अवघ्या 9 दिवसांत बजेटच्या 480% कमाई; लहानांपासून मोठ्यापर्यंतची थिएटरमध्ये गर्दी
विशेष म्हणजे प्रदर्शनापूर्वी या चित्रपटाची कुठेच फारशी चर्चा नव्हती. निर्मात्यांनी त्याच्या प्रमोशनवरही कोट्यवधी रुपये खर्च केले नव्हते. तरीही सोशल मीडिया आणि माऊथ पब्लिसिटीमुळे हा चित्रपट सध्या जबरदस्त कमाई करत आहे.
बॉक्स ऑफिस आणि सोशल मीडियावर एकीकडे ‘सैयारा’ची लाट असताना एक असा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला, ज्याने कोणताच गाजावाजा न करता आपली विशेष छाप सोडली आहे. अत्यंत कमी बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने चौपट नफा कमावला आहे. 25 जुलै रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाची अजूनही बॉक्स ऑफिसवर मजबूत पकड आहे. या चित्रपटाचं नाव आहे ‘महावतार नरसिम्हा’. या चित्रपटाच्या कमाईचा आलेख चढताच असून प्रदर्शनाच्या नवव्या दिवशीही प्रेक्षकांकडून जबरदस्त प्रतिसाद मिळाला आहे. अश्विन कुमार दिग्दर्शित हा ॲनिमेटेड चित्रपट पाहण्यासाठी लहानांपासून मोठे.. सर्वच वयोगटातील प्रेक्षक उत्सुक असल्याचं पहायला मिळत आहे.
महावतार नरसिम्हाची कमाई-
पहिला दिवस- 1.75 कोटी रुपये दुसरा दिवस- 4.6 कोटी रुपये तिसरा दिवस- 9.5 कोटी रुपये पाचवा दिवस- 6 कोटी रुपये सहावा दिवस- 7.7 कोटी रुपये आठवा दिवस- 7.5 कोटी रुपये नववा दिवस- 15 कोटी रुपये आतापर्यंतची एकूण कमाई- 67.95 कोटी रुपये
‘महावतार नरसिम्हा’ हा चित्रपट फक्त 15 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनल्याचं म्हटलं जात आहे. जर या चित्रपटाच्या जगभरातील कमाईमध्ये आजच्या देशांतर्गत कमाईची भर घातली आणि बजेट आणि नफ्याची टक्केवारी काढली तर ते आधीच बजेटच्या 480 टक्क्यांहून अधिक वसूल झालं आहे. या कमाईसह ‘महावतार नरसिम्हा’ हा या वर्षातील तिसरा ब्लॉकबस्टर चित्रपट ठरला आहे. या यादीत पहिल्या क्रमांकावर ‘छावा’ आहे. विकी कौशलच्या या चित्रपटाने जगभरात 807.88 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर अहान पांडेचा ‘सैयारा’ आहे. 60 कोटी रुपयांच्या बजेटमधून त्याने जगभरात 450 कोटी रुपये कमावले आहेत.
‘महावतार नरसिम्हा’ या चित्रपटात भगनाव विष्णूच्या चौथ्या अवताराची कथा दाखवण्यात आली आहे. भक्त प्रल्हादचा जीव वाचवण्यासाठी आणि त्याचे वडील असुर हिरण्यकश्यपूचा वध करण्यासाठी विष्णू नरसिम्हाचा अवतार घेतात. हा चित्रपट ॲनिमेटेड असल्याने त्यात व्हिज्युअल इफेक्ट्स व्हीएफएक्सचंच मुख्य काम आहे. ज्या पद्धतीने या चित्रपटाचं VFX आहे, ते पाहून तुम्ही सहज म्हणू शकता की याबाबतीत होम्बाले फिल्म्सने हॉलिवूडच्या प्रसिद्ध सिनेमॅटिक युनिव्हर्स मार्वललाही मागे टाकलंय. चित्रपटाच्या यशात VFX चा खूप मोठा वाटा आहे.
