Nushrratt Bharuccha: बालीत नुशरत भरुचाचा अपघात, मणक्याला फ्रॅक्चर; एअर ॲम्ब्युलन्सद्वारे भारतात आणण्याची तयारी
Nushrratt Bharuccha: बालीमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेताना अभिनेत्री नुशरत भरुचाचा अपघात झाला. यात तिच्या मणक्याला गंभीर दुखापत झाली आहे. नुशरतच्या टीमकडून तिच्या प्रकृतीविषयीची माहिती देण्यात आली आहे.

Nushrratt Bharuccha : अभिनेत्री नुशरत भरुचा हिच्याबाबत चिंताजनक बातमी समोर आली आहे. कामानिमित्त आणि सुट्टीसाठी बाली इथं गेलेल्या नुशरतचा दुर्दैवी अपघात झाला असून तिच्या मणक्याला फ्रॅक्चर झाला आहे. सध्या तिच्यावर बाली इथल्या रुग्णालयात उपचार सुरू असून डॉक्टरांच्या देखरेखीखाली तिची प्रकृती तपासली जात आहे. नुशरतची पब्लिसिस्ट संचिता त्रिवेदी यांनी याप्रकरणी अधिकृत निवेदन जारी केलं आहे. अपघातानंतर नुशरतला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. डॉक्टरांकडून पुढील तपासण्या आणि वैद्यकीय मूल्यांकन केल्यानंतर तिच्या मणक्यावर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे, अशी माहिती या निवेदनातून देण्यात आली आहे.
बालीहून मुंबईत आणण्याची तयारी
नुशरतवर पुढील उपचार मुंबईत करण्याची तयारी सुरू आहे. तिला एअर ॲम्ब्युलन्सद्वारे बालीहून मुंबईत आणण्याची व्यवस्था केली जात आहे. मुंबईत आल्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तिच्या मणक्याची शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याचं अधिकृत निवेदनात सांगण्यात आलं आहे. सध्या नुशरतच्या आरोग्याला सर्वाधिक प्राधान्य दिलं जात असून, आवश्यक वैद्यकीय उपचार आणि डॉक्टरांची देखरेख यावर लक्ष केंद्रित करण्यात आलं आहे. तिच्या प्रकृतीबाबत अधिकृत माहितीकडेच विश्वास ठेवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. मणक्याला झालेली दुखापत आणि त्यानंतर होणारी शस्त्रक्रिया लक्षात घेता नुशरतला पूर्णपणे बरे होण्यासाठी पुरेसा वेळ लागणार आहे. त्यामुळे आगामी काही आठवड्यांमधील तिच्या व्यावसायिक कामांवर परिणाम होण्याची शक्यता आहे.
View this post on Instagram
नुशरतच्या अपघाताची माहिती समोर आल्यानंतर चाहते आणि इंडस्ट्रीतील कलाकारांकडून त्यांच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त केली जाण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर नुशरत आणि तिच्या कुटुंबाच्या गोपनीयतेचा आदर करण्याची विनंती करण्यात आली आहे. “तिला तिच्या उपचारांवर आणि प्रकृतीत सुधारणा होण्यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी आवश्यक वेळ आणि अवकाश द्यावा,” अशी विनंती पब्लिसिस्टकडून करण्यात आली आहे. तसंच नुशरतच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त करणाऱ्या आणि तिच्या लवकर बरं होण्यासाठी शुभेच्छा देणाऱ्या प्रत्येकाचे आभार मानण्यात आले आहेत. नुशरतच्या प्रकृतीबाबत योग्य वेळी पुढील अधिकृत माहिती शेअर केली जाईल, असंही निवेदनात स्पष्ट करण्यात आलं आहे.
