समजावलं होतं, सलमानपासून दूर रहा तरी..; गुरु रंधावाच्या जिमबाहेरील गोळीबारानंतर बिष्णोई गँगची पोस्ट
आरोपीला पकडण्यासाठी पोलीस पथकाकडून घटनास्थळाच्या आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली जात आहे. घटनास्थळी फॉरेन्सिक टीमलाही बोलावण्यात आलं असून ते पुरावे गोळा करत आहेत.

प्रसिद्ध पंजाबी गायक गुरू रंधावाच्या दिल्लीतल्या जिमबाहेर गोळीबाराच्या घटनेनं खळबळ उडाली आहे. अज्ञात हल्लेखोरांनी गुरुवारी सकाळी गुरू रंधावाच्या मालकीच्या जिमबाहेर गोळीबार केला. सुदैवाने या गोळीबारात कोणालाही दुखापत झाली नाही. केवळ धमकावण्याच्या हेतूने हा गोळीबार केल्याचं समजतंय. या घटनेनंतर सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल झाली आणि त्यात लॉरेन्स बिष्णोई गँगने जबाबदारी घेतल्याचा दावा करण्यात आला आहे. या पोस्टमध्ये गुरू रंधावाला थेट धमकी देण्यात आली आहे.
काय आहे पोस्टमध्ये?
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या पोस्टमध्ये लिहिलंय, ‘जय महाकाल, जय श्रीराम. सर्व बंधूंना रामराम. आज दिल्लीतल्या गुरू रंधावाच्या 24 अव्हर्स फिटनेस या जिमवर जो गोळीबार झाला, तो मी अनिल पंडित USA आणि लॉरेन्स बिष्णोई गँगने केला आहे. तो सलमान खानच्या जरा जास्तच जवळचा झाला होता. त्याला आम्ही आधीच समजावलं होतं की त्याच्यापासून लांब राहा, तो आमचा शत्रू आहे. परंतु त्याला ही गोष्ट समजली नाही. आमचे जितके शत्रू आहेत, मग ते कोणत्याही कोपऱ्यात लपलेले का असेना, सर्वांशी लवकरच भेट होईल (वेट अँड वॉच).’ या पोस्टच्या शेवटी एक टिपसुद्धा लिहिण्यात आली आहे. त्यात म्हटलंय, ‘आणि हे जितके देशद्रोही आहेत, जे देशाविरोधात कट रचत आहेत, त्यांनी जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात लपण्याचा प्रयत्न केला तरी तिथे येऊन मारणार.’ यात बिष्णोई गँगच्या काहींची नावंसुद्धा लिहिण्यात आली आहेत. त्यात लॉरेन्स बिष्णोई ग्रुप, जितेंद्र गोगी मान ग्रुप, हॅरि बॉक्सर, आरझू बिष्णोई, टायसन बिष्णोई, शुभम लोणकर, हरमन संधू, अंकित सिरसा यांचा समावेश आहे.
सोशल मीडियावरील पोस्ट-

काळवीट शिकार प्रकरणापासून अभिनेता सलमान खान हा बिष्णोई गँगच्या निशाण्यावर आहे. सध्या दिल्ली पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. गुरुवारी सकाळी दिल्लीच्या पश्चिम विहार परिसरात एका जिमबाहेर गोळीबाराचा आवाज ऐकू आल्याने परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं. पहाटे 5 वाजताच्या सुमारास दुचाकीवरील दोन अज्ञात व्यक्तींनी जिमबाहेर सात गोळ्या झाडल्या आणि नंतर तिथून पसार झाले. गोळीबाराचा आवाज ऐकून परिसरातील रहिवासी घाबरले. त्यांन तात्काळ पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर लगेचच अनिल पंडित नावाच्या व्यक्तीची फेसबुक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली.
