‘ये रिश्ता..’ फेम शिवांगीचं 14 वर्षांनी मोठ्या अभिनेत्याशी ब्रेकअप; कुशल म्हणाला ‘5 महिन्यांपासून..’
'बरसातें' या मालिकेत एकत्र काम करताना अभिनेत्री शिवांगी जोशी आणि कुशल टंडन एकमेकांच्या प्रेमात पडले. परंतु आता या दोघांचे मार्ग वेगळे झाले आहेत. खुद्द कुशलने सोशल मीडियावर पोस्ट लिहित चाहत्यांना याबद्दची माहिती दिली.

‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेत नायराची भूमिका साकारून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री शिवांगी जोशी सध्या तिच्या खासगी आयुष्यामुळे सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. गेल्या काही महिन्यांपासून अभिनेता कुशल टंडनसोबत तिच्या अफेअरच्या चर्चा होत्या. या दोघांनी ‘बरसातें’ या मालिकेत एकत्र काम केलं होतं. परंतु रविवारी कुशलने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये एक पोस्ट लिहित शिवांगीसोबत ब्रेकअप झाल्याचा खुलासा केला. ही पोस्ट वाचून या दोघांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला. मात्र काही वेळानंतर त्याने ही पोस्ट डिलिट केली. त्यामुळे नेटकरी आणखी पेचात पडले.
कुशाल टंडनची पोस्ट-
‘मी ज्या लोकांवर प्रेम करतो, त्यांना फक्त हे सांगू इच्छितो की मी आणि शिवांगी आता एकमेकांसोबत नाही आहोत. आमच्या ब्रेकअपला पाच महिने झाले आहेत’, असं त्याने या पोस्टमध्ये लिहिलंय. इतकंच नव्हे तर शिवांगी आणि कुशलने एकमेकांना इन्स्टाग्रामवर अनफॉलोसुद्धा केलंय. नेटकऱ्यांना आश्चर्य वाटण्यामागचं आणखी एक कारण म्हणजे जरी कुशलने त्याच्या पोस्टमध्ये पाच महिन्यांपूर्वीच ब्रेकअप झाल्याचं म्हटलं असलं तरी याच वर्षाच्या 28 मार्चला शिवांगीने त्याच्यासाठी वाढदिवसाची पोस्ट लिहिली होती.
कुशलसोबतचा फोटो शेअर करत तिने लिहिलं होतं, ‘तुझा हा दिवस आणि पुढील संपूर्ण वर्ष अविस्मरणीय जावो यासाठी शुभेच्छा. या वर्षात तुला आनंद, यश आणि तुला जे हवं ते मिळो. तसंच अनेक उत्साहपूर्ण संधी, विकास आणि तुझ्या चेहऱ्यावर हास्य आणणाऱ्या सुंदर क्षणांनी हे वर्ष भरलेलं असो अशी आशा आहे. तुला तुझ्या आयुष्यात सर्वकाही चांगलंच मिळू दे. खूप प्रेम.’ दुसऱ्या बाजूला 20 मे रोजी शिवांगीच्या वाढदिवशी मात्र कुशलने सोशल मीडियावर कोणतीच पोस्ट लिहिली नव्हती. त्यामुळे चाहत्यांच्या मनात संभ्रम निर्माण झाला होता.

गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये कुशलने शिवांगीला डेट करत असल्याची कबुली दिली होती. त्याआधी दोघांचे काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. ‘टाइम्स ऑफ इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत शिवांगीबद्दल कुशल म्हणाला होता, “मी नक्कीच तिच्या प्रेमात आहे. परंतु आम्हाला लग्नाची घाई नाही. आम्ही हळूहळू पुढे जातोय.”
‘बरसातें- मौसम प्यार का’ या मालिकेत काम करताना दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले. एकता कपूरच्या या मालिकेत शिवांगीने आराधना सहानीची भूमिका साकारली होती. तर कुशल यामध्ये रेयांश लांबाच्या भूमिकेत होता. जुलै 2023 ते फेब्रुवारी 2024 पर्यंत ही मालिका चालली होती. शिवांगी आणि कुशलच्या वयात 14 वर्षांचं अंतर आहे. शिवांगी 25 वर्षांची तर कुशल 39 वर्षांचा आहे.
