Movie Review Mhorkya : प्रत्येकामध्ये दडलेला असतो एक ‘म्होरक्या’

साधी सरळ मांडणी, कुठलाही फिल्मीपणा नाही, अस्सल ग्रामीण बाज असलेले नेहमीच्या जीवनशैलीतले फर्राटेदार संवाद हे या सिनेमाचं वैशिष्ट्य. सिनेमात सगळेच कलाकार नवखे आहेत. बऱ्याचजणांना तर अभिनयाचा गंधसुध्दा नाही.

  • कपिल देशपांडे, टीव्ही 9 मराठी, मुंबई
  • Published On - 17:02 PM, 6 Feb 2020
Movie Review Mhorkya : प्रत्येकामध्ये दडलेला असतो एक 'म्होरक्या'

ग्रामीण बाज असलेले, ग्रामीण भागातील वास्तव दर्शवणारे बरेच चित्रपट आले. गेल्या काही वर्षांचा आढावा घेतला, तर जणू लाटच आलीये म्हणा ना. अमर देवकर दिग्दर्शित राष्ट्रीय पुरस्कार विजेता ‘म्होरक्या’ हा सिनेमाही याच पठडीतला (Mhorkya Movie Review). अथक प्रयत्नानंतर अमर देवकर (Amar Devkar) आणि टीम हा सिनेमा प्रदर्शित करत आहे, त्याबद्दल त्यांचं अभिनंदन. अमरचा दिग्दर्शक म्हणून हा पहिला सिनेमा असला तरी बऱ्याच प्रसंगांवरची त्याची दिग्दर्शक म्हणून पकड वाखाणण्याजोगी आहे (Mhorkya Movie Review).

साधी सरळ मांडणी, कुठलाही फिल्मीपणा नाही, अस्सल ग्रामीण बाज असलेले नेहमीच्या जीवनशैलीतले फर्राटेदार संवाद हे या सिनेमाचं वैशिष्ट्य. सिनेमात सगळेच कलाकार नवखे आहेत. बऱ्याचजणांना तर अभिनयाचा गंधसुध्दा नाही. तरीही हे सगळे शिलेदार घेऊन अमरनं ‘म्होरक्या’ची खिंड उत्तम लढवली आहे. आता सगळे नवखे असल्यामुळे काही किंतु, परंतु सिनेमात आहेत, पण याकडे कानाडोळा केला, तर हा ‘म्होरक्या’ नक्कीच तुमच्या काळजात घर करेल.

‘म्होरक्या’ म्हणजे नेता, लीडर. सगळ्यांना पुढे घेऊन जाणारा. हेच या सिनेमात सांगण्यात आलं. ‘म्होरक्या’ ही गोष्ट आहे आगळ गावातील अशोक (रमण देवकर)ची. अशोक उर्फ अश्या गरीब कुटुंबातला अभ्यासात अजिबात रस नसलेला मुलगा. घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची. अश्याला शाळेपेक्षा मेंढ्यांच्या कळपासोबत रमण्यात जास्त रस. वडील नाही, आईची वाचा गेलेली ह्या सगळ्यात अश्याला मेंढ्याची सोबत आपलीशी वाटणारी, एकटेपणा दूर करणारी वाटते. एक दिवस त्याचे मित्र त्याला शाळेत जबरदस्ती घेऊन जातात. त्याच दिवशी गणतंत्र दिवसानिमित्त शाळेत परेडचा सराव सुरु असतो. इच्छा नसतांनाही अश्याला यामध्ये सहभागी व्हावं लागतं. अश्याचा परेडमधला खणखणीत आवाज सगळ्यांचं लक्ष वेधतो. इथूनच त्याच्या जीवनाला कलाटणी मिळते. अश्या परेडमध्ये लीडर होण्याच्या स्पर्धेत उतरतो. त्याला यासाठी तयार करतो अणण्या(अमर देवकर). अणण्या कारगिल युध्दात लढलेला, पण गावकऱ्यांनी गद्दार घोषित केलेला सैनिक. यामुळे त्याचं मानसिक संतुलन बिघडलेलं. तर अणण्याच्या मदतीनं अश्या परेडसाठी तयार होतो. आता गरीब अश्या गावच्या पाटलाचा मुलगा बाल्या (यशराज कह्राडे)सोबत परेडचा लीडर होण्याची स्पर्धा जिंकतो? शेवटी परेडचा लीडर कोण बनतं? अश्याला कोणत्या अडचणींचा सामना करावा लागतो? यासाठी तुम्हाला ‘म्होरक्या’ बघावा लागेल.

