ग्लॅमर विश्वात मन अस्थिर होताच अध्यात्माकडे वळले सेलिब्रिटी; काहींनी घेतला संन्यास तर काही..
बॉलिवूड आणि ग्लॅमरच्या विश्वात एकदा कोणी आलं की मग तो त्याच इंडस्ट्रीत रमून जातो, असं म्हटलं जातं. पैसा, प्रसिद्धी, ऐशोआराम हे सर्व सोडायची इच्छा सहसा कोणाची होत नाही. मात्र फिल्म इंडस्ट्रीत असे काही कलाकार आहेत, ज्यांनी झगमगतं ग्लॅमरचं विश्व सोडून संन्यास घेतला. यात ममता कुलकर्णी सध्या खूप चर्चेत आहे.

ग्लॅमर इंडस्ट्री हे एक असं क्षेत्र आहे, जिथे प्रत्येक कलाकाराचं मोठं स्टार बनण्याचं स्वप्न असतं. अभिनयक्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी ग्लॅमरचं विश्व हे स्वप्नवत असतं. असंख्य कलाकार या क्षेत्रात काम करण्यासाठी येतात, पण त्यापैकी मोजक्याच लोकांचं नशीब फळफळतं. इंडस्ट्रीत असेही कलाकार आहेत, जे आपल्या मेहनतीच्या जोरावर प्रचंड यशस्वी झाले आणि दुसरीकडे काहीजण असेही आहेत, ज्यांना अपेक्षित यश न मिळाल्याने ते दुसऱ्या क्षेत्राकडे वळले. या सगळ्यात तिसरा गट असाही आहे, ज्यामध्ये ठराविक कलाकारांनी यश आणि ग्लॅमर विश्वाची मनसोक्त चव चाखली आणि त्यानंतर त्यांनी स्वत:हून या सर्वांपासून दूर जाण्याचं ठरवलं. पैसा, प्रसिद्धी मिळाल्यानंतर हे कलाकार अध्यात्माकडे झुकले. या यादीतलं ताजं नाव म्हणजे अभिनेत्री ममता कुलकर्णी. उत्तर प्रदेशातल्या प्रयागमध्ये होणाऱ्या महाकुंभमध्ये तिने संन्यास घेतला आणि ती किन्नर अखाड्याची महामंडलेश्वर बनली. ममताच्या आधी इतर अनेक कलाकारांनी अध्यात्माचा मार्ग निवडला आहे.
ही तीच ममता कुलकर्णी आहे, जी कधी मॅगझिनवरील बोल्ड फोटोशूटमुळे तर कधी अंडरवर्ल्डसोबतच्या कनेक्शनमुळे चर्चेत होती. मात्र आता ती मायानगरी सोडून साधू-संतांच्या दुनियेत गेली आहे. पिंडदान आणि पट्टाभिषेक या विधींनंतर ममताने भगवे वस्त्र परिधान करून संन्यास घेतला आहे. एकेकाळी अत्यंत ग्लॅमरस दिसणारी ममता आता भगवे वस्त्र, रुद्राक्ष माळा आणि कपाळावर चंदनाचा टिळा.. अशा रुपात दिसते. किन्नर अखाड्याची महामंडलेश्वर बनून ममता आता अध्यात्माच्या दुनियेत लीन झाली आहे. आता पुन्हा चित्रपटांमध्ये काम करणं सध्या तरी शक्य नसल्याचं ममताने स्पष्ट केलंय. झगमगतं कलाविश्व सोडून अध्यात्माचा मार्ग स्वीकारलेल्या इतर सेलिब्रिटींबद्दलही जाणून घेऊयात..
विनोद खन्ना, महेश भट्ट, विजय आनंद
हिंदी चित्रपटसृष्टीतील गाजलेले अभिनेते विनोद खन्ना आणि निर्माते-दिग्दर्शक महेश भट्ट, विजय आनंद हे ओशो म्हणजेच आचार्य रजनीश यांच्या विचारांनी खूप प्रभावित झाले होते. ओशोंचा त्यांच्यावर इतका प्रभाव होता की भगवे वस्त्र परिधान करून, रुद्राक्षाच्या माळा घालून ते संन्यासी जीवन जगू लागले होते. विनोद खन्ना हे 1975 पासूनच ओशोंच्या विचारांनी प्रभावित झाले होते. 1982 ते 1987 पर्यंत ते रजनीश यांच्या अमेरिकेतल्या आश्रमात राहिले आणि स्वामी विनोद भारती म्हणून ओळखले जाऊ लागले. करिअरच्या शिखरावर असताना विनोद खन्ना यांनी सर्वकाही सोडण्याचा निर्णय घेतला, तेव्हा सर्वांनाच मोठा धक्का बसला होता. त्यांच्याचप्रमाणे महेश भट्ट आणि देव आनंद यांचे भाऊ विजय आनंद हेसुद्धा ओशोंच्या आश्रमात संन्यासी बनले होते. मात्र तिथे काही काळ राहिल्यानंतर ते संसारात परतले आणि नेहमीसारखं आयुष्य जगू लागले.




