माझ्यावरही 75 लाखांचं कर्ज, 750 मध्ये मांडवली होईल का? बड्या उद्योगपतीच्या कर्ज सेटलमेंटवर मराठी अभिनेत्याची खोचक पोस्ट
एका बड्या उद्योगपतीच्या थकीत कर्जाबाबत NCTL ने मोठा दिलासा दिला आहे. यानंतर आता एका मराठी अभिनेत्याने सोशल मीडियावर लिहिलेली पोस्ट नेटकऱ्यांचं विशेष लक्ष वेधून घेत आहे.

उद्योगपती आणि झी ग्रुपचे संस्थापक सुभाष चंद्रा यांच्या वैयक्तिक दिवाळखोरीच्या प्रकरणावरून सध्या देशभरात चर्चा सुरू आहे. तब्बल 22 हजार कोटी रुपयांहून अधिक रकमेच्या दाव्यांवर केवळ काही कोटी रुपयांच्या परतफेडीच्या योजनेला NCLTने मंजुरी दिली. यानंतर या प्रकरणावर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर मराठी अभिनेते विक्रम गायकवाड यांनी सोशल मीडियावर उपरोधिक पोस्ट करत या प्रकरणावर भाष्य केलं आहे.
विक्रम गायकवाड यांनी इन्स्टाग्राम पोस्टमध्ये लिहिलं, ‘माझ्यावर पण 75 लाखांचं कर्ज आहे. साडेसातशेमध्ये मांडवली होईल का? कॅश देतो हवंतर.’ या पोस्टसोबत त्यांनी ‘विचारून बघायला काय हरकत आहे’ असं कॅप्शनही दिलं. या पोस्टद्वारे त्यांनी सुभाष चंद्रा यांच्या कर्जप्रकरणातील मंजूर झालेल्या परतफेडीच्या रकमेवर उपरोधिक भाष्य केलं आहे. त्यांच्या पोस्टवर चाहत्यांनी आणि काही कलाकारांनीही मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. ‘तुझं झालं की सांग भावा, माझं पण करून टाकू’, असं एकाने लिहिलं आहे. तर ‘7500 म्हटलं तरी करून घ्या’, असं दुसऱ्याने म्हटलं आहे.
सुभाष चंद्रा यांच्या कर्जाचं नेमकं प्रकरण काय?
NCLTच्या निर्णयामुळे हे प्रकरण चर्चेत आलं आहे. सुभाष चंद्रा यांच्याविरोधातील वैयक्तिक दिवाळखोरी प्रक्रियेत सुमारे 22,006 कोटी रुपयांच्या दाव्यांना मान्यता मिळाली होती. मात्र मंजूर झालेल्या रिझॉल्युशन प्लॅननुसार कर्जदारांना सुमारे 6.25 ते 6.5 कोटी रुपये मिळणार आहेत. म्हणजेच प्रत्येक 100 रुपयांच्या दाव्यामागे कर्जदारांना अंदाजे 3 पैसे मिळण्याची स्थिती आहे. या आकडेवारीमुळे सोशल मीडियावर मोठी चर्चा सुरू झाली आहे.
अभिनेत्याची पोस्ट-
View this post on Instagram
NCLTच्या निर्णयावर काही कर्जदारांनी नाराजी व्यक्त केली आहे. कॅनरा बँक आणि युनियन बँक या निर्णयाला आव्हान देण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे. एलआयसी हाऊसिंग फायनान्सनेही या योजनेवर आक्षेप घेतला आहे. त्यामुळे सुभाष चंद्रा यांचं हे प्रकरण अद्याप पूर्णपणे संपलेलं नसून पुढील कायदेशीर प्रक्रिया महत्त्वाची ठरणार आहे.
या संपूर्ण प्रकरणावर विक्रम गायकवाड यांनी केलेली खोचक पोस्ट चर्चेचा विषय ठरली आहे. सामान्य व्यक्तीच्या कर्जाच्या ओझ्याची तुलना करत त्यांनी या मोठ्या आर्थिक प्रकरणावर अप्रत्यक्षपणे सवाल उपस्थित केला आहे. त्यांच्या पोस्टमुळे सुभाष चंद्रा यांच्या कर्जप्रकरणाची चर्चा मनोरंजनविश्वातही पोहोचली आहे.