साध्या सोप्या विषयाभोवती या सिनेमाचं कथानक गुंफलेलं आहे. परेडमध्ये लीडर होण्याचं स्वप्न बघणं या धाग्याभोवती पाऊणेदोन तास खिळवून ठेवणं मोठी गोष्ट आहे. गणतंत्र दिवसानिमित्त लीडर होण्यासाठी चाललेली चढाओढ बघितली की नक्कीच तुम्हालाही शाळेतले दिवस आठवतील. अमरने सिनेमात ही वातावरण निर्मिती उत्तम केली. सिनेमातली सगळ्यात मोठी जमेची बाजू आहे, तुमच्या नेहमीच्या बोलीभाषेतील चटपटीत संवाद. ‘म्होरक्या’ ही फक्त एका लहान मुलाची गोष्ट नाही. तर असे अनेक ‘म्होरके’ तुमच्या आजूबाजूला, तुमच्या जीवनात असतात. शाळेतच नाही तर ऑफिस, महाविद्यालय, घरात एक ‘म्होरक्या’ दडलेला असतो. क्षेत्र कुठलंही असो राजकारण येतंच, हे यामध्ये अचूक हेरलंय. सिनेमाची थीम उत्तम आहे, त्याभोवतीच सिनेमाचं कथानकही ठेवण्यात आलंय. पण सिनेमात गिमिक करण्याच्या नादात अनेक अनावश्यक प्रसंगांची पेरणी करण्यात आलीय. बरेच प्रसंग बघतांना जाणवतं की आता सिनेमा संपेल, मात्र सिनेमा काही संपत नाही. सिनेमाचा शेवट मनाला चटका लावणारा आहे, पण हा शेवट ताणला नसता तर सिनेमानं अजून अचूक परिणाम साधला असता. शिवाय, सिनेमात अश्याचं आपल्या आईबरोबरचं नातं खोलवर दाखवायला हवं होतं. त्यांच्यातील दृश्य वरवरची वाटतात. सिनेमाचं कॅमेरावर्क उत्तम आहे. आगळ गाव उत्तमरित्या दाखवण्यात आलंय. म्होरक्याच्या भूमिकेत रमण देवकरनं उत्तम काम केलंय. अभिनयाचा कुठलाही गंध नसतांना या मुलानं घेतलेली मेहनत उत्तम आहे. अणण्याच्या भूमिकेत अमर देवकरनंही आपली भूमिका चोख बजावली आहे. जास्त संवाद नसतांनाही त्याचा अणण्या भाव खाऊन जातो. इतर कलाकारांनीही सिनेमात अभिनयाची काही पार्श्वभूमी नसतांनाही उत्तम काम केलं आहे. सिनेमाच्या शेवटी येणारं आनंद शिंदेंनी गायलेलं गाणं खटकतं. सिनेमाचा शेवट विचार करायला लावणारा आहे. त्यामुळे क्रेडिट लाईन्सला अचानक गाणं आल्यामुळे विषयातलं गाभीर्य निघून जातं. हे अमरनं टाळायला हवं होतं.

एकूणच काय, तर सगळ्याच कलाकारांचा निरागस अभिनय, एक विदारक वास्तव असलेला म्होरक्या विचार करायला भाग पाडतो. जर काही गोष्टींवर अजून लक्ष दिलं असतं तर हा सिनेमा अजून चांगला झाला असता असं मला वाटतं. ‘टीव्ही 9 मराठी’कडून या सिनेमाला मी देतोय तीन स्टार्स