लोकांचे चॉइसेस बदलतायत..; जान्हवी किल्लेकरपेक्षा रीलस्टार प्रणाली सूर्यवंशीचं अधिक आकर्षण, व्हिडीओवर किरण माने स्पष्टच बोलले
किरण माने यांनी त्यांच्या पोस्टमध्ये नांदेड सिटीतील दहीहंडी कार्यक्रमाचं उदाहरण दिलं. या कार्यक्रमात जान्हवी किल्लेकरपेक्षा इन्फ्लुएन्सर प्रणाली सुर्यवंशीचंच लोकांना अधिक आकर्षण असल्याचं पहायला मिळालं होतं.

मराठी मनोरंजन विश्वातील अभिनेते आणि लेखक किरण माने सोशल मीडियावर आपल्या परखड आणि स्पष्ट मतांसाठी ओळखले जातात. आता त्यांनी केलेल्या एका पोस्टमुळे मराठी मनोरंजनसृष्टीतील बदलत्या ट्रेंडवर चर्चा सुरू झाली आहे. गेल्या काही वर्षांत प्रेक्षकांची पसंती आणि सेलिब्रिटींकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा बदलला आहे, यावर किरण माने यांनी भाष्य केलं आहे. किरण माने यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, बदलत्या काळाची पावलं ओळखता आली पाहिजेत. त्यांच्या मते, काही वर्षांपूर्वीपर्यंत मराठी चित्रपट आणि मालिकांमधील कलाकारांना मोठं सेलिब्रिटी स्टेटस मिळत होतं. मात्र आता सोशल मीडिया आणि विशेषतः रिल्सच्या वाढत्या प्रभावामुळे हे चित्र बदललं आहे.
‘बिग बॉस मराठी’ फेम अभिनेत्री जान्हवी किल्लेकरचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एका दहिहंडीच्या कार्यक्रमात ती आणि इन्फ्लुएन्सर प्रणाली सूर्यवंशी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी जान्हवीपेक्षा अधिक महत्त्व प्रणालीलाच मिळाल्याचं पहायला मिळालं. यावरून जान्हवी मंचावर चिडलेलीही पहायला मिळाली होती.
किरण माने यांची पोस्ट-
‘बदलत्या काळाची पावलं ओळखता यायला हवीत. पूर्वी अगदी चार वर्षांपूर्वीपर्यंत मराठीत सिनेमा-टीव्ही कलाकार म्हणजे सगळ्यात मोठे ‘सेलिब्रिटी’ मानले जायचे. आज ती जागा ‘रीलस्टार्स’नी घेतली आहे. हल्ली लोकांना सिनेकलाकारांपेक्षा रीलस्टार्सचे डायलॉग ऐकायचे असतात. रीलस्टार्सना बघायचं असतं. दहीहंडीसारख्या कार्यक्रमांना मराठी कलाकारांपेक्षा रीलस्टार्स, टीव्ही-सिनेमाच्या हिरोइन्सपेक्षा गौतमीसारखे डान्सर्स जास्त मानधन घेऊ लागलेत. नांदेड सिटीच्या दहीहंडी कार्यक्रमात आमच्या ‘बिग बॉस’ फेम जान्हवीपेक्षा लोकांना रीलस्टार प्रणाली सूर्यवंशीचं जास्त अप्रूप होतं. हे एक प्रातिनिधिक उदाहरण,’ असं ते म्हणाले.
या पोस्टमध्ये त्यांनी पुढे लिहिलं, ‘हे योग्य आहे की अयोग्य.. या चर्चा होत राहतील. कोण म्हणेल मराठी कलाकारांचा आणि कलाकृतीच्या विषयांचा सर्वसामान्य प्रेक्षकांच्या जगण्याशी ‘कनेक्ट’ नाही. कोण म्हणेल हल्ली जेन झी मराठी सिरियल सिनेमे बघतच नाही. कोण म्हणेल सुमारांची सद्दी.. पण या चर्चा भाकड आहेत. त्याने परिस्थिती बदलणार नाही. काळ बदलतोय. लोकांचे ‘चॉईसेस’ बदलतायत. विशेषतः मराठी टीव्ही-सिनेमाचं ग्लॅमर झाकोळलं गेलं आहे. कारणं अनेक असतील. पण जे आहे, ते आहे.’
किरण माने यांच्या म्हणण्यानुसार, ‘बिग बॉस’ फेम जान्हवीपेक्षा रीलस्टार प्रणाली सूर्यवंशीकडे लोकांचं अधिक आकर्षण होतं. हे केवळ एक प्रातिनिधिक उदाहरण असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
