नाना पाटेकरांसारखीच मुलाचीही पर्सनॅलिटी दमदार; मल्हारमध्ये दिसते नानांची सावली
अभिनेते नाना पाटेकर यांच्याविषयी अनेकांना बरंच काही माहीत असेल. परंतु त्यांचा मुलगा मल्हारविषयी तुम्हाला माहिती आहे का? वडिलांच्या पावलांवर पाऊल टाकत मल्हारसुद्धा चित्रपटसृष्टीत काम करतोय. परंतु तो पडद्यासमोर नाही तर पडद्यामागे काम करतोय.

नाना पाटेकर हे फक्त दमदार अभिनेतेच नाही तर उत्तम लेखक आणि चित्रपट निर्मातेसुद्धा आहेत. त्यांची डायलॉग बोलण्याची शैली, अभिनयात उतरणारा खरेपणा यांमुळेच ते इतर कलाकारांपेक्षा वेगळे ठरतात. नाना पाटेकर यांना राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, फिल्मफेअर आणि पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. त्यांनी नीलकांती पाटेकर यांच्याशी लग्न केलं होतं. या दोघांना एक मुलगा असून त्याचं नाव मल्हार पाटेकर आहे. मल्हारसुद्धा त्याच्या वडिलांप्रमाणेच शिस्तप्रिय आणि साधेपणाने जगणारा आहे. मल्हारचं दिसणं आणि बोलणं-चालणंसुद्धा नानांप्रमाणेच आहे. परंतु चित्रपटसृष्टीत तो स्वत:च्या जोरावर आपली वेगळी ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय.
मल्हारने मुंबईतील सरस्वती मंदिर हायस्कूलमधून शिक्षण पूर्ण केलं आणि कॉमर्स शाखेत त्याने पदवी घेतली. लहानपणापासूनच त्याला चित्रपटसृष्टीत काम करण्याची आवड होती. सुरुवातीला मल्हार हा दिग्दर्शक प्रकाश झा यांच्या चित्रपटात काम करणार होता. परंतु नाना पाटेकर आणि प्रकाश झा यांच्यातील मतभेदामुळे त्याला या प्रोजेक्टमधून माघार घ्यावी लागली होती. त्यानंतर मल्हारने सहाय्यक दिग्दर्शक म्हणून राम गोपाल वर्माच्या ‘द अटॅक ऑफ 26/11’ या चित्रपटात काम केलं.
View this post on Instagram
आज मल्हारचं स्वत:चं प्रॉडक्शन हाऊस आहे, ज्याचं नाव त्याने वडील नाना पाटेकर यांच्यावरून ठेवलं आहे. नानासाहेब प्रॉडक्शन हाऊस असं त्याचं नाव आहे. नाना पाटेकर आणि नीलकांती पाटेकर यांचा घटस्फोट झाला नसला तरी ते वेगळे राहत आहेत. मल्हार त्याच्या आईच्या खूप जवळ असल्याचं कळतंय. मल्हारच्या मोठ्या भावाच्या मृत्यूनंतर नानांना मोठा धक्का बसला होता. मल्हारच्या जन्मानंतर त्यांच्या कुटुंबात पुन्हा आनंदाचं वातावरण निर्माण झालं होतं.
नाना पाटेकर यांची पत्नी नीलाकांती पाटेकरसुद्धा प्रसिद्ध अभिनेत्री आहेत. 1966 मध्ये त्यांनी बालकलाकार म्हणून चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं होतं. त्यांनी राष्ट्रीय पुरस्कारसुद्धा आपल्या नावे केला आहे. परंतु नाना पाटेकर यांच्याशी लग्न केल्यानंतर नीलाकांती या अभिनयापासून दूर गेल्या. अनेक वर्षांनंतर त्यांनी विकी कौशलच्या ‘छावा’ या ब्लॉकबस्टर चित्रपटातून पुनरागमन केलं.
