ती खंत आयुष्यभर राहील..; रील स्टार प्रथमेश कदमच्या निधनानंतर ‘कोकण हार्टेड गर्ल’ची भावूक पोस्ट
Prathamesh Kadam : सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि रील स्टार प्रथमेश कदमच्या निधनाच्या वृत्ताने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. कोकण हार्टेड गर्ल अर्थात अंकिता वालावलकरनेही प्रथमेशसाठी अत्यंत भावूक पोस्ट लिहिली आहे.

मराठमोळा रील स्टार प्रथमेश कदमच्या पार्थिवाचं सोमवारी अनेकांनी अंत्यदर्शन घेतलं. वयाच्या अवघ्या 26 व्या वर्षी प्राण गमावलेल्या प्रथमेशला पाहून अनेकांना अश्रू अनावर झाले. जड अंत:करणाने त्याला अखेरचा निरोप देण्यात आला. प्रथमेश गेल्या काही दिवसांपासून आजारी होता. रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू होते. आजारपणातूनच त्याचे आपले प्राण गमावल्याची प्राथमिक माहिती आहे. त्याच्या निधनाच्या वृत्ताने सर्वसामान्य चाहत्यांसोबत मराठी कलाविश्वातील अनेक कलाकारांना मोठा धक्का बसला आहे. सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि बिग बॉस मराठी फेम ‘कोकण हार्टेड गर्ल’ म्हणजेच अंकिता वालावलकरनेही प्रथमेशसाठी अत्यंत भावूक पोस्ट लिहिली आहे. प्रथमेशचं अंत्यदर्शन घेण्यासाठी ती त्याच्या घरी पोहोचली होती.
अंकिता वालावलकरची पोस्ट-
‘प्रथमेश आज तुझ्या अंत्यदर्शनाला तुझ्या घरी आले. तू कित्येक वेळा घरी यायला आमंत्रण दिलंस, पण कधीच येणं जमलं नाही. आज तुझ्या आईला हतबल पाहून काय घडलंय, हे क्षणभर कळलंच नाही. ज्या घरात कधी येता आलं नाही, त्या घरात आज तुझं शेवटचं दर्शन घ्यावं लागेल असं वाटलंच नव्हतं. काही नाती वेळेवर निभावता आली नाहीत, काही भेटी राहून गेल्या याची खंत राहील. जिथे असशील तिथे असं हसत रहा’, अशा शब्दांत अंकिताने तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

इन्स्टाग्रामवर प्रथमेशचे 186K फॉलोअर्स असून युट्यूबवरही त्याचा मोठा चाहतावर्ग आहे. आईसोबत मिळून बनवलेल्या रील्समुळे तो अधिक लोकप्रिय झाला होता. कमी वयात त्याने प्रचंड प्रसिद्धी मिळवली होती. प्रथमेशचा जवळचा मित्र तन्मय पाटेकरने सोशल मीडियावर पोस्ट लिहित त्याच्या निधनाची बातमी सर्वांना सांगितली होती. ‘तू सदैव आठवणीत राहशील प्रथमेश. देवाघरी स्वत:ची काळजी घे रे, खूप आठवण येईल तुझी, मिस यू भाई’, अशी पोस्ट त्याने लिहिली होती.
वडिलांच्या निधनानंतर प्रथमेशने त्याच्या कुटुंबाची जबाबदारी सांभाळली होती. त्याने आईलाही धीर दिला होता. आईसोबत मिळून तो सोशल मीडियावर रील पोस्ट करू लागला होता आणि त्याला नेटकऱ्यांकडूनही चांगला प्रतिसाद मिळत होता. मायलेकाची जोडी सोशल मीडियावर पसंतीस उतरली होती. आधी पती आणि आता पोटच्या मुलाचं निधन झाल्यामुळे प्रथमेशच्या आईवर दु:खाचा मोठा डोंगर कोसळला आहे.
