरणार असल्याचे म्हटले जात आहे. विशेष म्हणजे, शाहरुख आणि करीना यांची जोडी यावेळी चाहत्यांना एका नव्या आणि यापूर्वी कधीही न पाहिलेल्या अंदाजात पाहायला मिळू शकते.
मिळालेल्या माहितीनुसार, ‘डॅडी कूल’ या गाण्याचे शूटिंग मोठ्या स्तरावर करण्याची तयारी सुरू आहे. करीना कपूर या गाण्याच्या शूटिंगसाठी या महिन्याच्या अखेरीस दक्षिण आफ्रिकेत शाहरुख खानसोबत सहभागी होण्याची शक्यता आहे.रिपोर्टनुसार, या खास गाण्यासाठी करीना जवळपास पाच दिवसांचा वेळ देणार आहे. निर्माते हे गाणे भव्य पद्धतीने सादर करण्यासाठी कोणतीही कसर सोडू इच्छित नसल्याचे सांगितले जात आहे.
शाहरुख खानच्या ‘किंग’साठी ‘डॅडी कूल’ हे गाणे विशेष पद्धतीने तयार केले जात असल्याची चर्चा आहे. या गाण्यात शाहरुख आणि करीना यांची केमिस्ट्री एका वेगळ्याच अंदाजात सादर केली जाणार असल्याचे म्हटले जात आहे. या गाण्याला चित्रपटाचा हायलाइट बनवण्याचा निर्मात्यांचा प्रयत्न असल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, या गाण्यात एका भारतीय कलाकारासोबत आंतरराष्ट्रीय कलाकाराचीही उपस्थिती असणार असल्याची चर्चा आहे. मात्र, संबंधित आंतरराष्ट्रीय कलाकार आणि गायकाचं नाव अद्याप गुप्त ठेवण्यात आलंय.
शाहरुखच्या वाढदिवशी मिळणार ‘किंग’ची मोठी झलक?
या रिपोर्टनंतर ‘किंग’च्या मेकर्सनी चित्रपटासाठी मोठे प्लॅन आखल्याची चर्चा सुरू झाली आहे. शाहरुख खानचा वाढदिवस 2 नोव्हेंबरला असतो, त्याच आसपास ‘किंग’शी संबंधित एखादा नवीन अॅसेट किंवा खास झलक प्रेक्षकांच्या भेटीला येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. चाहत्यांना या चित्रपटाची मोठी उत्सुकता आहे.
