‘मुन्नाभाई MBBS’ फेम अभिनेता 10 वर्षांपासून बेपत्ता, गर्लफ्रेंडचा हार्ट अटॅकने मृत्यू; अभिनेता आहे तरी कुठे?

'मुन्नाभाई एमबीबीएस'मध्ये झळकलेला हा अभिनेता आजसुद्धा बेपत्ता आहे. दहा वर्षांपूर्वी तो घरातून एका पार्टीसाठी निघाला होता. त्यानंतर तो परतलाच नाही. आजही विशाल कुठे आहे, कसा आहे.. हे कोणालाच माहीत नाही.

मुन्नाभाई MBBS फेम अभिनेता 10 वर्षांपासून बेपत्ता, गर्लफ्रेंडचा हार्ट अटॅकने मृत्यू; अभिनेता आहे तरी कुठे?
विशाल ठक्कर, संजय दत्त
Image Credit source: Instagram
| Updated on: May 07, 2026 | 9:31 AM

अभिनेता विशाल ठक्कर हा 2000 च्या सुरुवातीला बॉलिवूडमध्ये बऱ्यापैकी सक्रिय होता. जरी तो कधी मोठा हिरो बनू शकला नसला तरी छोट्या भूमिकांमधून त्याने स्वत:ची वेगळी ओळख बनवील होती. त्यापैकी संजय दत्तच्या ‘मुन्नाभाई एमबीबीएस’मधील त्याची भूमिका विशेष लक्षात राहिली. या चित्रपटात विशालने एका अशा तरुणाची भूमिका साकारली होती, जो गर्लफ्रेंडकडून विश्वासघात झाल्यानंतर आत्महत्येचा प्रयत्न करतो. याशिवाय ‘चांदनी बार’ आणि ‘टँगो चार्ली’ यांसारख्या चित्रपटांमध्येही तो झळकला होता. फक्त चित्रपटच नाही तर विशालने ‘क्योंकी सास भी कभी बहू थी’ आणि ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ यांसारख्या गाजलेल्या मालिकांमध्येही त्याने भूमिका साकारल्या होत्या. परंतु नंतर तो अचानक गायब झाला.

घरातून सिनेमा बघण्यासाठी निघाला अन्..

विशाल ठक्कर गेल्या दहा वर्षांपासून बेपत्ता आहे आणि आजपर्यंत त्याच्याविषयी कोणतीच पक्की बातमी समोर आली नाही. मिळालेल्या माहितीनुसार विशाल 31 डिसेंबर 2015 रोजी घरातून चित्रपट पाहण्यासाठी निघाला होता, त्यानंतर तो घरी परतलाच नाही. 31 डिसेंबरच्या रात्री विशालने रात्री 10.30 च्या सुमारास त्याच्या आईकडून 500 रुपये घेतले आणि मुंबईतील मुलुंड इथल्या घरातून तो निघाला. त्यानंतर 1 जानेवारी 2016 च्या मध्यरात्री 1 वाजता त्याने वडिलांना मेसेज केला की तो एका पार्टीला जात आहे आणि सकाळी घरी परत येईल. पण त्या पार्टीतून विशाल घरी परतलाच नाही.

Loading...

पोलीस काय म्हणाले?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विशालला शेवटचं त्याच्या गर्लफ्रेंडने 1 जानेवारी 2016 रोजी सकाळी 11.45 वाजताच्या सुमारास ठाण्यातील घोडबंदर रोड इथं पाहिलं होतं. तिथून अंधेरीला जाण्यासाठी तो ऑटोमध्ये बसला होता. अंधेरीला एका शूटिंगसाठी त्याला जायचं होतं. त्यानंतर त्याचा फोन बंद झाला. पोलिसांना कोणत्याही रुग्णालयातून त्याच्याबद्दलची अपडेट मिळाली नाही. विशाल बँक खात्यातूनही कोणतेच ट्रान्सॅक्शन करण्यात आले नव्हते.

गर्लफ्रेंडवर आधी संशय

विशालच्या कुटुंबीयांनी त्याच्या बेपत्ता होण्याची तक्रार पोलिसांकडे नोंदवली होती. परंतु त्यावेळी या प्रकरणाला फारसं मीडिया कव्हरेज मिळालं नाही. परंतु वेळोवेळी सोशल मीडियावर विशालबद्दलची माहिती व्हायरल केली जात होती. विशालसोबत नेमकं काय घडलं, हे जाणून घेण्याची प्रतीक्षा आजही त्याचे कुटुंबीय आणि मित्रपरिवार करत आहेत. 2021 च्या एका ‘रेडिट’ पोस्टनुसार, या प्रकरणाचा तपास करणारे माजी अधिकारी महेंद्र पुरी यांनी म्हटलं होतं की, सुरुवातीला त्यांना त्याच्या गर्लफ्रेंडवर संशय होता. परंतु तिच्या जबाबत कोणतीही संशयास्पद गोष्ट आढळली नाही. विशालची हत्या झाली की त्याचं अपहरण झालं किंवा विशाल स्वत:च कुठेतरी निघून गेला, या प्रश्नांची उत्तरं आजवर मिळाली नाहीत.

गर्लफ्रेंडचा मृत्यू

आश्चर्याची बाब म्हणजे विशाल बेपत्ता होण्याच्या तीन महिने आधी त्याच्या गर्लफ्रेंडने त्याच्यावर बलात्काराचा आरोप केला होता. तिने पोलिसांत तक्रारसुद्धा दाखल केली होती. परंतु नंतर दोघांनी हे प्रकरण सोडवण्याचा निर्णय घेतला आणि त्याच्या गर्लफ्रेंडने तक्रार मागे घेतली. याप्रकरणात मोठा ट्विस्ट तेव्हा आला, जेव्हा काही महिन्यांनंतर विशालची गर्लफ्रेंड तिच्या फ्लॅटमध्ये मृतावस्थेत आढळली होती. सुरुवातीच्या रिपोर्टमध्ये तिच्या मृत्यूचं कारण हार्ट अटॅक असल्याचं म्हटलं गेलं. आजसुद्धा विशालबद्दलची कोणतीच माहिती समोर आली नाही.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us