राज कपूर यांचे नातेवाईक प्रेमनाथ
अभिनेते प्रेमनाथ, राज कपूर आणि प्रेम चोप्रा हे एकमेकांचे नातेवाईक होते. प्रेमनाथ हे इंडस्ट्रीतील हँडसम अभिनेते म्हणून ओळखले जायचे. राज कपूर आणि नरगिस यांच्या ‘बरसात’ या चित्रपटात त्यांनी रोमँटिक भूमिका साकारली होती. एकेकाळी राज कपूर, देव आनंद आणि दिलीप कुमार यांच्यापेक्षाही अधिक मानधन प्रेमनाथ घ्यायचे, असं म्हटलं जातं. प्रेमनाथ यांचं स्वप्न हिरो बनायचं होतं. मात्र दिलीप कुमार यांच्यासमोर त्यांना हार मानावी लागली होती. जेव्हा प्रेमनाथ यांच्या करिअरमध्ये पडता काळ आला, त्यांचे चित्रपट फ्लॉप होऊ लागले, तेव्हा हताश होऊन ते साधू बनले. अनेक वर्षांपर्यंत ते ग्लॅमरच्या विश्वापासून दूर राहिले. मात्र तिथेही ते फार काळ स्थित राहू शकले नव्हते. चित्रपटसृष्टीत परतल्यानंतर त्यांनी ‘बादल’, ‘बॉबी’, ‘जॉनी मेरा नाम’ आणि ‘जानी दुश्मन’ यांसारख्या चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या होत्या.
सुचित्रा सेन आणि नीता मेहता
अध्यात्मात काही काळ घालवल्यानंतर ठराविक कलाकार पुन्हा नेहमीच्या आयुष्यात परतले. मात्र असेही काही कलाकार आहेत, ज्यांनी आपलं आयुष्य अध्यात्मासाठी समर्पित केलं. साठ-सत्तरच्या दशकातील हिंदी आणि बंगाली चित्रपटांमधील लोकप्रिय अभिनेत्री सुचित्रा सेन त्यातलीच एक आहे. सुचित्राने हिंदीत संजीव कुमारसोबत ‘आंधी’सारख्या बहुचर्चित चित्रपटात दमदार भूमिका साकारली होती. याशिवाय तिने ‘देवदास’ (1955), ‘बम्बई का बाबू’ (1960), ‘ममता’ (1966) यांसारख्या चित्रपटांमध्येही काम केलंय. तब्बल 25 वर्षांच्या करिअरनंतर तिने 1978 मध्ये चित्रपटांमधून निवृत्ती घेतली आणि अध्यात्माकडे वळण्याचा निर्णय घेतला. अखेरच्या श्वासापर्यंत तिने आपलं आयुष्य रामकृष्ण मिशनच्या सेवा आश्रमात घालवलं होतं.
सुचित्रा सेनप्रमाणेच हिंदी आणि गुजराती चित्रपटांमधील प्रसिद्ध अभिनेत्री नीता मेहतानेही झगमगत्या चित्रपटसृष्टीला रामराम केला होता. नीता ही अभिनेत्रीसोबत लेखिकासुद्धा होती. तिने ‘रिश्ता कागज का’, ‘पोंगा पंडित’, ‘हीरो’ यांसारख्या जवळपास 40 चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या होत्या.
बरखा मदन
बरखा मदन ही एकेकाळी अत्यंत लोकप्रिय मॉडेल, ब्युटी क्वीन आणि अभिनेत्री होती. मात्र बौद्ध भिक्षु बनण्यासाठी तिने कलाविश्व सोडलं. त्यानंतर बरखाने तिचं नावही बदललं असून आता ती ग्यालटेन सामटेन (Gyalten Samten) म्हणून ओळखली जाते. बरखा मॉडेलिंग इंडस्ट्रीमध्ये खूप लोकप्रिय होती. तिने 1994 मध्ये ‘मिस इंडिया’ या सौंदर्यस्पर्धेत सुष्मिता सेन आणि ऐश्वर्या राय यांना टक्कर दिली होती. त्यानंतर 1996 मधअये तिने ‘खिलाडियों का खिलाडी’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. काही वर्षे चित्रपटसृष्टीत काम केल्यानंतर ती टीव्हीकडे वळली. मात्र 2012 मध्ये तिने या झगमगत्या विश्वाला कायमचा रामराम केला. दलाई लामा यांच्या विचारांनी प्रभावित झालेल्या बरखाने 2012 मध्ये बौद्ध धर्म स्वीकारला. त्यानंतर बौद्ध भिक्षु बनत तिने तिचं नावंही बदललं.
