‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ सिनेमा कायद्याच्या कचाट्यात, कोर्टाने घेतला मोठा निर्णय
‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ सिनेमाच्या प्रतिक्षेत चाहते, पण सिनेमा अडकलाय वादाच्या भोवऱ्यात, निर्मात्यांविरोधात मुंबई उच्च न्यायालयात दावा दाखल, कोर्टाने सुनावला मोठा निर्णय

‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ सिनेमाची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे. प्रेक्षक देखील सिनेमाच्या प्रतिक्षेत आहेत. तर दुसरीकडे प्रदर्शनापूर्वी सिनेमा वादच्या भोवऱ्यात अडकला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एव्हरेस्ट एंटरटेन्मेंट एलएलपी या चित्रपट निर्मिती कंपनीने प्रख्यात अभिनेते आणि निर्माते महेश वामन मांजरेकर तसेच त्यांच्या आगामी ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ सिनेमाच्या निर्मात्यांविरोधात मुंबई उच्च न्यायालयात दावा दाखल केला आहे. दरम्यान याप्रकरणी कोर्टाने देखील मोठा निर्णय सुनावलेला आहे.
मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या दाव्यानुसार, बंधनकारक कराराचे उल्लंघन, कॉपीराइटचे उल्लंघन आणि जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. हा वाद 2009 साली प्रदर्शित झालेल्या ‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’ या सिनेमाच्या मालकी हक्क आणि बौद्धिक संपदा हक्कांशी संबंधित आहे.
कोर्टाने सुनावला मोठा निर्णय
सिनेमाची निर्मिती एव्हरेस्ट एंटरटेन्मेंट एलएलपी आणि महेश मांजरेकर यांनी मेसर्स अश्वमी फिल्म्सच्या बॅनरखाली संयुक्तपणे केली होती. त्यात एव्हरेस्टकडे 60 टक्के आणि महेश मांजरेकर यांच्याकडे 40 टक्के हक्क असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
मुंबई उच्च न्यायालयात सुनावणीत दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकल्यानंतर, उच्च न्यायालयाने नव्या सिनेमाच्या निर्मात्यांना एव्हरेस्ट एंटरटेन्मेंटसाठी सिनेमाचे विशेष स्क्रीनिंग आयोजित करण्याचे निर्देश दिले आहेत. हे प्रदर्शन 20 ऑक्टोबर 2025 रोजी होणार असल्याची माहिती देखील समोर येत आहे.
‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ सिनेमाच्या टीझर लॉन्च दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे उपस्थित होते. तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कामाचं कारण देत टीझरला येणं टाळलं…
‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’ सिनेमाचा सिक्वल आहे ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’?
‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ सिनेमाची घोषणा झाल्यानंतर अनेकांना असं वाटलं की ‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’ सिनेमाचा सिक्वल आहे. पण नवीन सिनेमा कोणत्या सिनेमाता सिक्वल, दुसरा भाग नसल्याचं महेश मांजरेकर यांनी सांगितलं आहे. मांजरेकर म्हणाले, ‘सिनेमाचा पूर्वी प्रदर्शित झालेल्या सिनेमाशी थेट किंवा अप्रत्यक्ष संबंध नाही. हा सिनेमा आमच्या श्रद्धेतून जन्माला आलेला सिनेमा आहे…’
