अशी होती मुकुल देव यांची अवस्था; निधनानंतर समोर आला व्हिडीओ, चाहत्यांना बसला धक्का!
बॉलिवूड आणि टीव्ही इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेते मुकुल देव यांचं शुक्रवारी निधन झालं. त्यांच्या निधनानंतर आता सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमधील त्यांची अवस्था पाहून नेटकऱ्यांना धक्काच बसला आहे.

अभिनेते मुकुल देव यांनी वयाच्या 54 व्या वर्षी या जगाचा निरोप घेतला. शुक्रवारी त्यांच्या निधनाची माहिती भाऊ राहुल देवने सोशल मीडियाद्वारे दिली. मुकुल देव यांच्या निधनाने संपूर्ण कलाविश्वावर शोककळा पसरली आहे. आता त्यांच्या निधनाच्या तीन दिवसांनंतर एक व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे. यामध्ये त्यांची अवस्था पाहून नेटकऱ्यांना आश्चर्याचा धक्काच बसला आहे. या व्हिडीओमध्ये मुकुल देव हे ओळखूच येत नाहीत. हे कशामुळे झालं, असा सवाल नेटकरी करत आहेत.
सोशल मीडियावरील या व्हिडीओमध्ये मुकुल देव हे धावताना दिसून येत आहेत. एक प्रशिक्षक त्यांच्याकडून धावण्याचा व्यायाम करून घेत असून मुकुल देव हे पूर्ण ताकदीनिशी धावताना दिसत आहेत. या व्हिडीओच्या शेवटी त्यांचा लूक जवळून पहायला मिळतो. यामध्ये त्यांचं वजन बरंच वाढल्याचं दिसून येतंय. त्याचप्रमाणे एकंदर त्यांचा लूक हा पहिल्यापेक्षा खूपच वेगळा असल्याचं नेटकऱ्यांनी म्हटलंय. आजारपणामुळे किंवा नैराश्यामुळे त्यांच्या आरोग्यावर खूप परिणाम झाल्याचंही काहींनी म्हटलंय. निधनापूर्वी ते आठवडाभर आयसीयूमध्ये दाखल होते. त्यांना आरोग्याच्या विविध समस्या होत्या, अशी माहिती अभिनेत्री मुग्धा गोडसेनं दिली होती.
या व्हिडीओमध्ये मुकुल देव हे एका उद्यानात धावताना दिसत आहेत. परंतु काही वेळ धावल्यानंतर ते पूर्णपणे थकतात. त्यांचे केस खूप लांब आहेत आणि त्यांनी काळा कुर्ता परिधान केला आहे. या व्हिडीओमध्ये त्यांचं वजनही खूप वाढलेलं दिसत आहे. त्यावर अनेकांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. ‘हे खरंच मुकुल देव आहेत का’, असा सवाल एकाने विचारला. तर ‘असं दिसतंय की ते खूप तणावाखाली होते.. देव त्यांच्या आत्म्याला शांती देवो’, असंही काहींनी म्हटलंय.
View this post on Instagram
मुकुल यांचा जवळचा मित्र आणि अभिनेता विंदु दारा सिंहने ‘दैनिक भास्कर’शी बोलताना सांगितलं की, मुकुल हे गेल्या काही काळापासून मानसिकदृष्ट्या ठीक नव्हते. ते नैराश्यात होते. स्वत:ची काळजी घेत नव्हते. त्यांचं वजन सुमारे 125 किलोंवर पोहोचलं होतं. इतकंच नव्हे तर ते दारू आणि गुटखासारख्या व्यसनांच्याही आहारी गेले होते. आई-वडिलांच्या निधनानंतर मुकुल खूप एकटे पडले होते, असंही त्यांनी म्हटलंय. मुकुल यांचा पत्नी शिल्पा देवशी घटस्फोट झाला होता. या दोघांची मुलगी सिया ही परदेशात राहते. भाऊ राहुल देव हा अभिनेत्री मुग्धासोबत राहत असल्याने मुकुल एकटेच राहत होते. व्यसनेच्या आहारी गेल्याने त्यांची प्रकृती आणखी खालावली होती.