बरखाने याविषयी सांगितलं होतं की, तिच्या आयुष्यात सर्वकाही ठीक चालू होतं. मात्र त्यात काहीतरी कमतरता असल्याची जाणीव तिला झाली. आईवडिलांना याविषयी सांगितल्यानंतर त्यांनीसुद्धा बरखाच्या निर्णयाला पाठिंबा दिला.
अनघा भोसले
‘अनुपमा’ या लोकप्रिय मालिकेत भूमिका साकारलेली मराठमोळी अभिनेत्री अनघा भोसलेनं काही वर्षांपूर्वी अभिनयक्षेत्राला रामराम केला. देव आणि अध्यात्माचं कारण देत तिने हा निर्णय घेतला होता. ‘मी अध्यात्माच्या मार्गावर चालण्याचा निर्णय घेतला आहे. अध्यात्माविषयी असलेल्या श्रद्धेमुळे मी हा निर्णय घेतला आहे. तुम्ही सर्वजण आपापले कर्म करत राहाल आणि जे तुम्हाला भगवान श्रीकृष्णापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांच्यापासून स्वत: दूर व्हाल हे मला माहित आहे’, अशी पोस्ट तिने सोशल मीडियावर लिहिली होती. वयाच्या 23 व्या वर्षीच अनघाने तिच्या आयुष्यातील मोठा निर्णय घेतला होता.
अनघाने कृष्णभक्तीचा मार्ग स्वीकारला आहे. “जर तुम्ही एकदा भगवान श्रीकृष्णाचा हात पकडला तर ते तुमचा हात कधीच सोडत नाहीत. भक्तीचा मार्गच तुम्हाला शांतीच्या दिशेने नेऊ शकतो,” असं ती म्हणते. अनघा कृष्ण भक्त असून तिने अद्याप संन्यास घेतला नाही. जी व्यक्ती तिच्याप्रमाणेच कृष्ण भक्त असेल, त्याच्याशीच लग्न करणार असल्याचं तिने सांगितलं.
सोफिया हयात
प्रसिद्ध रिॲलिट शो स्टार सोफिया हयातसुद्धा ग्लॅमरचं विश्व सोडून नन बनली. त्यानंतर तिच्या व्यक्तीमत्त्वात महत्त्वपूर्ण बदल झाल्याचं पहायला मिळालं. सोफिया ही सलमान खानच्या ‘बिग बॉस’ या शोमध्येही झळकली होती. त्यानंतर तिने लगेच साखरपुडासुद्धा केला होता. मात्र जून 2016 मध्ये सोफियाने अध्यात्माच्या मार्गावर वाटचाल करत असल्याचं जाहीर केलं होतं. नन बनल्यानंतर तिने आपलं नाव गाइया सोफिया मदर असं ठेवलंय.
अनु अग्रवाल
‘आशिकी’ या चित्रपटामुळे प्रचंड लोकप्रियता मिळवलेली अभिनेत्री अनु अग्रवालने जेव्हा अध्यात्माचा मार्ग स्वीकारला, तेव्हासुद्धा सर्वांना मोठा धक्का बसला होता. एका मुलाखतीत अनु याविषयी म्हणाली होती, “एक बॅग, दोन जोडी कपडे, एक स्वेटर फक्त इतक्याच सामानात मी अनेक वर्ष राहिले. -5 अंश सेल्सिअस तापमानात आम्ही गिझर किंवा हिटरशिवाय राहायचो. आमचा पहिला क्लास पहाटे 4.30 वाजता असायचा, त्यासाठी मी 2.30 वाजता उठून सर्व कामं आवरायची. थंड पाण्यात आम्ही अंघोळ करायचो, कपडे धुवायचो. कित्येक महिने माझे हातपाय गारठलेले होते. मला टक्कल असल्याने मी फक्त एक लोकरीची टोपी वापरायचे. पण या सर्व गोष्टींनंतर उर्वरित संपूर्ण दिवस अत्यंत शांततापूर्ण असायचा. आलिशान आयुष्यापासून मी पूर्णपणे दूर गेले होते.” हिंदी फिल्म इंडस्ट्रीत पैसा आणि प्रसिद्धी मिळाल्यानंतर अनु ज्याप्रकारे आयुष्य जगत होती, त्याच्या अत्यंत विरुद्ध आयुष्य ती अध्यात्माचा मार्ग स्वीकारल्यानंतर जगू लागली होती.