‘महावतार नरसिम्हा’ची डरकाळी; रक्षाबंधनला मोडला सलमान-अजयचा विक्रम
Mahavatar Narsimha Box Office Collection : 'महावतार नरसिम्हा' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटाने रक्षाबंधननिमित्त जबरदस्त कमाई केली आहे. यादिवशी सलमान खान आणि अजय देवगणच्या चित्रपटांचाही विक्रम मोडला आहे.
एखादा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाल्यानंतर, हळूहळू सरत्या दिवसासोबत त्याची कमाई कमी होऊ लागते. परंतु ‘महावतार नरसिम्हा’ याला अपवाद ठरतोय. या चित्रपटाची कमाई सुरुवातीला धीम्या गतीने सुरू होती, परंतु हळूहळू कलेक्शनमध्ये जबरदस्त वाढ झाली. आता रक्षाबंधनच्या सुट्टीनिमित्त प्रेक्षकांनी थिएटरमध्ये गर्दी केली होती आणि ‘महावतार नरसिम्हा’चे शोज हाऊसफुल झाले होते. यादिवशी या चित्रपटाने छप्परफाड कमाई केली आहे. कन्नड चित्रपटसृष्टीतील ‘होम्बाले फिल्म्स’ या प्रतिष्ठित निर्मिती संस्थेनं हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आणला आहे. ‘महावतार नरसिम्हा’ हा त्यांच्या फ्रँचाइजीमधील पहिलाच ॲनिमेटेड चित्रपट आहे. भगवान विष्णूच्या विविध अवतारांचे आणखी काही ॲनिमेटेड चित्रपट येत्या काळात प्रदर्शित होणार आहेत.
25 जुलै रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने पहिल्या दिवशी फक्त 1.75 कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता. सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, प्रदर्शनाच्या पहिल्याच आठवड्यात ‘महावतार नरसिम्हा’ने एकूण 44.75 कोटी रुपयांची कमाई केली होती. दुसऱ्या आठवड्यात कमाईत जबरदस्त वाढ झाली आणि भारतातील कमाईचा आकडा 73.4 कोटी रुपयांवर पोहोचला होता. ‘महावतार नरसिम्हा’ने प्रदर्शनाच्या पंधराव्या दिवशी 7.5 कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता. या चित्रपटाला रक्षाबंधनच्या सुट्टीचा खूप चांगला फायदा झाला. यादिवशी तब्बल 19.50 कोटी रुपयांची कमाई झाली. आता लवकरच कमाईचा 150 कोटींचा टप्पा पार होणार आहे. गेल्या 16 दिवसांत या चित्रपटाची एकूण कमाई 145.15 कोटी रुपये इतकी झाली आहे.
‘महावतार नरसिम्हा’ने सोळाव्या दिवसाच्या कमाईनंतर अनेक सुपरहिट चित्रपटांचा विक्रम मोडला आहे. आयुषमान खुरानाच्या ‘ड्रीम गर्ल’ (141.3 कोटी रुपये), अजय देवगणच्या ‘सिंघम रिटर्न्स’ (140.06 कोटी रुपये) आणि सलमान खानच्या ‘दबंग’ (140.22 कोटी रुपये) या चित्रपटांच्या लाइफटाइम कलेक्शनला मात दिली आहे. यासह ‘महावतार नरसिम्हा’ हा या भारतीय सिनेसृष्टीतील 76 वा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. अवघ्या 15 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाचं दिग्दर्शन अश्विन कुमार यांनी केलं आहे. हिंदीसह हा चित्रपट तमिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम भाषेतही प्रदर्शित झाला आहे.
